सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना घराचे दायित्व समर्थपणे सांभाळणार्‍या आणि स्वतःत पालट घडवून आणणार्‍या सौ. मीनल राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना परात्पर गुरुदेवांची कृपा अनुभवत घराचे दायित्व समर्थपणे सांभाळणार्‍या आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून स्वतःत पालट घडवून आणणार्‍या सौ. मीनल राजेंद्र शिंदे !

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना त्यांच्या पत्नी सौ. मीनल शिंदे यांनी घराचे दायित्व समर्थपणे सांभाळले. ते करत असतांना त्यांचा झालेला संघर्ष, त्यातून त्यांची झालेली घडण आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने त्यांच्यात झालेले सकारात्मक पालट, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. घरातील एक सदस्य पूर्णवेळ साधना करत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर घरातील अन्य सदस्यांची कशी काळजी घेतात’, हे यातून प्रत्ययाला येते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. विवाहानंतर यजमानांनी व्यवहारातील सर्व गोष्टी शिकवल्याने स्वतःमध्ये एक प्रकारची प्रगल्भता येऊ लागणे

‘माझा विवाह होण्यापूर्वी मला व्यावहारिक ज्ञान नव्हते. आमचा विवाह झाल्यानंतर माझे यजमान, म्हणजे आताचे सद्गुरु राजेंद्र शिंदे मला व्यवहारातील सगळ्या गोष्टी शिकवायचे, उदा. अधिकोषातील कार्यपद्धती, घरात लागणारे साहित्य कुठून आणि कसे आणायचे ? नवीन कपडे घेतांना ते कोणत्या प्रकारचे घ्यायचे ? त्यांची रंगसंगती कशी असावी ? नवीन ठिकाणी कसे जायचे ? त्यामुळे माझ्यात एक प्रकारची प्रगल्भता येऊ लागली.

२. सनातन संस्थेशी संपर्क

२ अ. सनातन संस्थेच्या सत्संगाला जाणे आणि सेवेचे महत्त्व पटल्याने सेवाकेंद्रात जाऊन सेवा करणे : वर्ष १९९८ मध्ये आम्ही (मी आणि सद्गुरु दादा) एका दैनिकातील विज्ञापन वाचून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. आरंभी आम्ही दोघे ‘उमा नीलकंठ व्यायामशाळा’ येथे सत्संगाला जात होतो. सत्संगामुळे आम्हाला सेवेचे महत्त्व पटू लागले. त्या वेळी ठाणे येथे नवीनच सेवाकेंद्र चालू झाले होते. तेथे मला ‘महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अहवालांची संगणकात नोंद करणे आणि त्यात काही त्रुटी असल्यास त्या जिल्ह्यांना पत्राद्वारे कळवणे’, ही सेवा मिळाली. त्या वेळी मला संगणकीय ज्ञान नव्हते. परात्पर गुरुदेवांची कृपा आणि सहसाधकांनी केलेले साहाय्य यांमुळे मला नवीन संगणकीय गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर माझ्याकडे ‘ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत ५ केंद्रांतील ग्रंथांची देवाण-घेवाण आणि त्यांचे अहवाल बनवणे’, अशी सेवा होती. मी कधी कधी अन्य प्रासंगिक सेवाही करायचे. मी घरातील कामे करून आणि वैदेहीला (मुलीला) सांभाळून या सेवा करत होते. त्यामुळे मला एक प्रकारचा आत्मविश्वास वाटू लागला.

३. वैदेहीला गंभीर आजार होणे

३ अ. वैदेहीला झालेल्या गंभीर आजाराच्या निमित्ताने वर्षभर रुग्णालयात जावे लागणे, तेथील नवीन अनुभव घेतांना समाजातील लोकांचे जवळून निरीक्षण होणे : वर्ष २००० मध्ये वैदेहीला गंभीर आजार झाला. त्या वेळी तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात भरती केले होते. माझ्यासाठी रुग्णालयातील हा अनुभव नवीन होता. घरापासून रुग्णालय दूर असल्यामुळे प्रवास करून जाणे, शासकीय रुग्णालयात रहाणे, काही तपासण्यांसाठी दुसर्‍या रुग्णालयात जाणे, तेथील अहवाल आणणे आणि प्रत्येक मासाला तपासणीसाठी जाणे, असे मी वर्षभर करत होते. त्या कालावधीत माझे समाजातील लोकांचे जवळून निरीक्षण झाले.

