साप्ताहिक शास्त्रार्थ
‘९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, श्रावण मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
आपल्या धर्मग्रंथात वर्षाऋतूमधील श्रावण मासात प्रतिदिन विविध धार्मिक व्रते सांगितली आहेत. श्रावण मासात प्रत्येक रविवारी मौन धारण करून ‘गभस्ति’ नावाच्या सूर्याचे पूजन करावे. प्रत्येक सोमवारी अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातू, हे ५ मुठी धान्य शिवपिंडीवर वहावे. मंगळवारी मंगलागौरीचे व्रत आणि पूजन करतात. बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पतिपूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि वरदलक्ष्मी व्रत, तसेच शनिवारी अश्वत्थमारुति पूजन करतात. याविषयीची अधिक माहिती सनातन संस्थेच्या ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ या ग्रंथात दिली आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. भानुसप्तमी : रविवारी येणार्या सप्तमीला ‘भानुसप्तमी’ म्हणतात. या दिवशी सूर्याेपासनेला विशेष महत्त्व असते. २९.८.२०२१ या दिवशी भानुसप्तमी आहे. या दिवशी आदित्यहृदय स्तोत्र वाचावे.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. २९.८.२०२१ या दिवशी सकाळी १०.१० पर्यंत आणि १.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.२७ पासून २.९.२०२१ या दिवशी सकाळी ६.२२ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. श्रीकृष्ण जयंती : श्रावण कृष्ण पक्षात मध्यरात्री अष्टमी तिथी असलेल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्मोत्सव संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा करतात. वैष्णव संप्रदायात उदयव्यापिनी अष्टमी तिथी असलेल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी करतात. ३०.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजेपर्यंत अष्टमी तिथी आहे.
२ ई. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. ३०.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजेपर्यंत अष्टमी तिथी आहे.
२ उ. मन्वादि : श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला ‘मन्वादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ ऊ. गोपाळकाला : श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात. या दिवशी श्रीकृष्णाच्या आवडीचा गोपाळकाला करून तो मडक्यामध्ये (हंडीमध्ये) ठेवून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो.
२ ए. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १.९.२०२१ या दिवशी दुपारी १२.३४ पासून २.९.२०२१ या दिवशी सकाळी ६.२२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ऐ. अजा एकादशी : श्रावण कृष्ण पक्ष एकादशीला ‘अजा एकादशी’ म्हणतात. ३.९.२०२१ या दिवशी अजा एकादशी आहे. ‘कामिका एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूच्या ‘श्रीधर’ रूपातील पूजनाने पुण्यफलप्राप्ती होते’, असे मानले जाते. या दिवशी श्रीविष्णुसहस्रनाम वाचावे.
२ ओ. शनिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शनिवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. ४.९.२०२१ या दिवशी शनिप्रदोष आहे. संततीसुख मिळण्यासाठी आणि जीवनात येणार्या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
टीप १ – भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त, एकादशी आणि प्रदोष यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
(२०.८.२०२१)