शेतकर्यांच्या समस्यांवर वैध मार्गाने लढून उपाय काढण्यासह हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक
शेतकर्यांच्या कोणत्याही मालाला सरकारने घोषित (?) केलेला हमीभाव मिळत नसल्याने तो कवडीमोल भावात विकावा लागत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे बाजारपेठच उपलब्ध नसल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले. आज निर्बंध शिथिल झाले असले तरी शेतमालाच्या भावात वेगाने चढउतार होत आहेत. जूनमध्ये मागणीच्या तुलनेत आवक अल्प झाल्याने भाव वाढले. जुलैमध्ये महापुरामुळे आणि आता ऑगस्टमध्येही भाज्यांचे दर घसरल्याने शेतकर्यांनी टोमॅटो, ढोबळी मिरची रस्त्यावर फेकली. कवडीमोल भावामुळे लागवड व्यय तर सोडाच, वाहतूक भाडेही निघत नाही, अशी स्थिती शेतकर्यांची आहे. आडते (बाजार समितीत ज्यांच्याकडे शेतकरी प्रतिदिन स्वतःचा शेतमाल विकतो ते) आणि व्यापारी (आडत्यांकडून लिलावात माल खरेदी करणारे) संगनमताने दर न्यून करत असल्याचे अनेक शेतकरी अन् शेतकरी संघटना यांचे मत आहे. ही स्थिती अतिशय भयंकर आणि गंभीर आहे, तसेच या प्रकरणी प्रशासन अपेक्षित असे लक्ष घालत नाही, ही शोकांतिका आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर येथील अनिल पाटील या शेतकर्याने हमीभावाच्या जाचाला कंटाळून दोन एकर क्षेत्रात गांजा लागवड करण्याची अनुमती जिल्हाधिकार्यांकडे मागितली आहे. ‘गांजाला चांगला भाव असल्याने माझ्या २ एकर क्षेत्रात १५ सप्टेंबरपर्यंत गांजा लागवडीची अनुमती द्यावी, अन्यथा १६ सप्टेंबरला प्रशासनाकडून अनुमती मिळाली, असे गृहीत धरून मी लागवड चालू करीन. यास सर्वस्वी प्रशासन उत्तरदायी असेल’, अशा प्रकारची व्यथा पाटील यांनी उद्विग्न होऊन मांडली.
एकीकडे शेतकर्यांना ‘अन्नदाता’ अशी उपमा दिली जाते, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा दिल्या जातात, तर दुसरीकडे शेतमालाला हमीभाव न दिल्याने शेतकरी हवालदिल होऊन नाईलाजाने गांजासारखे पीक लावण्याची अनुमती मागतो वा माल रस्त्यावर टाकतो. याद्वारे शेतकर्याने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर राग व्यक्त केलेला दिसून येतो. शेतकर्यांच्या समस्या न सोडवल्याने शेतीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष येणार्या काळात सर्वांना भोगावे लागणार आहे. शेतकर्यांनी हवालदिल न होता शेती उत्तम रितीने करण्यासाठी वैध मार्गाने लढत त्यावर उपाय काढावा आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्न केल्यास शेतीच्या समस्या योग्य प्रकारे सुटतील, हे लक्षात घ्यावे !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव