परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी काढलेल्या रक्ताच्या नमुन्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

संतांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक अन् संत, तसेच स्वतःच्या देहातील (केस, नखे, त्वचा यांच्याशी संबंधित) आणि त्यांच्या नियमित वापरातील वस्तूंमध्ये (कपडे, दैनंदिन वापरातील वस्तू इत्यादींमध्ये) साधनेमुळे होणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण पालटांच्या संदर्भात विपुल संशोधन केले आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित संशोधनातून अध्यात्मातील अनेक नवीन पैलू उलगडत आहेत. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी काढलेल्या रक्ताच्या नमुन्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

वर्ष २०१७ मध्ये सनातनचे काही साधक आणि संत यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी काढलेल्या रक्ताच्या नमुन्यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. वर्ष २०१७ पासून पुढे काही मासांच्या अंतराने परात्पर गुरु डॉक्टरांचे वैद्यकीय तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले. तेव्हा प्रत्येक वेळी त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. यातील काही निवडक निरीक्षणे पुढे दिली आहेत.

टीप १ – ‘ऑरा स्कॅनर’ने ४५ अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

टीप २ – ‘ऑरा स्कॅनर’ने ३० अंशाचा कोन केला.

१ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली; पण तिची प्रभावळ नव्हती.

१ अ १. विश्‍लेषण : सर्वसामान्य व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असते. व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्यास तिच्या त्रासानुसार तिच्यामध्ये त्रासदायक स्पंदने असतात. व्यक्ती साधना करणारी असल्यास जसजशी तिची साधना वाढते, तसतसे तिच्यात सत्त्वगुणाचे प्रमाणही वाढते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ‘त्याला आध्यात्मिक त्रास’ असल्यामुळे आढळून आली. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. याचे कारण हे की, त्याच्या साधनेमुळे त्याच्यात सत्त्वगुण वाढण्यास आरंभ झाला आहे. या दोन्ही साधकांची साधना जसजशी वाढेल, तसतसे त्यांच्यातील सत्त्वगुण वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या देहावर होईल.

१ आ. दोन्ही संतांच्या आध्यात्मिक पातळीत भेद असल्याने त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांतून चैतन्य प्रक्षेपित होण्याचे प्रमाण निराळे असणे : पू. सिरियाक वाले यांच्या रक्ताच्या नमुन्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.१० मीटर आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या रक्ताच्या नमुन्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५.९० मीटर आहे.

१ आ १. विश्‍लेषण : साधना न करणार्‍या सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. चांगली साधना करून जेव्हा व्यक्तीची पातळी ७० टक्के होते, तेव्हा ती ‘संत’ होते. संतांमध्ये त्यांच्या साधनेमुळे चैतन्य निर्माण झालेले असते. जसजशी संतांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचे प्रमाणही वाढते. ७०-७९ टक्के पातळीला ‘संत’ (गुरु), ८०-८९ टक्के पातळीला ‘सद्गुरु’ आणि ९० टक्के पातळीच्या पुढे ‘परात्पर गुरु’ पद प्राप्त होते. पू. सिरियाक वाले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे दोघेही संत असल्याने त्यांच्याकडून चैतन्य प्रक्षेपित होते; पण त्याचे प्रमाण निराळे आहे. याचे कारण हे की, पू. सिरियाक वाले हे ‘गुरु’ पदावरील आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील संत आहेत. (पू. सिरियाक वाले यांनी १२.३.२०१३ या दिवशी ‘संत’ पद आणि ४.८.२०१८ या दिवशी ‘सद्गुरु’ पद प्राप्त केले आहे. ही चाचणी पू. सिरियाक वाले यांनी ‘सद्गुरु’ पद प्राप्त करण्यापूर्वी केलेली असल्याने लेखात त्यांचा उल्लेख ‘पू. सिरियाक वाले’ असा केला आहे.)

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी काढलेल्या रक्ताच्या नमुन्यांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यातील चैतन्याचे प्रमाण उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढणे : वर्ष २०१७ पासून पुढे काही मासांच्या अंतराने परात्पर गुरु डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर लक्षात आले की, त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांतील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुढील प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढत गेले आहे. तसेच वर्ष २०२१ मध्ये ज्या ‘सिरींज’ने त्यांचे रक्त काढण्यात आले ती ‘सिरींज’ त्यांच्यातील (त्यांच्या रक्तातील) चैतन्याने भारित झाल्याने तिची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १८.०५ मीटर आली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

१ इ १. विश्‍लेषण : परात्पर गुरु डॉ. आठवले समष्टी संत आहेत. त्यांच्याकडून ईश्‍वरी कार्यासाठी पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. वर्ष २०१७ पासून त्यांच्याकडून ईश्‍वरी कार्यासाठी अधिकाधिक चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले. याचा सकारात्मक परिणाम त्यांचे केस, नखे, त्वचा, एवढेच नव्हे, तर त्यांच्या रक्तावर होऊन तेही चैतन्याने भारित झाले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व आहे. वर्ष २०२१ पासून त्यांच्यातील विष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले आहे. यामुळे आधीच्या तुलनेत त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील वाढलेल्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांचे रक्त काढण्यासाठी अवघ्या एखादा मिनिट वापरलेल्या ‘सिरींज’ सारख्या निर्जीव वस्तूवर किती मोठ्या प्रमाणात झाला आहे. थोडक्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून ईश्‍वरी कार्यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे, याची काही अंशी कल्पना या संशोधनातून येईल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (९.८.२०२१)

ई-मेल : [email protected]