रामनाथी आश्रमात आल्यावर अकस्मात् साधिकेचा घसा पुष्कळ दुखू लागणे आणि वेगवेगळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय भावपूर्ण रितीने केल्यावर, तसेच यज्ञाला बसल्यावर तिची घसादुखी पूर्णपणे थांबणे
२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…
१. रामनाथी आश्रमात आल्यावर साधिकेचा घसा पुष्कळ दुखू लागणे आणि ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे घसा दुखत आहे’, हे तिच्या लक्षात येणे
‘मी ऑक्टोबर २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी रहायला आले होते. आश्रमात आल्यानंतर पहिल्याच दिवशी माझा घसा पुष्कळ दुखू लागला. मला हे अनपेक्षित होते; कारण या काही दिवसांत ‘घशाचा त्रास होईल’, असे कोणतेच पदार्थ मी खाल्ले नव्हते किंवा थंड पेयही प्यायले नव्हते. तिसर्या दिवशी मला आश्रमातील एका सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. सत्संगाला गेल्यावर ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण पुष्कळ वाढले आहे’, त्यामुळे ‘माझा घसा दुखत आहे’, हे माझ्या लक्षात आले.
२. घसादुखी न्यून होण्यासाठी साधिकेने केलेले विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय
घसादुखी न्यून होण्यासाठी मी विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. या उपायांमुळे माझी घसादुखी ६० टक्के न्यून झाली.
२ अ. मीठ-पाण्याचे उपाय
२ अ १. त्रासदायक आवरण आल्याने साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातील अस्तित्व न जाणवणे, त्यामुळे नामजपाचा आरंभ करण्यापूर्वी तिने श्री दत्तगुरु आणि परात्पर गुरुदेव यांना प्रार्थना करणे : प्रथम मी मीठ-पाण्याचे उपाय करायचे ठरवले. त्या वेळी माझ्यावर त्रासदायक आवरण असल्याने मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवत नव्हते. त्यामुळे नामजपाचा आरंभ करण्यापूर्वी मी श्री दत्तगुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर यांना प्रार्थना केली, ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे अन् मला तुमच्या चरणांपाशी स्थान मिळू दे.’
२ अ २. साधिकेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना ठेवलेला भाव आणि त्यामुळे झालेले लाभ ! : मीठ-पाण्याचे उपाय करतांना मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. त्या वेळी मी ‘श्री दत्तगुरु माझ्या समोर उभे असून त्यांच्या हातातील सुदर्शन चक्रातून माझ्याकडे चैतन्य प्रवाहित होत आहे आणि माझ्या घशावर आध्यात्मिक स्तरावरील लाभ होत आहेत’, असा भाव ठेवला होता. काही वेळाने मला माझ्या घशात संवेदना जाणवू लागल्या आणि घशात काहीतरी अडकल्यामुळे ‘उलटी होईल’, असे वाटू लागले.
‘भाव ठेवल्यामुळे मला लाभ होत आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे काही वेळाने मी पुन्हा हा भाव ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. त्या वेळी मला माझ्या अनाहत चक्रावर (छातीवर) दाब जाणवू लागला.
२ अ ३. साधिकेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लिहिलेला हार स्वतःच्या गळ्यात घातला आहे’, असा भाव ठेवल्यावर तिला ढेकर येणे : काही वेळाने ‘वरीलप्रमाणे भाव ठेवूनही माझा आध्यात्मिक त्रास न्यून होत नाही’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप लिहिलेला हार माझ्या गळ्यात घातला आहे’, असा भाव ठेवला. त्या वेळी मला पुन्हा पूर्वीप्रमाणेच घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटून ‘उलटी होईल’, असे वाटू लागले. या वेळी मला एक मोठी ढेकर आली आणि बरे वाटले.
२ अ ४. साधिकेने स्वतःच्या गळ्याभोवती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असे सोनेरी अक्षरांत लिहिले असून ही अक्षरे तेजस्वी होत आहेत’, असा भाव ठेवल्यावर तिला पुष्कळ बरे वाटणे : नंतरच्या वेळी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना मी ‘माझ्या गळ्याभोवती सोनेरी अक्षरांत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असे लिहिले आहे आणि श्री दत्तगुरूंच्या हातातील सुदर्शनचक्राच्या चैतन्याने ही अक्षरे तेजस्वी होत आहेत’, असा भाव ठेवला. त्या वेळी मला पुन्हा ‘घशात काहीतरी अडकले असून त्यामुळे ‘उलटी होईल’, असे वाटू लागले. यानंतर मला पुष्कळ बरे वाटले आणि माझी घसादुखी थोडी उणावली.
२ आ. उदबत्तीने आवरण काढण्याचा उपाय : मीठ-पाण्याचे उपाय झाल्यानंतर मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत उदबत्तीने माझ्यावरील त्रासदायक आवरण काढले. त्या वेळी माझे डोके थोडे दुखून माझ्या विशुद्धचक्रावर संवेदना जाणवल्या.
२ इ. रिकाम्या खोक्याचा उपाय : उदबत्तीचे उपाय झाल्यावर मी रिकाम्या खोक्याचा उपाय केला. माझा घसा दुखत असल्याने मी माझ्या विशुद्धचक्राच्या समोर एक रिकामा खोका धरला आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागले.
१. उपाय करतांना ‘या खोक्यात प्रत्यक्ष श्री दत्तगुरु उभे आहेत आणि त्यांच्या हातातील सुदर्शन चक्रातून माझ्या घशाच्या दिशेने चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असा मी भाव ठेवला. पूर्वीप्रमाणेच या वेळीही मला घशावर संवेदना जाणवल्या आणि काही वेळाने मला ढेकर आली.
२. रिकाम्या खोक्याचा उपाय अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने मी ‘रामनाथी आश्रमात असलेल्या ध्यानमंदिरातील सर्व देवता या खोक्यात बसल्या आहेत आणि त्यांच्या चित्रांतून चैतन्याचा पिवळसर प्रकाश माझ्या विशुद्ध चक्राकडे येत आहे’, असा भाव ठेवला. देवाच्या कृपेने काही क्षणांतच मला बरे वाटले.
या सर्वांमुळे माझी घसादुखी ६० टक्के बरी झाली.
३. यज्ञोपाय – रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञाला गेल्यावर ‘यज्ञातील चैतन्यामुळे स्वतःवर आध्यात्मिक स्तरावरील लाभ होत आहेत’, याची जाणीव होऊन घसादुखी पूर्ण थांबणे
याच कालावधीत मला आश्रमात होत असलेल्या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. यज्ञस्थळी नामजपादी उपायांसाठी बसल्यावर मला सतत खोकला येत होता आणि माझ्या डोळ्यांतून पाणीही येत होते. त्या वेळी ‘यज्ञातील चैतन्यामुळे मला लाभ होत आहे’, याची मला जाणीव झाली. यज्ञामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि औषधोपचार यांमुळे माझा घसा दुखायचा पूर्णपणे थांबला.
श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. अमृता निवरगी, भारत (१५.११.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |