दळणवळण बंदीच्या काळात घरी (सांगलीला) असतांना ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रमिला पाटील (वय ७९ वर्षे) यांनी ‘तळमळ’ आणि ‘भाव’ या गुणांच्या आधारे केलेले साधनेचे प्रयत्न
‘माझी आई, श्रीमती प्रमिला पाटील कोरोना महामारीचा संसर्ग चालू होण्यापूर्वी सांगलीला एका कार्यक्रमासाठी घरी गेली होती. त्यानंतर दळणवळण बंदीमुळे तिला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येता आले नाही. या कालावधीत तिच्या मनाचा संघर्ष झाला. मनात येणार्या विचारांवर ‘तिने कशी मात केली ? तिने भावाच्या स्तरावर ठेवलेले दृष्टीकोन आणि ‘साधनेची गती वाढावी’, यासाठी केलेले प्रयत्न’, यांविषयीची सूत्रे गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.
१. आईने साधनेसाठी केलेले प्रयत्न
१ अ. भावपूर्ण प्रार्थना करणे : या कालावधीत आई देवाला भावपूर्ण आणि आर्ततेने प्रार्थना करत होती.
१. एखाद्या प्रसंगात तिचा संघर्ष होत असल्यास ती गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांना ‘गुरुदेवा, मला काही येत नाही. मी स्वतःत पालट करू शकत नाही. तुम्हीच मला या स्थितीतून बाहेर काढा’, अशी प्रार्थना करून त्यांना आळवत असे.
२. ती कधी कधी ‘प्रसंग स्वीकारता येऊ देत’ किंवा ‘या प्रसंगात कसे लढायचे ते शिकवा’ किंवा ‘माझ्या मनातील नकारात्मक आणि त्रासदायक विचार तुम्हीच नष्ट करा’, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रार्थना आर्ततेने करत होती.
३. ती ‘गुरुदेवा, मी काही करू शकत नाही. तुम्ही करवून घेतले, तरच माझे प्रयत्न होणार आहेत. मी आता थकले. तुम्हीच मला साहाय्य करा’, अशी प्रार्थना अनेक वेळा शरणागतभावाने करायची आणि आताही करते.
१ आ. चुकांविषयी संवेदनशीलता वाढवणे
१ आ १. चुका झाल्यावर लगेचच लिहून ठेवणे आणि ‘पुन्हा तशा चुका होऊ नयेत’, यासाठी कटाक्षाने प्रयत्न करणे : आईमध्ये ‘भावनाशीलता, परिस्थिती न स्वीकारणे आणि काळजी करणे’ या स्वभावदोषांची तीव्रता अधिक होती. घरी आल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि प्रसंग यांतून तिला त्यांची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यावर तिने मनापासून आणि तळमळीने प्रयत्न केले. तिच्याकडून चुका झाल्यास ती लगेचच लिहून ठेवत असे आणि पुन्हा तशा चुका होऊ नयेत, यासाठी कटाक्षाने प्रयत्न करत असे.
१ आ २. शिक्षापद्धत अवलंबणे : काही प्रसंगांमध्ये विचारांची तीव्रता त्वरित न्यून होत नसल्यास ती स्वतःला शिक्षा करायची. ती ‘एखादा पदार्थ न खाणे, स्वतःला चिमटा काढणे’, यांसारख्या शिक्षा स्वतःला करून घेत असे.
१ इ. विविध प्रसंगांत आईने ठेवलेले दृष्टीकोन
१ इ १. घरी रहाण्याविषयी
अ. देवाने परिस्थिती स्वीकारण्यासाठी मला घरी ठेवले आहे. त्यामुळे मी ही परिस्थिती आनंदाने स्वीकारीन.
आ. ‘घरातील व्यक्तींच्या समवेत असलेली देवाणघेवाण संपवण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे’, असा मी भाव ठेवीन.
१ इ २. प्रकृतीच्या तक्रारींविषयी
अ. ‘आता वयानुसार माझ्या प्रकृतीत बिघाड होत आहेत’, हे लक्षात घेऊन मी ते स्वीकारीन.
आ. देहप्रारब्धानुसार प्रकृतीच्या तक्रारी चालू असतात. त्यामुळे ‘देव माझे प्रारब्ध संपवत आहे’, हे लक्षात घेऊन मी अधिकाधिक नामजप करीन.
इ. प्रकृती बिघडली, तरी ‘गुरुदेव माझी काळजी घेणार आहेत’, हे लक्षात घेऊन मी निश्चिंत राहीन. देवाने आतापर्यंत मला चांगले ठेवले आहे. त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करीन.
१ इ ३. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याविषयी ठेवलेला दृष्टीकोन : ‘प्रत्येकाचा मृत्यू त्याच्या प्रारब्धानुसार होतो’, हे लक्षात घेऊन मी शांत राहीन. कुणाचा मृत्यू झाल्यानंतर दुःखी झालेले परात्पर गुरुदेवांना आवडणार नाही. त्यामुळे मी दुःख न करता अधिकाधिक नामजप करीन.
१ ई. भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न : आईला पूर्वीपासूनच भावजागृतीचे प्रयत्न करायला आवडत असत. वेगवेगळ्या प्रसंगांत आणि अन्य वेळी गुरुदेवांनी तिला भावजागृतीसाठी पुढील प्रयत्न करायला सुचवले अन् तिच्याकडून ते करवून घेतले.
१ ई १. ती सकाळी उठल्यानंतर प्रतिदिन सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात जाऊन गुरुदेवांची मानसरित्या पाद्यपूजा करत असे.
१ ई २. घरातील कामे करतांना गुरुदेवांना प्रार्थना करून आळवणे : ती घरातील कामे करतांना ‘हा गुरुदेवांचा आश्रम आहे’, असा भाव ठेवत असे. तेव्हा ती गुरुदेवांना ‘तुम्हीच मला घरातील सेवा करण्यासाठी उत्साह आणि बळ द्या अन् माझ्याकडून सेवा करून घ्या’, असे आळवत असे. त्यामुळे या वयातही तिला घरातील कामे करतांना त्रास होत नव्हता. तिचा उत्साह वाढून तिला आनंद मिळायचा आणि तिच्याकडून घरातील सेवा सहजतेने व्हायच्या.
२. आईमध्ये जाणवलेले पालट
२ अ. स्थिरता वाढणे : आई पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ स्थिर झाली आहे. तिच्या मनातील विचार न्यून झाले आहेत. तिचा तोंडवळाही शांत आणि स्थिर झाल्याचे जाणवते.
२ आ. अनावश्यक बोलणे न्यून होणे : आईचे मायेतील विषयांवरील, तसेच इतर अनावश्यक बोलणे आता न्यून झाले आहे. आई ‘गुरूंच्या चरणांपर्यंत जाण्यासाठी आणखी काय करायला हवे ? मी कुठे न्यून पडते ?’, याच विचारांमध्ये असते.
२ इ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : पूर्वी तिला काही गोष्टी स्वीकारता येत नव्हत्या. तिला काही चुका सांगितल्यास ती स्पष्टीकरण द्यायची; पण हे तिच्या लक्षात येत नव्हते. आता तिला कोणतेही सूत्र किंवा चूक सांगितल्यास ती लगेचच स्वीकारते. त्यावर ती चिंतन करते आणि त्यात पालट करते.
२ ई. घरातील कोणत्याच प्रसंगात न अडकणे : पूर्वी आईचे घरातील सर्व गोष्टींकडे लक्ष असायचे. काही कमी-जास्त झाले, तर ते तिला स्वीकारता यायचे नाही. आता ‘आईचे घरातील कोणत्याच गोष्टीमध्ये किंवा प्रसंगाकडे लक्ष नसते आणि ती घरातील कोणत्याच प्रसंगात अडकली नाही’, असे जाणवते. ती प्रसंग घडतांना पहात असते; परंतु तिच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. पूर्वी तिला घरात राहून सगळ्यांतून अलिप्त रहाणे जमत नव्हते. आता आईने हा मोठा टप्पा पार केला आहे.
२ उ. ‘काळजी करणे, भीती वाटणे आणि भावनाशीलता’ हे स्वभावदोष न्यून होणे : आईमध्ये ‘काळजी करणे, भीती वाटणे आणि भावनाशीलता’ या स्वभावदोषांची तीव्रता पुष्कळ होती. कुणाला काही झाले किंवा तिची प्रकृती बिघडली, तर तिला पुष्कळ काळजी वाटायची. त्यानंतर ‘भीती वाटणे आणि त्या प्रसंगाचे दुःख होणे’, असे चक्र चालू व्हायचे. तिला यातून बाहेर पडणे जमत नव्हते; परंतु आता तिला कोणत्याही गोष्टीची काळजी वाटत नाही. तिच्यातील भावनाशीलताही न्यून झाली आहे.
२ ऊ. प्रत्येक प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने पहाणे : कोणताही प्रसंग घडल्यास ती ‘देवाला यातून काय शिकवायचे आहे ?’, असा विचार करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करते. प्रतिकूल प्रसंग घडला, तर त्या वेळी ‘कोणता स्वभावदोष उफाळून आला ?’, ते पहाते आणि काही चांगले घडल्यास ‘देवाने हे माझ्यासाठीच घडवले आहे’, असा विचार करून लगेच कृतज्ञता व्यक्त करते.
२ ए. अनुसंधानात असणे : ‘कामे करतांना किंवा अन्य वेळीही आई अनुसंधानात आहे’, असे जाणवते. तिचा आतून सतत नामजप चालू असतो आणि ती सतत कृतज्ञता व्यक्त करत असते. तिच्या बोलण्यातून ‘प.पू. गुरुदेवांच्या चरणांपर्यंत जायचे आहे’, ही एकच तळमळ सतत जाणवते.
३. आईच्या सहवासात असतांना आलेल्या अनुभूती
अ. आईच्या सहवासात आनंद जाणवतो. माझे मन शांत होते आणि माझा नामजप आपोआप चालू होतो.
आ. मी घरी आल्यानंतर आईसमवेत झोपते. या वेळी मी तिच्या बाजूला झोपल्यावर मला अनेक वेळा स्वप्नात सनातनच्या संतांचे दर्शन झाले. झोपेतून जाग आल्यानंतर ‘माझा नामजप आपोआप चालू आहे’, असे मला जाणवते.
इ. आई घरातील ज्या खोलीत झोपते, त्या खोलीत असलेल्या प्रसाधनगृहातील चैतन्यात वाढ झाली आहे. खोली आणि प्रसाधनगृह पुष्कळ प्रकाशमान झाले आहे. ‘घरातील चैतन्यातही वाढ झाली आहे’, असे जाणवते.
४. आईला येत असलेल्या अनुभूती
अ. तिला दिवसभरात अनेक वेळा बाह्य कारण नसतांना सुगंध येतो.
आ. ती प्रतिदिन जैन संप्रदायातील ‘भक्तराम स्तोत्र’ हा ग्रंथ वाचते. त्या ग्रंथाला सुगंध येत आहे.
इ. तिचा दिवसभरात मधूनमधून ‘कृतज्ञता, कृतज्ञता….’, असा नामजप चालू होतो. हा नामजप केल्यानंतर तिच्या तोंडात गोड चव येऊन तिची भावजागृती होते आणि तिला आनंद मिळतो.
५. सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. शिवाजी वटकर यांच्याप्रती कृतज्ञता !
५ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेविषयी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे लाभ होणे : आई देवद आश्रमात असतांना तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत होते. त्या वेळी सद्गुरु दादांनी ‘भावनाशीलता, भीती वाटणे आणि काळजी करणे’ या स्वभावदोषांवर सांगितलेल्या सूत्रांचा तिला विशेष लाभ झाला. ‘सद्गुरु राजेंद्रदादांविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असा आईचा भाव आहे.
५ आ. पू. शिवाजी वटकर यांचा भ्रमणभाषवरून सत्संग मिळाल्यावर आईचा भाव जागृत होणे : घरी असतांना आईचा पू. वटकरकाकांशी भ्रमणभाषवरून संपर्क होत असे. ते तिला नेहमी प्रोत्साहन देत. आई त्यांना तिच्या मनाची स्थिती सांगायची. ती ऐकल्यावर पू. वटकरकाका आईला सांगायचे, ‘‘जे प्रयत्न चालू आहेत, ते चालूच ठेवा आणि भावजागृतीच्या प्रयत्नांवर भर द्या.’’ भ्रमणभाषवरून त्यांचा सत्संग मिळाल्यावर आईचा भाव जागृत व्हायचा आणि तिला प्रयत्न करायला उभारी यायची. तिला प.पू. गुरुदेव आणि पू. वटकरकाका यांच्याप्रती कृतज्ञता वाटायची आणि तिचे प्रयत्न जोमाने चालू व्हायचे.
हे सर्व केवळ ‘गुरुदेवांमुळेच होत आहे’, असे वाटून तिचा भाव दाटून यायचा.
आई घरी असतांनाही गुरुदेवांनीच तिच्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतले. त्यांनी आईतील स्वभावदोषांची तीव्रता न्यून करून तिच्यात पालट केला. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– वैद्या (कु.) माया पाटील (श्रीमती प्रमिला पाटील यांची मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.७.२०२१)
|