शक्तिदेवता !
‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेत आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया. १० ऑक्टोबरला श्री स्कंदमातेची वैशिष्ट्ये आणि तिचे कार्य यांविषयी माहिती पाहिली. आज त्या पुढील माहिती पाहूया.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे भय आणि शोक दूर करणारे ‘कात्यायनी’ रूप !
आश्विन शुक्ल पक्ष षष्ठी (११.१०.२०२१)
१. ‘महर्षि कात्यायन यांनी ‘आदिशक्तीने आपल्या घरी ‘पुत्री’रूपात जन्म घ्यावा’, यासाठी घोर तपश्चर्या करणे, तेव्हा देवीने ‘योग्य वेळ येताच मी जन्म घेईन’, असे आशीर्वचन देणे : ‘महर्षि कत यांचे पुत्र कात्यऋषि आणि कात्यऋषि यांचे पुत्र महर्षि कात्यायन ! महर्षि कात्यायन यांची ‘देवीने त्यांच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा’, अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी आदिशक्तीची कठोर तपश्चर्या केली. महर्षींच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाल्याने आदिशक्तीने ‘योग्य वेळ आल्यावर तुमच्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घेईन’, असे त्यांना सांगितले.
२. महिषासुराचा त्रास वाढल्यावर ब्रह्मा-विष्णु-महेश यांच्या संयुक्त ऊर्जेने कात्यायनी ऋषींच्या आश्रमात देवीची उत्पत्ती होणे : कालांतराने महिषासुराचा त्रास वाढल्याने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या संयुक्त ऊर्जेने जी शक्तीस्वरूपिणीची उत्पत्ती झाली, त्या शक्तीने आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थीला कात्यायन ऋषींकडे जन्म घेतला. देवीने कात्यायन ऋषींकडे जन्म घेतल्याने तिला ‘कात्यायनी’ असे नाव पडले. दुर्गा, भवानी, चामुंडा ही सर्व कात्यायनी देवीचीच रूपे आहेत. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते.
३. कात्यायनी ही भय आणि शोक दूर करणारी देवी आहे. तिनेच महिषासुराचा वध केला.
प्रार्थना
‘हे देवी कात्यायनी, अहंकाराचे दुसरे रूप असलेल्या महिषासुराचा तू नाश केलास. त्याचप्रमाणे आमच्यातील अहंरूपी महिषासुराचा नाश कर. हे देवी, तू शोक दूर करणारी आणि भय नष्ट करणारी आदिशक्ति आहेस. आम्हा साधकांचे सर्व शोक आणि भय दूर कर. एकनिष्ठेने गुरुसेवा करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. तू आम्हाला कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी आवश्यक मानसिक बळ आणि धैर्य दे. हे देवी, पृथ्वीवर आजही महिषासुर वृत्तीचे लोक आहेत, त्यांना येणार्या काळात शिक्षा करून तूच हिंदु राष्ट्राची स्थापना कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (२०.०९.२०२१)