संपूर्ण मानवजातीला काही वर्षांपूर्वीच भावी भीषण आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यावरील परिणामकारक उपाय सांगणार्‍या त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गेल्या वर्षापासून भारतासह अन्य अनेक राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. यामुळे सर्वत्रचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. ‘कोरोना’मुळे निर्माण झालेली ही आपत्कालीन स्थिती आणि अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उद्भवलेली पूरस्थिती, हे आपत्काळ चालू झाल्याचेच निदर्शक आहे. १५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’

जगत् कल्याणासाठी अविरत प्रयत्न करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांचे वैशिष्ट्य म्हणजे एवढेच सांगून ते थांबले नाहीत, तर ‘आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कशी पूर्वसिद्धता करायला हवी ?’, याविषयी त्यांनी संपूर्ण मानवजातीला अमूल्य मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन नियतकालिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ यांमधून वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे.

१. ‘आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरांवर कशा प्रकारे पूर्वसिद्धता करायला हवी ?’, याविषयी ‘सनातन प्रभात’मधून लेख प्रसिद्ध करणे

‘आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, तसेच आध्यात्मिक स्तरांवर कोणकोणत्या प्रकारे पूर्वसिद्धता करायला हवी ?’, याविषयीची सविस्तर लेखमाला गुरुदेवांनी नियतकालिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध केली, तसेच सध्याही प्रतिदिन ती दैनिकात प्रसिद्ध होत आहे. दैनंदिन गरजा न्यून करण्यापासून ते ‘आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण’ घेणे का आवश्यक आहे ?, येथपर्यंतचे अमूल्य मार्गदर्शन त्यांनी यातून केले आहे. ‘ही माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोचावी’, या दृष्टीने त्याचे सविस्तर विवेचन करणारा ग्रंथ किंवा लघुग्रंथ शीघ्रतेने प्रकाशित करण्याचाही गुरुदेवांचा मानस आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२. ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका प्रकाशित करणे, तसेच वनौषधींची लागवड करणे, यांचे महत्त्व जनमानसावर बिंबवणे

याचप्रमाणे त्यांनी ‘भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना रुग्णांवर कसे उपचार करावेत ?’, तसेच अन्य वेळीही उपयुक्त ठरेल, अशी अमूल्य माहिती देणारी ग्रंथमालिकाही प्रकाशित केली आहे. प्रथमोपचार प्रशिक्षण, बिंदूदाबन, स्वसंमोहन उपचार, विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्तीवहन उपाय, रिकाम्या खोक्यांचे उपाय, नामजप-उपाय, वनौषधींची लागवड आदींचे अमूल्य ज्ञान या ग्रंथांमध्ये दिले आहे. हे ग्रंथ भावी आपत्काळात संजीवनी ठरणार आहेत.

‘भविष्यात आपत्कालीन स्थितीमुळे आधुनिक वैद्य, तसेच औषधे उपलब्ध न झाल्यास आपले आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रत्येकाने औषधी वनस्पतींची लागवड करणे अत्यावश्यक आहे’, असे त्यांनी ग्रंथ आणि नियतकालिके यांद्वारे सर्वांवर बिंबवले आहे.

३. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी साधनेला पर्याय नसल्याचे समाजमनावर बिंबवणे

मागील अनेक वर्षांपासून गुरुदेव ‘आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेविना तरणोपाय नाही’, असे सांगून सर्वांना साधनेचे महत्त्व पुनःपुन्हा पटवून देत आहेत. ‘धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी स्वतःला समर्पित करा. भगवंताची मनोभावे आराधना करून त्याचे भक्त बना’, असे सांगणारी त्यांची मार्गदर्शक सूत्रे ‘सनातन प्रभात’मधूनही प्रसिद्ध झाली आहेत.

‘कठीण परिस्थितीमध्ये मनाची सकारात्मकता वाढून मनोधैर्य टिकून रहावे’, यासाठी त्यांनी विकसित केलेली ‘स्वयंसूचना पद्धत’ एकमेवाद्वितीय आहे. ‘या स्वयंसूचना पद्धतींचा अवलंब केल्याने स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता न्यून होण्यासह बिकट स्थितीतही स्थिर राहून सामोरे जाता येते’, अशा अनुभूती अनेकांनी घेतल्या आहेत.

४. विश्वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या गुरुदेवांचा द्रष्टेपणा आणि सर्वज्ञता !

संभाव्य आपत्काळ आणि त्या वेळी उद्भवू शकणारी भयावह स्थिती यांविषयी द्रष्टे संतच समाजाला मार्गदर्शन करू शकतात. काही वर्षांपूर्वीच आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यावरील परिणामकारक उपाय सांगणार्‍या परात्पर गुरुदेवांचा द्रष्टेपणा आणि सर्वज्ञता यांचा प्रत्यय सध्याच्या आपत्कालीन स्थितीमुळे सर्व साधकांना आला. ‘त्यांनी सांगितलेली सूत्रे कृतीत आणणे का अनिवार्य आहे ?’, याची सर्वांना प्रकर्षाने जाणीव झाली. अशा महान आणि त्रिकालज्ञानी गुरुदेवांचे मार्गदर्शन लाभणे, हे सनातनच्या साधकांचे महत् भाग्यच आहे. साधकांनी परात्पर गुरुदेवांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच ठरेल !

अखिल मानवजातीला आपत्काळाविषयी सर्वांगीण मार्गदर्शन करून जगत् कल्याणार्थ झटणार्‍या परात्पर गुरुदेवांचे हे कार्य अद्वितीय आहे. असे कार्य करणारे परात्पर गुरुदेव भूतलावर एकमात्र आहेत, यात शंका नाही !

‘साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येऊन समस्त मानवजातीला साधना करण्याची बुद्धी होवो’, अशी जगन्नियंत्या श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.४.२०२०)