सौ. मीनल शिंदे

३ आ. वैदेहीची शुश्रुषा करतांना देवाने वेगवेगळ्या माध्यमांतून शक्ती पुरवणे आणि वैदेही वर्षभर शाळेत न जाऊनही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे : वैदेही रुग्णालयात असतांना अनेक रुग्णांच्या व्याधी आणि त्यांचे त्रास पाहून ‘गुरुदेव आपल्याला प्रत्येक गोष्टीत कसे साहाय्य करतात !’, याची मला प्रचीती आली. आम्ही संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करत होतो. त्यामुळे माझे मन थोडा वेळ स्थिर असायचे; पण ‘वैदेही कधी बरी होईल ?’, अशी मला चिंता असायची. सद्गुरु दादा स्वतः स्थिर राहून ‘हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे’, असे मला समजवायचे.

सद्गुरु दादा प्रतिदिन सेवेला जात होते. त्यांच्याकडे अनेक सेवा असल्यामुळे त्यांना घरासाठी वेळ देता येत नव्हता. ‘त्यांनी आम्हाला थोडा वेळ द्यायला पाहिजे’, असे मला सतत वाटायचे; मात्र प्रत्येक वेळी देव मला वेगवेगळ्या माध्यमांतून शक्ती पुरवत होता. वैदेही वर्षभर शाळेत गेली नाही. त्या वेळी मी वैदेहीच्या मैत्रिणींकडून वह्या आणून तिला शिकवत होते. गुरुदेवांच्या कृपेने त्या वर्षी ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.

४. सद्गुरु राजेंद्रदादा पूर्णवेळ सेवा करू लागल्याने वैदेहीसह सेवाकेंद्रात रहायला जाणे आणि तेथे अनेक गोष्टी शिकायला मिळणे

वर्ष २००३ मध्ये सद्गुरु दादा पूर्णवेळ सेवा करू लागले. तेव्हा मला वाटायचे, ‘त्यांनी थोडा वेळ सेवा करावी आणि आम्हालाही वेळ द्यावा’; परंतु देवाने काही वेगळेच ठरवले होते. ते पूर्णवेळ सेवा करू लागल्यावर ठाणे सेवाकेंद्रात रहायला गेले. प्रथम मला ते स्वीकारता आले नाही. थोड्या दिवसांनी मी आणि वैदेही तेथेच रहायला गेलो. आम्ही दीड वर्ष तेथे राहिलो. तेव्हा मला ‘आश्रमात कसे रहातात ?’, याचा अनुभव आला. मला कु. नलिनी राऊत यांच्याकडून ‘उपलब्ध वस्तूंमध्ये स्वयंपाक कसा करायचा ? अन्य साधकांकडून सेवा कशी करवून घ्यायची ? गुरुधन कसे वाचवायचे ? प्रेमभाव कसा वाढवायचा ?’, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

५. ठाणे येथील नवीन घरात रहायला जाणे, वैदेहीच्या दहावीच्या पेपरच्या वेळी तिला ताप येणे, दोघींनी तिची महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणे

५ अ. सद्गुरु दादा उत्तर भारतात प्रसाराला गेले असल्याने नवीन घरी जातांना अनेक प्रश्न निर्माण होणे आणि ‘गुरु समवेत आहेत’, असा भाव असल्याने नवीन ठिकाणी भीती न वाटणे : आम्ही पुष्कळ वर्षांपूर्वी घरासाठी पैसे गुंतवले होते; पण तेथे इमारत होत नव्हती. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे वर्ष २००८ मध्ये कळवा, ठाणे येथे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सद्गुरु दादा पूर्णवेळ साधना करत असल्यामुळे ‘नवीन सदनिकेत रहायला जावे’, अशी त्यांची इच्छा नव्हती; मात्र ‘मला स्वतःचे घर असावे’, असे वाटत होते. याच कालावधीत सद्गुरु दादा उत्तर भारतात प्रसाराला गेले आणि मी अन् वैदेही दोघीच नवीन घरी रहायला गेलो. त्या वेळी ‘सामानाची बांधाबांध कशी करायची ? नवीन घरात ‘फर्निचर’ कसे बनवायचे ? अधिकोषाचे व्यवहार कसे करायचे ?’, असे अनेक प्रश्न असायचे. सद्गुरु दादा घरी नसल्यामुळे मला हे सर्व जड जायचे; परंतु ही सर्व कामे स्वतः केल्याने मला त्यातील बारकावे शिकायला मिळाले.

आम्ही रहात असलेल्या इमारतीच्या सभोवताली काहीच वस्ती नव्हती. दुकानेही दूर होती. एवढ्या मोठ्या इमारतीत केवळ ३ कुटुंबे रहायला आली होती. आमच्या माळ्यावर आम्ही दोघीच रहात होतो. इमारतीच्या मार्गिकेत दिव्याची व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीतही मला रात्रीच्या वेळी कशाचीही भीती वाटत नव्हती. माझ्यात धीटपणा येत होता. ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे मला नेहमी वाटत असे.

कु. वैदेही शिंदे

५ आ. वैदेहीची दहावीची परीक्षा असतांना तिला ताप येणे आणि सद्गुरु दादा घरी नसल्याने ‘आई अन् वडील’ अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागणे : आम्ही नवीन घरी रहायला गेलो असतांना वैदेही इयत्ता दहावीत शिकत होती. तेव्हा मला नेहमी वाटायचे, ‘सद्गुरु दादांनी मला वेळ दिला नाही, तरी चालेल; पण वैदेहीला तरी वेळ द्यायला हवा. तिचे हे शिक्षणाचे महत्त्वाचे वर्ष आहे’; परंतु ते त्या वेळी घरी आले नाहीत. ‘त्यांनी वैदेहीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी तरी यावे’, असे मला वाटले; परंतु तेव्हाही ते आले नाहीत. वैदेहीचा पहिला पेपर इंग्रजीचा होता आणि त्याच्या आदल्या दिवशी तिला पुष्कळ ताप आला. त्या दिवशी संध्याकाळी तिने काही खाल्ले नाही; म्हणून मी तिला एकटीलाच घरात ठेवून दाराला बाहेरून कुलूप लावून फळे आणण्यासाठी गेले. तेव्हा मला काही सुचत नव्हते. मला वाटले, ‘सद्गुरु दादा घरी असते, तर मला त्यांचा आधार वाटला असता.’ परीक्षेच्या वेळी तिला हवे-नको, ते पहाणे, प्रतिदिन तिच्यासह परीक्षा केंद्रापर्यंत जाणे, ती पेपर सोडवत असतांना मधल्या वेळेत घरातील सामान घेऊन पुन्हा तिच्या परीक्षेच्या ठिकाणी तिला आणण्यास जाणे’, असा माझा दिनक्रम होता. त्या वेळी मी ‘आई आणि वडील’, अशा दोन्ही भूमिका पार पाडत होते.

५ इ. वैदेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर सर्वांनी दोघींचे कौतुक करणे : गुरुदेवांच्या कृपेमुळे वैदेही ८९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तेव्हा नातेवाईक, शेजारी आणि साधक यांनी तिचे कौतुक केले. त्या वेळी नातेवाईक म्हणायचे, ‘‘बाबा घरी नसतांनाही मुलीने चांगले गुण मिळवले.’’ ते माझे आणि वैदेहीचे कौतुक करत होते. तेव्हा ‘मी आईचे कर्तव्य पार पाडले’, असे मला वाटले आणि माझा आत्मविश्वास वाढला.

