६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रभाकर पिंगळे यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची सून सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे

दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रभाकर पिंगळे (वय ८६ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची सून आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे

३०.९.२०२१ या दिवशी प्रभाकर पिंगळेआजोबा (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचे ढवळी (फोंडा, गोवा) येथे निधन झाले. ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे वडील होत. ११.१०.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची सून आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

श्री. प्रभाकर पिंगळे

१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

१ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आजोबांना भेटायला आल्यावर : ‘२९.९.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पिंगळे आजी-आजोबांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी मला पुढील सूत्रे जाणवली.

१ अ १. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे म्हटल्यावर हात हालवण्याची शक्ती नसूनही आजोबांनी त्यांना नमस्कार करणे : आजोबांशी बोलतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे म्हणत होत्या. त्या वेळी आजोबांनी दोन्ही हात वर करून त्यांना नमस्कार केला. प्रत्यक्षात त्या वेळी आजोबांमध्ये हात हालवण्याचीही शक्ती नव्हती; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव ऐकताच त्यांना बळ मिळाले. या पूर्वीही त्यांच्याकडून असे होत असे.

१ अ २. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपाने प.पू. गुरुदेवच आजोबांना दर्शन देण्यासाठी आले’, असे वाटणे : मला वाटले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या साक्षात् महालक्ष्मी स्वरूप आहेत. त्या श्रीहरि नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रतिनिधी म्हणून आजोबांना भेटायला आल्या. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या रूपाने प.पू. गुरुदेवच आजोबांना दर्शन देण्यासाठी आले.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. निधनाच्या दिवशी जाणवलेले सूत्र

आजोबांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर त्यांच्या स्नुषेने सर्वांना भावजागृतीचे प्रयोग सांगणे आणि त्या वेळी ‘आजोबा अनुसंधानात आहेत’, असे तिला जाणवणे : ३०.९.२०२१ या दिवशी साधारण दुपारी १२ वाजल्यापासून आजोबांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या वेळी मी आजोबांसह सर्वांनाच गुरुदेव आणि ईश्वर यांच्या अनुसंधानात ठेवण्याच्या दृष्टीने भावजागृतीचे प्रयोग अन् प्रार्थना सांगत होते. ‘आजोबांना श्वास घ्यायला त्रास होत असला, तरी ते भावजागृतीचा प्रयोग ऐकत होते आणि ते प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटत होते. मी त्यांना ‘प.पू. गुरुदेवांचे चरण आता तुमच्यासमोर आहेत’, असे सांगितल्यावर त्यांनी दोन्ही हात उंच करून नमस्काराची मुद्रा केली. तेव्हा ‘जणूकाही प.पू. गुरुदेवांनी त्यांना दर्शन दिले’, असे मला वाटले. त्यांची शारीरिक स्थिती ठीक नव्हती, तसेच त्यांना अधूनमधून शुद्ध नव्हती, तरीही ‘ते आंतरिक अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्याकडून ही कृती झाली’, असे मला वाटले.

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे

३. निधन

३ अ. भाववृद्धी सत्संग चालू असतांना ‘सत्संगाच्या माध्यमातून जणूकाही आजोबा प.पू. गुरुदेवांना भेटण्यासाठी भूवैकुंठात गेले’, असे जाणवणे : आजोबांचे निधन झाले, त्या दिवशी भाववृद्धी सत्संग होता. भाववृद्धी सत्संग चालू असतांना आजोबांची शारीरिक स्थिती खालावत चालली होती; पण ‘या सत्संगाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि गुरुदेव यांचे चैतन्य आजोबांना मिळावे’, या दृष्टीने मी भाववृद्धी सत्संग भ्रमणभाषवर मोठ्या आवाजात लावला होता. या सत्संगात प्रारंभी भावजागृतीचा प्रयोग घेण्यात आला. तो ऐकल्यानंतर मला वाटले, ‘साक्षात् श्रीविष्णूने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आजोबांसाठी या सत्संगाचे नियोजन केले आहे. त्या सत्संगाच्या माध्यमातून जणूकाही आजोबा प.पू. गुरुदेवांना भेटण्यासाठी भूवैकुंठात गेले.’

३ आ. सत्संगाच्या अंती कृतज्ञतागीत चालू असतांना आजोबांचे देहावसान झाल्यावर ‘आजोबांनी श्रीविष्णूच्या चरणी देह ठेवून कृतज्ञता व्यक्त केली’, असे वाटणे : सत्संगाच्या अंती कृतज्ञतागीत चालू असतांना आजोबांचे देहावसान झाले. जसे शुकदेव सांगत असलेल्या भागवताच्या समाप्तीच्या वेळी राजा परीक्षिताने देहत्याग केला आणि त्याला मोक्षप्राप्ती झाली, तसे ‘या सत्संगाच्या अंती आजोबांनी भगवान श्रीविष्णूच्या चरणी देह ठेवून कृतज्ञता व्यक्त केली’, असे मला वाटले.

३ इ. गुरुकृपेने कोणताही त्रास न होता आजोबांनी शांतपणे देह ठेवणे : भाववृद्धी सत्संग चालू असतांना वातावरणातील चैतन्यामुळे, तसेच तेथील प.पू. गुरुदेवांच्या सूक्ष्मातील अस्तित्वामुळे आजोबांनी शांतपणे देह ठेवला. मृत्यूसमयी त्यांना कोणताही त्रास झाला नाही. ही गुरुदेवांची कृपाच होती.

श्रीमती कमलिनी प्रभाकर पिंगळे

४. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

४ अ. आजोबांचे निधन झाल्यानंतर २ – ३ घंट्यांनी त्यांचा तोंडवळा आणि नाक यांवर एकेक दैवी कण आढळला.

४ आ. त्यांचा तोंडवळा हसरा, सात्त्विक, शांत आणि तेजस्वी दिसत होता.

४ इ. पिंगळेआजींना २ – ३ वेळा अष्टगंधाचा सुगंध आला.

४ ई. आजोबांच्या पार्थिवाजवळ रात्रभर बसलेल्या साधकांना ‘खोलीत चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे वाटणे : आजोबांचे पार्थिव रात्रभर खोलीत ठेवले होते. त्या ठिकाणी २ साधक रात्रभर बसले होते; पण त्यांना तेथील वातावरणात दाब जाणवला नाही किंवा भीती वाटली नाही. उलट साधकांना ‘खोलीत चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. त्यामुळे त्यांना झोप आली नाही किंवा थकवा जाणवला नाही.

४ उ. आदल्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ येऊन गेल्याने खोलीतील वातावरण चैतन्यमय झाले होते. त्यामुळे मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.

४ ऊ. आजोबांच्या देहावसानानंतर २० घंट्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यावर सद्गुरु डॉ. पिंगळे आणि त्यांच्या पत्नी यांना ‘आजोबांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे जाणवणे : आजोबांचे निधन झाल्यानंतर घरातील अन्य कुटुंबीय येईपर्यंत, तसेच अंत्यविधी चालू होईपर्यंत जवळपास २० घंट्यांहून अधिक वेळ त्यांचे पार्थिव खोलीत होते. त्या वेळी आजोबांकडे पाहून मला ‘त्यांचे देहावसान झाले आहे’, असे वाटत नव्हते. ‘ते शांतपणे झोपले आहेत’, असे मला वाटत होते. त्यांची दृष्टी ऊर्ध्व दिशेला होती. ‘ते अधूनमधून डोळे किलकिले करून पहात असून त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका गोवा येथे पोचले. तेव्हा त्यांना आजोबांकडे पाहून ‘आजोबा शांतपणे आनंदाने झोपले आहेत’, असे वाटले, तसेच ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असून ते आपल्याकडे पहात आहेत आणि आपले बोलणे ऐकत आहेत’, असे जाणवले. आजोबांचा मोठा मुलगा, सून, नातू, मुलगी आणि जावई आल्यानंतर त्यांनाही ‘आजोबा शांतपणे झोपले आहेत’, असेच वाटत होते.

४ ए. आजोबांच्या देहाचा स्पर्श अत्यंत मऊ लागणे : त्यांचे निधन होऊन २० घंट्यांहून अधिक कालावधी झाल्यानंतर क्रियाकर्म करण्यापूर्वी त्यांचे कपडे पालटतांना त्यांच्या देहाचा स्पर्श अत्यंत मऊ लागत होता. त्यांचे हात आणि पाय आपण जसे हलवू, तसे हालत होते. त्यांच्या देहाला कडकपणा आला नव्हता. त्यांचे तळहात आणि तळपाय मऊ होते.

४ ऐ. ‘त्यांच्या देहाला दुर्गंधी येणे, देहाच्या आजूबाजूला किडे किंवा मुंग्या येणे’, असे काहीच झाले नाही.

४ ओ. पिंगळेआजींचे सौभाग्यालंकार काढतांना त्यांच्या आजूबाजूला फुलपाखरू वावरत होते. ‘जणू फुलपाखराच्या माध्यमातून तेथे देवतांचे अस्तित्व होते. त्यामुळे या प्रसंगातही आजी स्थिर राहू शकल्या’, असे मला जाणवले.

४ औ. अस्थीविसर्जन झाल्याक्षणी पाऊस आल्यावर ‘जणूकाही वरुणदेवतेने आशीर्वाद दिला’, असे जाणवणे : आम्ही तिसर्‍या दिवशी आजोबांची रक्षा आणि अस्थी यांचे विसर्जन करण्यासाठी हरवळे (गोवा) येथे गेलो होतो. अस्थीविसर्जन झाल्याक्षणी थेंब थेंब पाऊस चालू झाला. नंतर लगेच ढगांचा गडगडाट होऊन जोरात पाऊस चालू झाला. तेव्हा मला वाटले, ‘जणूकाही वरुणदेवतेने आशीर्वाद दिला.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे (कै. प्रभाकर पिंगळे यांची धाकटी सून), मंगळुरू, कर्नाटक. (६.१०.२०२१)


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पिंगळे आजोबांच्या निधनाच्या आदल्या दिवशी आजी-आजोबांविषयी सांगितलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

पिंगळे आजोबांच्या निधनाच्या आदल्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पिंगळेआजी-आजोबांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी आजी-आजोबांच्या साधनेविषयी पुढील सूत्रे सांगितली.

१. येथे ‘पिंगळेआजोबा रुग्णाईत आहेत’, असे वाटत नाही.

२. खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवत आहे.

३. येथे प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत आहे.

४. आजोबा आणि आजी (सौ. कमलिनी पिंगळेआजी (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)) यांची आंतरिक साधना चांगली चालू आहे.

५. आजोबा अंतरातून प.पू. गुरुदेवांशी जोडले आहेत.

६. आजींच्या तोंडवळ्यातही साधनेमुळे चांगला पालट झाला आहे.


यजमानांच्या अंत्यसमयीही गुरुकृपेने स्थिर रहाणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कमलिनी पिंगळेआजी (वय ७८ वर्षे) !

१. ‘पिंगळेआजोबा शेवटचे श्वास घेत असतांना पिंगळेआजी स्थिर होत्या.

२. ‘आजोबांचा मृत्यू पलंगावर व्हायला नको’, यासाठी त्यांना पलंगावरून उचलून भूमीवर घेण्यास स्वतःहून साहाय्य करणे

आजींच्या लक्षात आले, ‘आता आजोबा या लोकात नसणार.’ त्या वेळी आजोबा पलंगावर झोपले होते. आजींनी आम्हाला सांगितले, ‘‘आपण आजोबांना उचलून भूमीवर ठेवूया. त्यांचे प्राण पलंगावर जायला नकोत.’’ त्यांनी स्वतः आजोबांना पलंगावरून उचलून खाली ठेवण्यास साहाय्य केले. या प्रसंगातून त्यांच्यातील ‘सतर्कता आणि स्थिरता’ हे गुण माझ्या लक्षात आले.

३. ‘आजी सर्व प्रसंगांत ईश्वरेच्छेने वागत आहेत’, असे जाणवणे

नंतरच्या सर्व प्रसंगांतही आजी स्थिर होत्या. सनातन पुरोहित पाठशाळेतील साधकांनी आजींना सांगितले, ‘‘तुमच्या काही पद्धती असतील, तर सांगा. आपण त्याप्रमाणे करूया.’’ तेव्हा पिंगळेआजींनी ‘सर्व विधी इथल्या पद्धतीप्रमाणे होऊ देत’, असे सांगितले. ‘आजी या सर्व प्रसंगांत ईश्वरेच्छेने वागत आहेत’, असे मला जाणवले.

४. ‘या प्रसंगात प.पू. गुरुदेवांनीच त्यांना बळ दिले आहे’, असे मला जाणवले.

‘साधना असेल, तर जीवनातील सर्वांत कठीण प्रसंगातही कशी स्थिरता असते, तसेच प.पू. गुरुदेवांची शिकवण किती थोर आहे !’, हे या प्रसंगातून मला शिकायला मिळाले.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे (६.१०.२०२१)

कै. प्रभाकर पिंगळेआजोबा यांच्या नातेवाइकांनी सनातन पुरोहित पाठशाळेतील साधकांचे केलेले कौतुक !

‘कै. प्रभाकर पिंगळेआजोबांचे विधी सनातन पुरोहित पाठशाळेतील साधकांनी केले. हे सर्व विधी पाहून माझे दीर, तसेच अन्य नातेवाईक यांनी पुरोहित साधकांचे कौतुक केले. त्या सर्वांनी सांगितले, ‘‘असे विधी अन्य कुठेही होत नाहीत. पुरोहित साधकांनी सर्व शास्त्र सांगून विधी केल्याने प्रत्येक कृतीमागील शास्त्र आमच्या लक्षात आले. ते आतापर्यंत आम्हाला ठाऊक नव्हते. त्यामुळे पुढील सर्व विधी गोवा येथेच करूया.’’ त्यानंतर सर्वांनी प.पू. गुरुदेव, आश्रमातील साधक आणि पुरोहित साधक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे (६.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक