‘२३.२.२०२० या उत्तररात्री ३ ते सकाळी ७ या कालावधीत मला ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप करायला सांगितला होता. ‘मी इतक्या वेळ बसू शकेन का ?’, अशी माझ्या मनात शंका येत होती; परंतु देवानेच माझ्याकडून नामजप करवून घेतला. त्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘ते आपल्याशी काहीतरी बोलत आहेत आणि सर्व साधकांना त्यांच्याकडून प्रकाशरूपी चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे
नामजपाला बसतांना समोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले होते. मी त्या छायाचित्राकडे पहात नामजप करत होते. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात पुष्कळ पालट जाणवला. ‘त्यांच्या डोळ्यांतील बुबुळे हलत आहेत’, असे वाटले. बोलतांना जशी जिवणी (ओठांचा भाग) हलते, तशी ती हालतांना दिसत होती आणि ‘ते आपल्याशी काहीतरी बोलत आहेत’, असे जाणवत होते. ‘ते पुष्कळ आनंदात असून हसत आहेत’, असे दिसत होते. ‘सर्व साधकांना त्यांच्याकडून प्रकाशरूपी चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.
२. जागरण सहन होत नसूनही त्या रात्री नामजप करता येणे, नामजप करतांना मन निर्विचार होणे, पुष्कळ शांत वाटणे आणि दुसर्या दिवशीही उल्हसित वाटत असल्याने ‘जागरण झाले आहे’, याची जाणीव न होणे
मला जागरण सहन होत नाही, तरी त्या दिवशी देवानेच माझ्याकडून तो नामजप करून घेतला. नामजप करतांना माझे मन निर्विचार झाले होते आणि नामजप एकाग्रतेने झाला. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटत होते, तसेच दुसर्या दिवशीही मला उल्हसित वाटत होते. त्यामुळे ‘जागरण झाले आहे’, याची मला जाणीव नव्हती. आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली होती, तरी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मला ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप करण्यास शक्ती मिळाली आणि नामजप करता आला’, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |