(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

‘मान्यवर’च्या कपड्यांच्या विज्ञापनामध्ये ‘कन्यादाना’ला प्रतिगामी ठरवण्याचा प्रयत्न !

  • हिंदूंचे धर्मशास्त्र, तसेच प्रथा आणि परंपरा यांच्यावर आघात करून हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या आस्थापनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकणे आवश्यक ! – संपादक
  • हिंदु चालीरितींवर टीका केल्यास सहज आणि व्यापक प्रसिद्धी मिळते, हे हिंदुद्वेष्ट्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच हिंदूंच्या धार्मिक भावना वारंवार पायदळी तुडवल्या जातात. हिंदूंच्या श्रद्धांवर अन् त्या माध्यमांतून हिंदूंच्या मनावर आघात करणार्‍यांच्या विरोधात आता सरकारने राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा करावा, असेच व्यथित झालेल्या हिंदूंना वाटते ! – संपादक
  • हिंदूंनी केलेल्या साहाय्यामुळेच ‘कन्यादान’ आस्थापनाचा व्यवसाय नावारूपाला आला आहे, हे आस्थापनाने विसरू नये ! त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याने आस्थापनाने हिंदूंची सार्वजनिक क्षमायाचना करावी ! – संपादक
  • हिंदूंच्या धर्मशास्त्रातील गोष्टी पालटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कारागृहात टाका – संपादक

मुंबई – हिंदु संस्कृतीमध्ये कन्यादानाला सर्वांत मोठे पुण्य समजले जाते. कपड्यांसाठी प्रसिद्ध आस्थापन समजल्या जाणार्‍या ‘मान्यवर’चे याच धर्तीवर एक विज्ञापन प्रसारित झाले आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंच्या ‘कन्यादान’ या विधीला प्रतिगामी ठरवण्यात आले असून त्याऐवजी ‘कन्यामान’ हा शब्द सुचवण्यात आला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून सामाजिक माध्यमांतून या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. ‘अभिनेत्री आलिया भट्ट आणि ‘मान्यवर’ आस्थापन यांवर बहिष्कार टाका’, अशी मागणी करण्यात येत आहे.

या विज्ञापनामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट नववधूच्या रूपात मंडपात बसली असून ती तिच्या पूर्वजीवनातील प्रसंगांचे कथन करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्या प्रसंगांमध्ये तिचे कुटुंबीय तिला ‘तू परक्याचे धन आहेस, तुला सासरी जायचे आहे’, अशी जाणीव करून देत असल्याचे ती सांगत आहे. त्यावर ती ‘माझे कन्यादान का केले जाते ? मी काय दान करण्याची वस्तू आहे का ?’, असे प्रश्न विचारते. त्याच्या पुढे जाऊन ती ‘आता नवीन संकल्पना रूढ करूया. कन्यादान नाही, तर कन्यामान !’, असे भाष्य करते.
वारंवार हिंदु प्रथा आणि परंपरा यांना विविध माध्यमांतून लक्ष्य करण्यात येत असल्याची भावना हिंदूंकडून व्यक्त होत आहे. काहींनी या विज्ञापनाला ‘फेक फेमिनिझम्’ (खोटी स्त्री-पुरुष समानता), असे म्हटले आहे. एकाने सामाजिक माध्यमावर म्हटले आहे की, काही आस्थापने हिंदु धर्माच्या महान परंपरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत असून अन्य धर्मांच्या अत्याचारी प्रथांकडे मात्र दुर्लक्ष करत असतात. विरोधानंतर ‘मान्यवर’ आस्थापनाने दावा केला आहे की, ‘कन्यामान’ ही लग्नाच्या विधींना नवीन वळण देते आणि वधूंना सोडून देण्याऐवजी त्यांचा आदर करण्याच्या कल्पनेवर प्रकाश टाकते. (हिंदूंच्या धार्मिक विधींचा कणमात्र अभ्यास नसलेल्या ‘मान्यवर’ आस्थापनाचा निषेध ! – संपादक)

कन्यादान म्हणजे काय ?

कन्यादान म्हणजे, कन्येचे दान करणे होय. विवाहाच्या वेळी प्रत्येक पिता त्याच्या मुलीचा हात वराच्या हातामध्ये सोपवतो. त्यानंतर मुलीचे सर्व दायित्व वराला पार पाडावे लागते. वेद आणि पुराण यांच्याप्रमाणे वराला भगवान श्रीविष्णूचा दर्जा देण्यात आला आहे. सनातन संस्कृतीप्रमाणे कन्यादानाचे सौभाग्य प्राप्त होणार्‍या मुलीच्या आई-वडिलांना नशीबवान समजले जाते.