स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वास्को येथील सेंट जेसिंतो बेटावर ध्वजारोहण करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा यांनी विरोध केल्याचे प्रकरण
पणजी, २६ ऑगस्ट (वार्ता.) – कोणत्याही राजकारण्याने राष्ट्रध्वज फडकावण्यास विरोध करू नये, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांना उद्देशून दिला. भारतीय नौसेनेने ‘भारत का अमृत महोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत १४ ऑगस्ट या दिवशी वास्कोजवळील सेंट जेसिंतो बेटावर ध्वजारोहण कार्यक्रम केला होता. या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते तथा माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी विरोध दर्शवला होता. या वेळी डिसोझा यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करून नौसेना सेंट जेसिंतो बेट कह्यात घेऊ पहात असल्याचे तर्कहीन वक्तव्य करून स्थानिकांमध्ये नौसेनेच्या विरोधात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हा सल्ला दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष २६ ऑगस्ट या दिवशी मुरगाव मतदारसंघाच्या दौर्यावर आले असतांना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते.
प्रदेशाध्यक्ष तानावडे पुढे म्हणाले, ‘‘एखाद्या व्यक्तीने मंत्री आणि आमदार या नात्याने काम केलेले असेल अन् त्याला देशाच्या ध्वजाची महत्त्व नसेल, तर त्याविषयी मी आणखी काय बोलणार ? राजकारण करण्यास आपला विरोध नाही; मात्र स्वार्थापोटी राजकारण करून ध्वजारोहणाला विरोध करणे, हे चुकीचे आहे.’’
‘ब्ल्यू फ्लॅग सर्टीफिकेशन’ योजना राबवतांना लोकांना विश्वासात घेणे आवश्यक ! – नगरविकासमंत्री मिलिंद नाईक
या वेळी उपस्थित असलेले नगरविकासमंत्री मिलिंद नाईक येथील बायणा समुद्रकिनार्याला ‘ब्ल्यू फ्लॅग सर्टीफिकेशन’ (पर्यावरणाविषयीचे प्रमाणपत्र) देण्याच्या सूत्रावर स्पष्टीकरणादाखल म्हणाले, ‘‘ब्ल्यू फ्लॅग सर्टीफिकेशन’ देण्याच्या योजनेविषयी मला माहिती नाही. भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी ही योजना आणली आहे आणि त्यांनी ही योजना राबवतांना लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.’’
काँग्रेस पक्षाने बायणा समुद्रकिनार्याला ‘ब्ल्यू फ्लॅग सर्टीफिकेशन’ देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. असे झाल्यास हिंदूंना श्री गणेशचतुर्थीला समुद्रकिनार्यावर श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास किंवा बायणा समुद्रकिनार्यावर असलेल्या काही धार्मिक स्थळांच्या ठिकाणी धार्मिक विधी करण्यास आडकाठी आणली जाणार असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.