आरोग्य खात्याकडून कोरोनामुळे झालेल्या ६८ मृत्यूंची नोंद विलंबाने घोषित !

अशा त्रुटी कशा रहातात ? जवळपास वर्षभराच्या नोंदी न मिळणे लज्जास्पद ! संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पणजी – ऑगस्ट २०२० ते जून २०२१ या जवळपास ११ मासांच्या कालावधीत कोरोनामुळे झालेल्या ६८ मृत्यूंची नोंद दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाने विलंबाने कळवली आहे. ही संख्या आता आरोग्य खात्याने त्यांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत अंर्तभूत केली आहे. या वाढीमुळे १४ सप्टेंबरला एकूण मृत्यूंची संख्या ३ सहस्र २१९ वरून ३ सहस्र २८९ झाली.

न्यायवैद्यक विभागाने मृतांची संख्या न कळवल्याने घोळ ! – डॉ. कुरैया

विलंबाने घोषित केलेले कोरोनाबाधित ६८ मृत हे रुग्णालयातील नसून पोलिसांच्या प्रकरणांमधील आहेत. रस्त्यावर किंवा अपघातात, तसेच अन्य कारणांनी मृत पावलेल्या व्यक्तींपैकी ६८ व्यक्ती कोरोनाबाधित होत्या; मात्र या कोरोनाबाधित मृतांची संख्या आरोग्य खात्याला न्यायवैद्यक विभागातून दिली गेली नसल्यामुळे हा घोळ झाला. ही संख्या सादर करण्याचे दायित्व दक्षिण गोवा रुग्णालयाचे नव्हते, तर पोलीस किंवा न्यायवैद्यक विभागाचे होते, असे दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. दीपा कुरैय्या यांनी सांगितले.