५ ई. वैदेहीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी दोघींनाच सर्व खटाटोप करावा लागणे आणि यातून वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन स्वावलंबी अन् सक्षम होणे ः वर्ष २०११-१२ मध्ये सद्गुरु दादा दक्षिण भारतात प्रसाराला गेले. त्या वेळी आमच्या एका जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. तेव्हा ‘सद्गुरु दादा लग्नासाठी घरी येतील’, असे मला वाटले; पण ते आले नाहीत. सगळे नातेवाईक त्यांची विचारपूस करत होते. त्या सर्वांना उत्तरे देतांना मला नाकीनऊ आले. त्यानंतर वैदेहीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा ‘हे आता तरी घरी येतील’, असे मला वाटले; पण त्यांनी भ्रमणभाषवरून मार्गदर्शन केले. आम्ही दोघींनीच महाविद्यालयात जाऊन प्रवेश अर्ज आणणे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, उदा. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अशी अनेक कागदपत्रे गोळा करणे, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणे, असे सर्व केले. प्रत्येक महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीप्रमाणे कागदपत्रे जोडणे आणि त्या त्या दिवशी जाऊन तेथे जमा करणे, त्याला लागणारी सामुग्री गोळा करणे, अशा अनेक गोष्टी करत असतांना देव मला त्यातून स्वावलंबी बनवत होता. माझ्यात वेगळीच ऊर्जा निर्माण करत होता आणि आम्ही दोघी सक्षम बनत होतो.

६. वैदेहीने पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवणे

६ अ. वैदेहीने शिक्षण मध्येच थांबवून देवद आश्रमात रहायला जाणे आणि एकटी पडल्यामुळे वाईट वाटणे : वर्ष २०१३ – २०१४ मध्ये वैदेहीचे ‘फिजिओथेरपी’ या शाखेतील शिक्षण चालू झाले. वैदेहीने काही दिवसांनी शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला फार वाईट वाटले. मला त्या वेळी तिचा रागही आला. मला वाटत होते, ‘तिने शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर साधना करावी अन् साधकांवर उपचार करावेत’; परंतु देवाची लीला वेगळीच होती. ती शिक्षण सोडून देवद आश्रमात रहायला गेली. तेव्हा मात्र मला पायाखालची भूमी सरकल्यासारखे झाले. थोडे दिवस माझ्या समवेत सासूबाई रहात होत्या. मी स्थुलातून सगळे करत होते; पण मन मात्र दुसर्‍या जगात असायचे.

६ आ. विविध प्रकारच्या सेवा करणे आणि घरी एकटी राहिल्याने ‘देवच सखा नि सोबती आहे’, याची जाणीव होणे : थोड्या दिवसांनी मी कळवा येथे सेवेला जाऊ लागले. तेथे माझ्याकडे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे नवीन वर्गणीदार बनवणे, पंचांग वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे आदी सेवा होत्या. मी त्या सेवांमध्ये मन गुंतवले. सेवेत असल्यामुळे मला आनंदही मिळत होता. थोड्या दिवसांनी सासूबाई नातीच्या बाळंतपणासाठी तिच्याकडे गेल्या. त्या वेळी मी अगदी एकटी पडले. मी सेवा करून आल्यावर घरात बोलण्यासाठी कुणीच नव्हते. त्या वेळी मी देवाशीच बोलत असे. मी माझे सुख-दुःख देवाला सांगत असे. मी बाहेर जातांना देवाला सांगून जायचे. तेव्हा हळूहळू माझ्या लक्षात आले, ‘देवच माझा सखा नि सोबती आहे. दुसरे कुणीही नाही.’

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२०)

म्हणूनच मीनल आनंदी दिसत चालली ।

ज्येष्ठ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२५.६.२०२१) या दिवशी सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांचा तिथीनुसार वाढदिवस होता. त्यानिमित्त परम पूज्य गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना सुचलेली काव्यसुमने येथे दिली आहेत.

लोणचे मुरते तशी साधनेत मुरत चालली ।
स्वभावदोष आणि अहं न्यून करत चालली ।। १ ।।

अनुसंधानात राहून देवाजवळ चालली ।
योग्य दृष्टीकोन घेऊन सेवारत झाली ।। २ ।।

संकलनातील बारकावे शिकू लागली ।
झोकून देऊन सेवा करू लागली ।। ३ ।।

‘भावनाशीलता’ दोषाशी नाते तोडू लागली ।
नात्या-गोत्याकडे साक्षीभावाने पाहू लागली ।। ४ ।।

अपेक्षांचे ओझे अल्प करत चालली ।
म्हणूनच मीनल आनंदी दिसत चालली ।। ५ ।।

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक