६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. वैजंती विकास मजली (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. वैजंती विकास मजली एक आहे !

आज भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदेला म्हणजे (७.९.२०२१) या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. वैजंती मजली हिचा तृतीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. पद्मश्री मजली यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.

चि. वैजंती विकास मजली

चि. वैजंती मजली हिला तृतीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गर्भारपणाआधी इंदूर येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेजवळ आत्मनिवेदन करतांना आनंद आणि शांती यांची अनुभूती येणे अन् अनेक दिवस ही भावावस्था अनुभवता येणे

‘आमच्या विवाहाला २ वर्षे झाली होती. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी माझी तपासणी केल्यावर ‘काही वैद्यकीय उपचार (शस्त्रकर्म) केल्यानंतरच मूल होऊ शकते’, असे सांगितले होते. आम्ही नोव्हेंबर २०१७ मध्ये कार्यालयीन कामासाठी इंदूर येथे गेलो होतो. तेथे आम्ही सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात गेलो. त्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन होता. मला तो सोहळा पहायला मिळाला. तेथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेजवळ आत्मनिवेदन करतांना मला आनंद आणि शांती यांची अनुभूती आली. त्या वेळी मी त्यांच्या चरणी ‘माझे प्रारब्ध संपून माझी साधनेत प्रगती होऊ दे’, अशी प्रार्थना केली. आश्रमातून आल्यानंतरही अनेक सप्ताह मला ही भावावस्था अनुभवता आली.

२. गर्भारपणी

सौ. पद्मश्री मजली

२ अ. गर्भधारणा कुठल्याही वैद्यकीय उपचारांविना होणे : फेब्रुवारी २०१८ मध्ये मला पुष्कळ उलट्या होत होत्या; म्हणून मी आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) गेले. तेव्हा त्यांनी मला गर्भधारणा झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कोणतेही वैद्यकीय उपचार न घेता हे झाले होते. त्याच क्षणी माझ्याकडून प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२ आ.  ३ ते ४ मास 

२ आ १. आधुनिक वैद्यांनी ‘बाळाची स्थिती चांगली नसल्याने गर्भपात करावा लागेल’, असे सांगणे, श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केले असता ‘आई, मला राहू दे. मी वैजंती आहे’, असे कुणीतरी सांगितल्याचे जाणवणे, तेव्हा गर्भपात करण्यास ठामपणे नकार देणे : तिसर्‍या मासात मी नोकरीनिमित्त काही वेळा विमानप्रवास केला होता. त्यानंतर मी पाठीच्या दुखण्यासाठी ‘क्ष-किरण’ तपासणी (एक्स-रे) केली. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘बाळाची स्थिती चांगली नाही. त्यामुळे गर्भपात करावा लागेल.’’ आम्ही अन्य काही वैद्यांचे मत जाणून घेतले. तेव्हा सर्वांचे म्हणणे असेच होते; परंतु हे करायला माझे मन धजावत नव्हते. त्या वेळी मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केले. तेव्हा मला कुणीतरी ‘आई, मला राहू दे. मी वैजंती आहे’, असे सांगितल्याचे जाणवले. मी आधुनिक वैद्यांना ठामपणे सांगितले, ‘‘हे बाळ मला ठेवायचे आहे.’’ तेव्हाच ‘श्रीकृष्णाने बाळाचे नाव ‘वैजंती’ ठेवले आहे’, असे मला जाणवले.

२ आ २. आधुनिक वैद्यांनी ‘बाळ विकलांग असू शकते’, असे सांगितल्यावरही विचार न पालटणे आणि मन शांत, आनंदी अन् स्थिर असणे : आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘हे बाळ अधू, अर्धबुद्धी किंवा विकलांग असू शकते. तुम्हाला अशा बाळाचे दायित्व घ्यावे लागेल’’; परंतु मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांना आत्मनिवेदन केल्यानंतर माझा विचार जराही पालटला नाही. मी शांत, आनंदी आणि स्थिर होते.

२ इ.  ७ वा मास

१. गर्भजलाचे प्रमाण अल्प झाल्याने आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात भरती होण्यास आणि दुसर्‍या दिवशी प्रसुती करणार असल्याचे सांगणे : मी आधुनिक वैद्यांकडे पडताळणीसाठी गेले असता त्यांनी ‘गर्भजलाचे प्रमाण अल्प असल्याने तुम्ही रुग्णालयात भरती व्हा’, असे सांगितले. रुग्णालयात भरती झाल्यावर वैद्यांनी ‘एक दिवस वाट पाहून उद्या प्रसुती करू’, असे सांगितले.

२. रुग्णालयात केलेले भावप्रयोग आणि नामजपादी उपाय यांमुळे गर्भजलाची पातळी वाढणे : त्या वेळी मी रुग्णालयात पुढील भावप्रयोग केले. ‘बाळाच्या हृदयातील सोनेरी धाग्याची श्रीकृष्णाच्या हृदयातील सोनेरी धाग्याशी गाठ बांधलेली आहे. श्रीकृष्णाच्या गळ्यातील वैजयंती माळ बाळाच्या हृदयाजवळ आहे आणि त्याला त्याच्या गळ्यातील वैजयंती माळेप्रमाणेच हे बाळसुद्धा प्रिय आहे.’ मी बाळाभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी श्रीकृष्णाला सतत प्रार्थना करत होते आणि नामजपादी उपाय करत होते. दोन दिवसांनंतर पुन्हा माझी पडताळणी करण्यात आली. तेव्हा गर्भजलाची पातळी वाढली असल्याचे समजले.

३. पोटातील बाळाने नामजपादी उपाय करण्याची जाणीव करून देणे : मला नामजपादी उपाय करण्यास विलंब झाला, तर पोटातील बाळ मला त्याची जाणीव करून देत असे. आधुनिक वैद्यांनीही सांगितले, ‘‘बाळ तुमचे बोलणे ऐकून तुम्हाला प्रतिसाद देत आहे.’’

२ ई. ८ वा मास : आठव्या मासात माझ्या सासू-सासर्‍यांनी स्वतःहून बाळासाठी ‘आठांगुळ’ संस्कार विधीचे आयोजन केले. त्या वेळी ‘बाळावर सात्त्विक संस्कार होण्यासाठी सर्वकाही देवच करवून घेत आहे’, असे जाणवले.

२ उ. नैसर्गिक प्रसुती होणे : माझे वजन अधिक असल्याने नैसर्गिक प्रसुतीची आशा अल्प होती; परंतु गुरुकृपेने नैसर्गिक प्रसुती होऊन मुलगी झाली.

३. जन्मानंतर

३ अ. घरातील विविध अडचणी सुटणे : बाळाचा जन्म होण्याआधी घरात पुष्कळ अडचणी होत्या. माझ्या बहिणीचा विवाह ठरत नव्हता. माझ्या यजमानांची नोकरी गेली आणि नंतरही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे नोकरी मिळत नव्हती. आमची शेती आणि अन्य व्यावहारिक कामे यांमध्येसुद्धा अडचणी वाढल्या होत्या. बाळाच्या जन्मानंतर या सर्व अडचणी सुटल्या.

३ आ. १ ते २ मास

१. ‘कधी येशील मनमोहना’ हे गाणे ऐकल्यावर वैजंती शांतपणे झोपायची. ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून हसून हुंकार देत असे. त्या वेळी ‘ती त्याच्याशी बोलत आहे’, असे आम्हाला जाणवायचे.

२. भावप्रयोग करणे : माझी आई (सौ. जयश्री जनार्दन नाईक) तिला जवळ घेऊन नियमित भावप्रयोग करत असे. मानसरित्या ती तिला घेऊन रामनाथी आश्रमात जात असे. तेव्हा वैजंती तिला प्रतिसाद द्यायची.

४. १ ते २ वर्षे

४ अ. व्यवस्थितपणा : घरात चपला अव्यवस्थित ठेवलेल्या असतील, तर वैजंती त्या स्वतःहून नीट ठेवते. घरात सोफ्यावरील चादरीला घडी पडली असेल, तर ती नीट करते. पायपोस दुमडला असेल, तर तो नीट करते. ‘वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याची समज तिला या वयापासूनच आहे’, असे जाणवते.

४ आ. समजूतदारपणा : मला नोकरी करावी लागत असल्याने मी तिला पाळणाघरात ठेवत असे. तेथेही ती न रडता आनंदाने रहात असे. तिला भूक लागली असेल आणि मी जवळ नसेल, तरीही ती रडत नाही.

४ इ. नियमित स्तोत्रे म्हणणे : वैजंती सकाळी उठल्यावर नियमित ‘कराग्रे वसते लक्ष्मी’, हा श्लोक म्हणते. संध्याकाळी ती ‘शुभंकरोति’ आणि दत्ताचे भजन नियमित म्हणते. तिच्या आजीसह ती ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करते. ती ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी’ आणि ‘नारायण, नारायण’, असे म्हणते.

५. वैजंतीचे दोष : ‘हट्टीपणा आणि आवड-निवड असणे’

६. कृतज्ञता

‘वैजंतीच्या जन्माआधीपासून आणि तिचा जन्म झाल्यावर श्रीकृष्णाने माझ्याकडून नामजपादी उपाय करवून घेतले. वैजंतीमुळे माझ्या साधनेच्या प्रयत्नांत वाढ झाली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे.’

– सौ. पद्मश्री मजली (चि. वैजंतीची आई), कोथरूड, पुणे. (सप्टेंबर २०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक