ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे १२ वर्षीय हिंदु मुलाला गळ्यात तुळशीची माळ असल्याने फुटबॉल सामना खेळण्यापासून रोखले !

माळ काढल्यास खेळण्याची अनुमती देण्याची सवलत धर्माभिमानी हिंदु मुलाने नाकारली !

विदेशात अशी धर्मप्रेमी हिंदु मुले आहेत, याचे कौतुक करावे तितके अल्पच होईल; मात्र भारतात अशी मुले सापडणे दुर्मिळ झाले आहे, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

कु. शुभ पटेल

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – येथील भारतीय वंशाचा १२ वर्षीय फुटबॉल खेळाडू कु. शुभ पटेल याने गळ्यात तुळशीची माळ घातल्याने त्याला फुटबॉल सामन्यामध्ये  खेळण्यापासून रोखण्यात आले. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. शुभ ५ वर्षांचा असल्यापासून गळ्यात माळ घालत असल्याने त्याने पंचांना माळ काढण्यास नकार दिला. ‘केवळ एका सामन्यासाठी माळ काढण्याऐवजी मी माझ्या धर्माचे पालन करणे अधिक पसंत करीन’, असे त्याने सांगितले. यापूर्वी १५ हून अधिक सामने खेळतांना त्याला कधीही माळ काढण्यास सांगण्यात आले नव्हते.

तुळशीची माळ मला आत्मविश्‍वास देते आणि मला सुरक्षित वाटते !

‘टूवॉन्ग सॉक क्लब’कडून खेळणार्‍या कु. शुभ पटेल याने सांगितले, ‘माळ काढणे हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे. सनातन परंपररेमध्ये पूजेमध्ये प्रसाद म्हणून उपयोगात आणण्यात आलेली माळ धारण करणे आणि तिच्या माध्यमातून जप करणे अत्यंत मंगलकारी आहे. जर मी माळ काढली असती, तर देवाला वाटले असते की, माझा त्याच्यावर विश्‍वास नाही. ही माळ मला आत्मविश्‍वास देते आणि मला सुरक्षित वाटते.’

‘फुटबॉल क्विन्सलँड’ या सरकारी संस्थेकडून क्षमायाचना !

‘फुटबॉल क्विन्सलँड’ ही ऑस्ट्रेलियामध्ये फुटबॉलच्या संदर्भातील सरकारी संस्था आहे. या संस्थेने कु. शुभ पटेलच्या प्रकरणी चौकशी केल्यानंतर ‘टूवॉन्ग सॉकर क्लब’च्या वतीने क्षमा मागितली आहे. ‘फुटबॉल क्विन्सलँड’ने सांगितले की, क्विन्सलँडमध्ये फुटबॉल हा सर्वांना सामावून घेणारा खेळ आहे. तो सर्व संस्कृती आणि धर्म यांचा सन्मान करतो.