‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा सनातन संस्थेशी संबंध वयाच्या ६२ व्या वर्षी, म्हणजे १९९७ पासून आला. तत्पूर्वी मी अन्य एका आध्यात्मिक संस्थेच्या संपर्कात होतो; पण त्यांच्या प्रवचनातून मला ‘साधना म्हणून काय करायचे ?’, हे कळत नव्हते. ‘अध्यात्म म्हणजे कृतीचे शास्त्र आहे’, हे समजल्याने मी सनातन संस्थेकडे आकृष्ट झालो. आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत आणि आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचा इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील गद्रे दत्त मंदिरामध्ये सत्संग चालू होता. त्यांच्या सत्संगाने अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची तीव्र इच्छा फलद्रूप झाली. अगदी सोप्या भाषेत अध्यात्मशास्त्र समजले आणि सेवारत झालो.
१. देवाच्या कृपेमुळे सनातन संस्थेचे कार्यालय घरी चालू झाल्याने घरच आश्रम होणे
मला ग्रंथविक्रीची (वितरणाची) सेवा करण्याची संधी मिळाली. १६.११.१९९७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम इचलकरंजी येथे व्यंकटराव हायस्कूलमध्ये झाला. त्यामुळे समाजामध्ये संस्थेचा परिचय झाला आणि पुष्कळ लोक संस्थेविषयी चौकशी करू लागले. त्या वेळी आमच्या घरीच संस्थेचे कार्य चालू झाले. आम्ही घरी दोघेच पती-पत्नी आहोत. आमची साधना चालू झाल्याने अनेक साधक येऊ लागले आणि घराला आश्रमाचे स्वरूप प्राप्त झाले.
२. गुरुकृपेमुळे सनातनच्या विविध कार्यांत सहभागी होता येणे
गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी अर्पण मिळवण्याची सेवा मिळाली. ती सेवा देवाने माझ्याकडून १० ते १२ वर्षे करवून घेतली. त्यानंतर ग्रंथ वितरणाची सेवाही शिकलो. समष्टी साधनेचा भाग म्हणून आम्ही दोघे पती-पत्नी १५ ते २० साधक समवेत घेऊन त्या काळी प्रभातफेरीचे आयोजन करत असू. पहाटे ६ वाजता १ तास गावातून निरनिराळ्या भागांत संस्थेचा प्रसार करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक वितरण करणे, सामूहिक नामजप चालू करणे, या सेवांच्या माध्यमातून माझा सनातनमध्ये सहभाग वाढला.
३. संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी झाल्याने पोलिसांची वाटणारी भीती जाणे
गावागावांत होणार्या यात्रा, दत्तजयंती, महाशिवरात्र, दसरा, दिवाळी आदी उत्सवांच्या वेळी ग्रंथ वितरणकक्ष उभारण्यास साहाय्य करत होतो. पोलीस कचेरीत जाण्यास मला भीती वाटायची; पण संस्थेच्या उपक्रमांसाठी लागणारी अनुमती काढण्यासाठी वरचेवर साधकांसमवेत गेल्यामुळे भीती पार निघून गेली.
४. गुरूंच्या कृपेमुळे विविध मार्गदर्शकांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून निराशा दूर होणे
संस्थेचे १९९९ ते २००५ पर्यंत असणारे विविध मार्गदर्शक साधक आणि सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आदींचा सत्संग लाभला. त्यांच्या सान्निध्यामुळे माझी प्रगती होत गेली. जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून निराशा दूर झाली. सांगितलेली सूत्रे कृतीत आणल्यामुळे आज्ञापालन होऊ लागले.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’ची आवृत्ती चालू झाल्यावर विविध सेवा उपलब्ध होणे आणि दैनिकाच्या माध्यमातून साधना कृतीच्या स्तरावर सुलभ होणे
दैनिक ‘सनातन प्रभात’ची पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती चालू झाल्यानंतर पत्नी सौ. रजनी जाधव दैनिकाची सेवा करत असे. विशेषांकांचे गठ्ठे घरीच येत असत त्यांची वर्गवारी करणे, शिक्के मारणे, काही विशेषांकांचे स्वतः वितरण करणे इत्यादी सेवा आम्हाला करता आल्या. दैनिकात येणार्या साधनेच्या चौकटी, आणि साधना करतांना येणार्या अडचणी यांवर मार्गदर्शन मिळू लागले अन् सांगितलेली साधना कृतीत आणणे सुलभ झाले.
६. आध्यात्मिक त्रासावर नामजपादी उपाय करायचे ज्ञात नसतांना देवाने ते शिकवून करवून घेणे
प्रतिदिन मी मीठ-पाण्याचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू लागलो. घरामध्ये सनातननिर्मित उदबत्ती लावणे आणि शरिराभोवती मंडल काढणे अन् त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, कापराचा सुगंध घेणे इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे माझ्या शारीरिक आणि मानसिक व्यथा पूर्णपणे बर्या होऊ लागल्या. यामुळे वाईट शक्तींच्या त्रासावर गुरुदेवांच्या कृपेमुळे मात करता आली. गुरुदेवांच्या कृपेमुळे ८६ व्या वर्षीसुद्धा प्रकृती चांगली असून याचे सर्व श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांनाच आहे.
७. परात्पर गुरुदेवांनी मोक्षप्राप्ती हे ध्येय दिल्याने निराशा दूर होणे
आम्हा उभयतांना गुरुदेवांची पुष्कळ आठवण येते. आज वयाच्या ८६ व्या वर्षी परात्पर गुरुदेव आम्हाला घरीच बसून नामजप करणे, अष्टदेवतांची प्रतिदिन पूजा करणे, घरी आलेले नियतकालिकांचे गठ्ठे साधकांकडे वितरणासाठी पाठवणे इत्यादी सेवा करण्याची संधी देत आहेत.
८. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक लिखाण म्हणजे ‘गुरुदेवांचा संदेश आहे’, या भावाने वाचले जाणे
सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना मी इतर कोणतेही कामे करत नाही. परात्पर गुरुदेवांनी दैनिकाच्या माध्यमातून एवढ्या वर्षांत साधना करवून घेतल्याने त्याची इतकी ओढ लागली असून आजही ती कायम आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये छापण्यात येणारी प्रत्येक बातमी १०० प्रतिशत खरी आणि गुरूंनी आपल्याला संदेश म्हणून पाठवली आहे’, या भावाने त्याचे वाचन होते. त्यामुळे ‘इतर वर्तमानपत्रे वाचू नयेत’, असे वाटते.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आम्हा उभयतांना सेवेच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. आपली अखंड कृपा आम्ही उभयता आणि सर्व साधक यांवर सदा रहावी, हीच आपल्या कोमल चरणी प्रार्थना !
‘परात्पर गुरुदेव, आम्हा उभयतांची रामनाथी आश्रम पहाण्याची पुष्कळ इच्छा असून तुम्ही ती पूर्ण कराल, अशी आम्हाला निश्चिती आहे.’
– श्री. सदाशिव दादोबा जाधव, इचलकरंजी (१९.३.२०२०)
|