राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेणार्‍या श्री राजपूत करणी सेनेचे अभिनंदन ! मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांच्या अर्पणावर डल्ला मारू पहाणार्‍या काँग्रेस सरकारच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

जयपूर (राजस्थान) – राजस्थान सरकार मेंहदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने त्याच्या डोक्यातून सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. श्री राजपूत करणी सेना मेहंदीपूर बालाजी मंदिर आणि राज्यातील अन्य मंदिरे यांचे सरकारीकरण होऊ देणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करू, अशी चेतावणी श्री राजपूत करणी सेनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना यांनी येथे दिली. मकराना यांनी तत्पूर्वी मेहंदीपूर बालाजी मंदिरात जाऊन ब्रह्मलीन महंत किशोरपुरी महाराज यांना छायाचित्रावर पुष्प अर्पित करून दर्शन घेतले. या मंदिराचे प्रमुख महंत किशोरपुरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वीच देहत्याग केला.

महिपालसिंह मकराना यांनी सांगितले की, ३१ ऑगस्ट या दिवशी मंदिरांना सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी आंदोलन करण्याची रूपरेषा मेहंदीपूर बालाजी मंदिरात ठरवली जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याचा प्रयत्न केला जाईल.