माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद !

  • मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याचे प्रकरण

  • भाविकांच्या संघटित लढ्याला यश

  • स्वतःच्या श्रद्धास्थानांचे पावित्र्य जपण्यासाठी चिकाटीने लढा देणारे माहीम येथील भाविक आणि मनसेचे कार्यकर्ते यांचे अभिनंदन ! असे जागरूक हिंदू, हेच हिंदु धर्माची शक्ती आहेत. सर्वत्रच्या हिंदूंनी यातून प्रेरणा घ्यावी ! – संपादक 
  • या प्रकरणातील दोषींना शिक्षा होईपर्यंत भाविकांनी हा लढा चालूच ठेवावा ! – संपादक 
माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान काशी विश्वेश्वर मंदिर

मुंबई, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी भाविक श्री. प्रसाद ठाकूर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. मूर्ती गायब झाल्याचे उघडकीस आल्यानंतर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी भाविक आणि मनसेचे नेते मागील २ मासांपासून करत होते. त्यांच्या या लढ्याला यश आले आहे.

श्री. प्रसाद ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की,

१. फेब्रुवारी २०१३ मध्ये मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याच्या नावाखाली संस्थेच्या विश्वस्तांनी श्री पार्वतीदेवी आणि श्री शीतलादेवी यांच्या मूर्ती, तसेच शिवलिंग, दगडी कासव अन् नंदी हे भग्न पावले असल्याचे सांगून ते पालटले.

२. ‘पालटलेल्या जुन्या मूर्ती कुठे गेल्या ?’, याविषयी मागील अनेक वर्षे मी (प्रसाद ठाकूर) विश्वस्तांकडे पाठपुरावा करत होतो; मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे वर्ष २०१९ च्या जुलै मासामध्ये मी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

३. मूर्तींचा जीर्णाेद्धार करतांना विश्वस्तांनी त्या मूर्तींचे कोणत्याही तज्ञांकडून निरीक्षण केले नव्हते, तसेच संबंधित शासकीय कार्यालयातून अहवालही घेतला नव्हता.

४. जीर्णाेद्धार करण्यात आलेल्या मूर्तींपैकी श्री पार्वतीदेवी आणि श्री शीतलादेवी यांच्या मूर्ती देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष गणपति भट्टे यांच्या शेतातील घरात (‘फार्म हाऊस’मध्ये) अनधिकृतपणे ठेवण्यात आल्या होत्या. ‘विश्वस्त सतीश परळकर यांच्या सांगण्यावरून त्या गुपचूप मंदिराच्या कार्यालयात आणून ठेवण्यात आल्या’, असा जबाब गणपति भट्टे यांचे बंधू संदेश भट्टे यांनी दिला आहे.

५. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानुसार श्री पार्वतीदेवी आणि श्री शीतलादेवी यांच्या मूर्ती भग्न किंवा जीर्ण झालेल्या नव्हत्या.

६. विश्वस्तांनी शिवपिंडीचे विसर्जन केले असल्याचे सांगितले; मात्र त्याची छायाचित्रे त्यांनी दाखवलेली नाहीत, तसेच विसर्जनाचे ठिकाणही त्यांना अद्याप सांगता आलेले नाही. ‘दगडी कासव पालटण्यात आलेले नाही’, अशी खोटी माहिती देऊन विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांचीही दिशाभूल केली आहे.

७. विश्वस्तांनी पोलिसांना सादर केलेल्या सभेच्या इतिवृत्तामध्ये खाडाखोड आहे, तसेच त्यावरील स्वाक्षर्‍याही नंतर चिकटवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे विश्वस्तांनी पोलीस आणि धर्मादाय आयुक्त यांना खोटी माहिती देऊन त्यांची फसवणूक केली आहे.

८. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून शिवलिंग आणि दगडी कासव यांचे विसर्जन न करता त्यांचा व्यवहार झाल्याचा (त्या विकल्या गेल्याचा) संशय व्यक्त केला आहे. विश्वस्त श्रीमती शैला पठारे आणि संजीव परळकर यांनी धर्मादाय आयुक्तांना चुकीची माहिती देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वस्तांनी पुरातन पाषाणमूर्तींचा गैरव्यवहार करण्याच्या हेतूने त्या संशयास्पदरित्या मंदिराच्या बाहेर पाठवल्या.

प्रसाद ठाकूर आणि मनसेचे पदाधिकारी यांनी दिला चिकाटीने लढा !

या प्रकरणी भाविक श्री. प्रसाद ठाकूर, मनसेचे माजी नगरसेवक श्री. मनीष चव्हाण आणि मनसेचे माहीम येथील विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेकर यांनी चिकाटीने लढा दिला. मूर्तींचे मूल्यांकन झाले नसल्याचे कारण पुढे करून माहीम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. याविषयी श्री. प्रसाद ठाकूर यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त, तर श्री. यशवंत किल्लेदार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतरही पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे ७ ऑक्टोबर या दिवशी त्यांनी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. ‘यानंतरही कारवाई झाली नाही, तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी देण्यात आली होती.

भाविक श्री. प्रसाद ठाकूर यांच्याकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभिनंदन !

तक्रारदार भाविक श्री. प्रसाद ठाकूर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभिनंदन केले. दैनिक ‘सनातन प्रभात’ने सातत्याने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वस्त आणि तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका, तसेच धर्मादाय आयुक्तांनी सादर केलेल्या चौकशी अहवालातील गंभीर सूत्रे आदींना दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ठळक प्रसिद्धी दिली. याकरता श्री. ठाकूर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अभिनंदन केले.