पर्यटनबंदी असतांना वरिष्ठ अधिकार्‍यांची ओळख सांगणार्‍या नातेवाइकांना वनअधिकार्‍यांनी सिंहगड किल्ल्यावर सोडले !

‘सामान्यांना सजा आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नातेवाइकांची मजा’, हे चित्र पालटायला हवे, यासाठी धर्माधिष्ठित तत्त्वनिष्ठ अधिकारी हवेत. – संपादक 

सिंहगड

किरकिटवाडी (पुणे) – १६ जुलै २०२१ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सिंहगड किल्ल्यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या बंदीचा आदेश लागू केला आहे; मात्र असे असतांनाही वरिष्ठ अधिकार्‍यांची ओळख असल्याचे सांगून अधिकार्‍यांचे नातेवाईक गडावर फिरून येतात आणि सामान्य पर्यटकांना पोलीस अन् वनविभागाचे कर्मचारी परत पाठवत असल्याने पर्यटनबंदीच्या आदेशाविषयी प्रशासनाची दुटप्पी भूमिका असल्याचे दिसून येते.

स्थानिक रहिवासी, व्यावसायिक, पर्यटक, गडप्रेमी, ‘ट्रेकर्स’ अशा सर्वांकडून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी होत आहे. यावर ‘कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घेऊन सिंहगड पर्यटकांसाठी खुला करण्याचा विचार करू’, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.