सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना परात्पर गुरुदेवांची कृपा अनुभवत घराचे दायित्व समर्थपणे सांभाळणार्‍या आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून स्वतःत पालट घडवून आणणार्‍या सौ. मीनल राजेंद्र शिंदे !

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना त्यांच्या पत्नी सौ. मीनल शिंदे यांनी घराचे दायित्व समर्थपणे सांभाळले. ते करत असतांना त्यांचा झालेला संघर्ष, त्यातून त्यांची झालेली घडण आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने त्यांच्यात झालेले सकारात्मक पालट, यांविषयीची काही सूत्रे १८ ऑक्टोबर या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया ! घरातील एक सदस्य पूर्णवेळ साधना करत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर घरातील अन्य सदस्यांची कशी काळजी घेतात’, हे यातून प्रत्ययाला येते.

या लेखाचा मागील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/519775.html

सद्गुरु राजेंद्र शिंदे

७. रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर मन अंतर्मुख होणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे साधिकेला स्वत:मध्ये आमूलाग्र पालट जाणवणे

७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी भेटीत ‘तुमची तनाची सेवा झाली. आता मन द्या’, असे सांगितल्यावर आनंद मिळणे : एकदा आम्ही सहकुटुंब रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी आमची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमची तनाची सेवा झाली. आता मन द्या.’’ त्या वेळी काय झाले ठाऊक नाही; पण ‘माझ्याकडून काहीतरी झाले’, याचाच आनंद मला पुष्कळ काही देऊन गेला.

सौ. मीनल शिंदे

७ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे अंतर्मुखता वाढणे, तसेच अनावश्यक आणि ‘स्व’चे विचार अल्प होऊन प्रेमभाव वाढणे : मी काही दिवसांनी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आले. माझ्यात ‘अपेक्षांचा डोंगर होता. इतरांचा विचार अल्प होता. ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे, स्वीकारण्याची वृत्ती अल्प असणे, अधिकारवाणीने बोलणे, प्रतिक्रियात्मक बोलणे’, असे अनेक स्वभावदोष होते. प्रक्रिया राबवतांना मला हळूहळू ‘मूळ स्वभावदोष कुठला आहे ?’, हे समजू लागले. त्यावर मात करण्यासाठी मी स्वयंसूचना सत्र करणे, सारणी लिखाण करणे इत्यादी सर्व चालू केले. त्यामुळे माझ्यातील प्रतिमेचे विचार न्यून होऊन सेवा करतांना मी इतरांना विचारून घेऊ लागले. मला इतरांविषयी प्रेम वाटू लागले. मन सेवेत व्यस्त असल्याने माझ्या मनातील अनावश्यक आणि ‘स्व’चे विचार न्यून होऊ लागले.

७ इ. वर्ष २०१७ मध्ये मी ठाणे येथील घर सोडून गोवा येथे घर घेण्याचा निर्णय घेतला. आम्हाला परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे चांगले घरही मिळाले.

७ ई. वैदेही आणि सद्गुरु दादा यांच्याकडून अपेक्षा करण्याचे प्रमाण उणावणे अन् मनातील कलह दूर होऊन दैवी आनंद मिळू लागणे : पूर्वी मला मुलगी आणि यजमान यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. आता स्वयंसूचना सत्रे केल्याने मला त्यावर मात करता आली. स्वयंसूचना घेतल्यामुळे मला घरातील सर्व प्रसंग शांतपणे हाताळता येतात आणि सद्गुरु दादांकडून नवीन गोष्टी अन् दृष्टीकोन शिकायला मिळतात. ‘सद्गुरु दादा आता आपल्यासाठी नाहीत, तर समष्टीसाठी आहेत’, असा सकारात्मक विचार माझ्यात वाढू लागला आहे. आश्रमातील चैतन्य आणि सात्त्विक वातावरण यांमुळे माझ्यात स्वीकारण्याची वृत्ती वाढू लागली आहे. माझे मन सकारात्मक आणि स्थिर झाले असून मला साधनेतील आनंद मिळू लागला आहे. माझ्या मनातील सगळा कलह आता दूर होऊन मनाला दैवी आत्मानंद प्राप्त होऊ लागला आहे.

८. १५ वर्षांपूर्वी शिकलेल्या टंकलेखनाचा उपयोग सेवेसाठी होणे, सहसाधिकेकडून विविध प्रकारच्या सेवा शिकणे

माझी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मला टंकलेखनाची सेवा मिळाली. मी विवाहापूर्वी मराठी टंकलेखन शिकले होते. ‘मी सेवा करतांना संगणकाच्या ‘की-बोर्ड’कडे न बघता टंकलेखन करू लागले आणि माझी टंकलेखनाची गतीही वाढली’, ही केवळ गुरुकृपाच आहे. मला आलेली ही अनुभूतीच आहे. मला सहसाधिकेच्या माध्यमातून टंकलेखनासंबंधी अनेक सेवा शिकायला मिळाल्या, उदा. ‘इमेल’द्वारे बाहेरच्या साधकांना सेवा पाठवणे, धारिकेसंबंधी अन्य साधकांशी समन्वय करणे. संगणकीय ज्ञान नसतांना गुरुदेव माझ्याकडून या सेवा करवून घेतात. आश्रमातील अनेक सेवा मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे शिकता येत आहेत. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.

कु. वैदेही शिंदे

९. परात्पर गुरु डॉक्टरांनी वैदेहीकडे साधिकेची विचारपूस करणे

वैदेही सेवेनिमित्त कधी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटली, तर ते तिच्याजवळ माझी विचारपूस करतात आणि ‘आई बरी आहे ना ?’, असे विचारतात. त्या वेळी वैदेही त्यांना सांगते, ‘‘हो. आता आईमध्ये पालट झाला आहे.’’ तिने मला याविषयी सांगितल्यावर मी तिला विचारते, ‘‘काय गं, खरंच माझ्यात पालट होत आहे ना !’’ ती म्हणते, ‘‘हो गं आई.’’ तेव्हा माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते.

१०. परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर सद्गुरु दादांनी साधिकेत झालेले पालट सांगितल्यावर गुरुदेवांनी स्मित हास्य करणे

वर्ष २०२० च्या दिवाळीत एका धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी मला आणि सद्गुरु दादांना परात्पर गुरु डॉक्टर भेटले. तेव्हा त्यांनी माझ्या साधनेची विचारपूस केली. सद्गुरु दादांनी त्यांना सांगितले, ‘‘आता तिच्यात पालट होत आहे. घरातील एक मोठा प्रसंग तिने चांगल्या पद्धतीने हाताळला. तिने त्यावर चांगले दृष्टीकोन दिले.’’ तेव्हा गुरुदेवांनी स्मित हास्य केले.

परात्पर गुरुदेवा, ‘केवळ तुमच्या कृपेमुळे माझ्यात थोडेफार पालट झाले आहेत. ‘माझ्यात आणखी पालट होण्यासाठी तुम्ही मला चैतन्य आणि शक्ती द्या अन् मला सदैव सेवेत ठेवा’, एवढीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे !’

(समाप्त)

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक