जामनेर (जळगाव) येथील मंदिर विश्वस्तांची निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी !
जळगाव, १ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दळणवळणबंदी लागू झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. मंदिरांवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे, अशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने आता हिंदूंची श्रद्धास्थाने असणारी राज्यातील मंदिरे उघडावीत, अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त श्री. दगडू चौधरी आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. हे निवेदन जामनेर तहसील कार्यालयात देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व मंदिर विश्वस्त, तसेच भक्त यांनी कोरोनाचे नियम पाळूनच सर्व सण-उत्सव साजरे केले आहेत. राज्यशासनाने नुकतेच राज्यातील अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. अर्थचक्र सुरळीतपणे चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले आहे. मंदिर व्यवस्थेवर आज अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. पूजा-धार्मिक कृत्ये करणार्या समाजावर, तसेच लघु आणि मोठ्या व्यावसायिकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरांची नित्य पूजा आणि देखभाल यांचा खर्च कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी आणि मंदिरांत पूजा, धार्मिक कृत्ये करणार्या समाजाला आर्थिक साहाय्य घोषित करावे.
पोलीस उभे केले, तरीही आम्ही आज मंदिरे उघडी करू ! – गिरीश महाजन
जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे मंदिरात जाऊन दर्शन !
मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी जामनेर शहरातील भाजीमंडी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने ढोल, टाळ वाजवून आणि शंखनाद करून ‘रॅली’ काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता आमदार महाजन यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हनुमानाचे दर्शन घेतले.
या वेळी ते म्हणाले, राज्यातील डान्सबार, मद्याची दुकाने, बाजारपेठा, मॉल, चित्रपटगृहे सर्व चालू आहे. अन्य राज्यात मंदिरे उघडी आहेत. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील मंदिरांतच कोरोना येतो का ? पोलीस उभे केले, तरीही आम्ही आजपासून राज्यातील मंदिरे उघडी करू.