लोकप्रतिनिधींचा राजकीय ‘लसोत्सव’ !

नोंद 

कोरोनामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते, त्या वेळी काही जणांनी निरपेक्ष हेतूने, तर काहींनी स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी समाजसाहाय्याचे धोरण अवलंबले. आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी नागरिकांची प्रलंबित कामे, कार्यकर्त्यांचे वाढदिवस आदींवर नेतेमंडळी भर देत आहेत, तर दुसरीकडे सार्वजनिक उत्सवांसाठी सहस्रो रुपयांच्या देणग्या देऊन युवकांना खुश केले जात आहे. त्यातच भर पडली आहे, ती ‘लसीकरणा’ची !

सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लोकप्रतिनिधींकडून शहरातील गल्लीबोळातून राजकीय ‘लसोत्सव’ (लसीकरणाची शिबिरे) साजरा केला जात आहे. या शिबिरांद्वारे ‘ताई, माई, आक्का, विचार करा पक्का’ अशी साद घातली जात आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी रिक्शा, दुचाकी आणि चारचाकी वाहने यांचीही व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी निवडणूकपूर्व हंगामी समाजसेवा चालू केली आहे कि काय ? असा प्रश्न येत आहे. लसीकरणाची माहिती देण्यासाठी लावलेल्या इच्छुकांकडून फलकांवर नेते, कार्यकर्ते आणि स्वत:चे छायाचित्र प्रसिद्ध केले जात आहे. त्यावर ‘संयोजक’, ‘आधारस्तंभ’, ‘युवा नेतृत्व’, ‘आशास्थान’ अशी बिरुदावली लावली जात आहेत. लसीकरण शिबिरांमुळे नागरिकांना लस कोणत्याही त्रासाविना मिळणार असली, तरी उमेदवारांची ही निवडणूकपूर्व रंगीत तालीम चालू असल्याचे कुणी म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

लोकशाहीतील हा ‘लसोत्सव’ इच्छुक उमेदवारांसाठी राजकीय पर्वणी असला, तरी सूज्ञ नागरिकांनी मात्र मतदान करतांना पात्र उमेदवारांना निवडून देणे आवश्यक आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न, लोकप्रतिनिधींची कर्तव्ये यांविषयी जाणीव करून देणेही महत्त्वाचे आहे, तरच लोकप्रतिनिधींचा हा राजकीय ‘लसोत्सव’ खर्‍या अर्थाने सत्कारणी लागला, असे म्हणता येईल.

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा