‘श्रीमती स्मिता नवलकर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. त्या ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांसाठी विज्ञापने मिळवणे आणि अर्पण घेणे, या सेवा करतात. त्यासाठी त्या भारतभर प्रवास करतात. त्यांचा साधना प्रवास आणि साधना करतांना त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे दिल्या आहेत.
८ ऑगस्ट २०२१ या दिवशी सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि देवद आश्रमात वास्तव्याला येणे, हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/501148.html
४. परात्पर गुरुदेवांनी अनेक प्राणघातक प्रसंगांमधून वाचवणे
४ अ. चारचाकीने ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेला जात असतांना अकस्मात् गाडीचा ‘ब्रेक’ निकामी होणे, गाडी एका ‘मर्सिडीज’ गाडीला धडकून उभी रहाणे, तेथे मर्सिडीज गाड्यांचे ‘शोरूम’ असणे, ‘शोरूम’च्या व्यवस्थापकांनी न रागावता प्रेमाने विचारपूस करणे : परात्पर गुरुदेवांनी मला अनेक वेळा प्राणघातक अपघातातून वाचवले. एकदा मी एकटीच चारचाकी घेऊन ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेला जात होते. अकस्मात् माझ्या चारचाकीचा ‘ब्रेक’ निकामी (फेल) झाला. संध्याकाळची कार्यालये (ऑफिस) सुटण्याची ५.३० ची वेळ होती. या वेळी मुंबईतील रस्त्यावर रहदारी (ट्रॅफिक) पुष्कळ असते. मार्गाच्या कडेलाही पदपथावर फेरीवाले, बस थांबा (‘स्टॉप’) असल्याने चारचाकी थांबवायला कुठे जागाच नव्हती. मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, आता तुम्हीच काहीतरी करा.’ मला कशीतरी एका ठिकाणी थोडी जागा मिळाली आणि मी चारचाकी कडेला घेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चारचाकी एका मर्सिडीज गाडीला धडकून उभी राहिली. तेथे मर्सिडीज गाड्यांचे ‘शोरूम’ होते. आस्थापनाच्या रखवालदाराने मला पाहिले आणि आत कळवले. तेथील व्यवस्थापक आले. त्यांनी मला पाहून विचारले, ‘‘तुला लागले नाही ना ? तू ठीक आहेस ना ?’’ एव्हढ्यात मी माझ्या ‘मेकॅनिकला’ तेथे येण्यासाठी दूरभाष केला. ‘मेकॅनिक’ येईपर्यंत त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बसायला सांगितले आणि मला कॉफी दिली. तोपर्यंत त्यांनी ‘आर्.टी.ओ.’ कार्यालयातून माझ्या चारचाकीचे तपशील मागवून घेतले होते. ते म्हणाले, ‘‘तुमच्याकडून एकदाही अपघात झाला नाही. तुम्ही हेसुद्धा मुद्दाम केले नाही. तुम्ही ठीक आहात ना ?’’ त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवच माझी प्रेमाने विचारपूस करत आहेत’, असे मला वाटले.
४ आ. सत्संगाहून येतांना पदपाथवर कुठलाही अडथळा नसतांना पडणे आणि हाताचा अस्थिभंग होऊन ‘प्लास्टर’ घालण्यात येणे, त्याही स्थितीत गुरुपौर्णिमा स्मरणिकेची सेवा आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येणे : एप्रिल २००० मध्ये मी सत्संगाहून येतांना मार्गात चारचाकीतून उतरून फळे आणि भाज्या घ्यायला जात होते. त्या वेळी पदपथावर कुठलाही अडथळा नव्हता, तरी मी साष्टांग नमस्कार घालतात, तशी पडले. मी त्याकडे दुर्लक्ष केले. घरी विज्ञापने आणणार्या साधकांचा सत्संग होता. मी घरी येऊन सत्संग घेतला. नंतर माझा हात पुष्कळ दुखायला लागला. त्या वेळी साधिका सौ. वीणा म्हात्रे यांनी माझ्या हाताला ओढणीने बांधले आणि मला आधुनिक वैद्यांकडे नेले. तेव्हा ‘हाताचा अस्थिभंग (फॅक्चर) झाला आहे’, हे लक्षात आले. माझ्या हाताला ‘प्लास्टर’ घालण्यात आले. त्याही स्थितीत घरी गुरुपौर्णिमा स्मरणिका आणि अर्पण सेवा चालू ठेवली. साधक घरी येऊन सेवा करायचे. त्या कालावधीत मिळालेल्या विज्ञापनांच्या नोंदी करण्याची कार्यपद्धत ठरवून सेवा परिपूर्ण करण्याचे प्रयत्न केले.
४ इ. ज्योतिषांनी ‘तुम्ही साधना करत असल्याने गुरुदेवांनी तुम्हाला जीवनदान दिले’, असे सांगणे : आमचे एक ज्योतिषी २५ वर्षांपासून परिचित होते. ते चारधाम यात्रेला गेले होते. ते मे मासात आल्यावर त्यांनी माझी विचारपूस केली. त्या वेळी ते मला पुनःपुन्हा ‘तुम्ही ठीक आहात ना ?’, असे विचारत होते. मी त्यांना ‘मी पडले आणि माझ्या हाताचा अस्थिभंग (फॅक्चर) झाला’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘बरे झाले. तुम्हाला मृत्यूयोग होता, ते हातावर निभावले. तुम्ही साधनेला आरंभ केला. तुमचे गुरु महान आहेत. त्यांनी तुम्हाला वाचवले आणि जीवनदान दिले.’’ त्या वेळी माझी भावजागृती होऊन परात्पर गुरुदेवांच्या प्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरणिका प्रकाशित करता येणे
परात्पर गुरुदेवांनी वर्ष २००० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरणिका प्रकाशित करण्याचा आनंद दिला. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनाही याचा आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘प्रथमच आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्मरणिका प्रकाशित करत आहोत.’’ ‘परात्पर गुरुदेवांनी ही सेवा करवून घेतली.
६. अनेक वेळा अनिष्ट शक्तींची आक्रमणे होऊन ‘परात्पर गुरुदेव सतत समवेत असतात आणि रक्षण करतात’, याची अनुभूती येणे
६ अ. नामजपादी उपाय करून २० वर्षांपासून होणार्या त्रासातून मुक्त करणे : परात्पर गुरुदेवांनी माझ्याकडून केवळ सेवा करून घेतली नाही, तर त्यांनी मला अनेक प्रसंगात जीवनदानही दिले आहे. सनातन संस्थेत येण्यापूर्वी आमचा व्यवसाय आणि कौटुंबिक आयुष्य आनंदात चालले होते. काही लोकांना ते बघवायचे नाही. त्यामुळे माझ्यावर करणी आणि जादूटोणा यांचे पुष्कळ प्रयत्न झाले. त्या वेळीही परात्पर गुरुदेवांनीच माझे रक्षण केले आणि मला वाचवले. एकदा श्री. नवलकर यांनी मला एका भगताकडे नेले. लक्षावधी रुपये व्यय केले; परंतु त्याचा तात्पुरता परिणाम व्हायचा. कुणीच माझा त्रास दूर करू शकले नाही. वर्ष १९९९ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या भेटीनंतर माझा एकदाच त्रास वाढला होता. मी घरी असायचे आणि परात्पर गुरुदेव मुंबई येथील सेवाकेंद्रात होते. त्यांनी माझ्यासाठी नामजपादी उपाय केले आणि मला २० वर्षांपासून होणार्या त्रासातून मुक्त केले. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.
६ आ. ‘वॅगनार’ गाडीला ‘ट्रेलरने धडक देऊनही दोघेही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने जिवंत रहाणे आणि त्या वेळीही स्थिर अन् शांत रहाता येणे : वर्ष २०१४ मध्ये श्री. नवलकर यांना ‘फिजिओथेरेपी’साठी ‘एम्.जी.एम्’ रुग्णालयात (कळंबोली येथे) घेऊन जावे लागायचे. एकदा रुग्णालयातून निघाल्यावर कळंबोली ‘सर्कलला’ पोलिसांनी जायला सांगितल्यावर मी गाडी चालू केली आणि १० मीटर अंतर गेल्यावर एक ‘ट्रेलर’ माझ्या गाडीवर धडकला. माझ्या बाजूचे दार दबले गेले. त्या वेळी ‘श्रीकृष्णाने ‘ट्रेलर’ थांबवला’, असे मला वाटले, नाहीतर ‘ट्रेलरने’ धडक दिल्यामुळे माझी ‘वॅगनार’ गाडी ‘ट्रेलर’च्या खाली आली असती आणि आम्ही जागच्या जागीच गेलो असतो. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनीच आमचे रक्षण केले. एवढा मोठा अपघात होऊनही मी स्थिर आणि शांत होते. पोलिसांनाही याचे आश्चर्य वाटले. त्यांनी २ – ३ वेळा मला ‘तुम्ही ठीक आहात ना ? तुम्हाला चहा-पाणी हवे का ?’, असे विचारले. त्यांनी आम्हाला सर्वतोपरी साहाय्य केले. हे केवळ परात्पर गुरुदेवांमुळेच शक्य झाले.
६ इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी जोधपूरहून मुझफ्फरपूर येथे जातांना अकस्मात् अस्वस्थ वाटू लागणे आणि परात्पर गुरुदेवांनी रक्षण केल्याचे जाणवणे : एकदा मी हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी जोधपूरहून मुझफ्फरपूरला चालले होते. वाराणसी येथे श्री. जुवेकरकाका साहित्य घेऊन उतरले. वाराणसीहून गाडी सुटल्यावर अकस्मात् मला अस्वस्थ वाटू लागले. मला नामजपादी उपाय करूनही आराम वाटत नव्हता. आमच्या वातानुकूलित (A.C) डब्यातील पुष्कळ प्रवासी वाराणसी येथे उतरले. मी भ्रमणसंगणक काढून सेवा करण्याचा प्रयत्न केला; परंतु माझा त्रास अल्प होत नव्हता. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘माझे काहीही होऊ दे; परंतु साधकांमध्ये होऊ दे. मला बेवारश्याप्रमाणे मरण नको. मला साधकांकडे पोचवा.’ मुजफ्फरपूर रेल्वेस्थानक आल्यावर डब्यातील एका प्रवाशाने माझे सामान स्वतःहून स्थानकावर उतरवून दिले. सौ. आशा झा मला न्यायला आल्या होत्या. त्यांच्या घरी पोचल्यावर बाहेरच मला भडभडून उलटी झाली आणि मला आराम पडला. त्या वेळीही परात्पर गुरुदेवांनी माझी काळजी घेतली आणि रक्षण केले, असे जाणवले.
६ ई. सेवेसाठी अलाहाबादहून धनबाद येथे जातांना पोट खराब होऊन अस्वस्थ वाटणे आणि वाराणसी स्थानकात पू. नीलेश सिंगबाळ यांनी थंड पेय आणून दिल्यावर ‘परात्पर गुरुदेवांचे चरणतीर्थ प्यायला मिळाले’, असे वाटून बरे वाटणे : एकदा मी अलाहाबादहून धनबादला जाण्यासाठी निघाले असतांना आगगाडी उशिरा आली. त्या वेळी माझे पोट खराब झाले. सौ. श्रेया आणि गुरुराज प्रभु मला स्थानकावर सोडायला आले होते. त्याही स्थितीत मी प्रवास चालू ठेवला. मला मध्यरात्रीपर्यंत ५ – ६ वेळा जुलाब झाल्याने मी थकून गेले होते. पहाटे वाराणसी स्थानक आले. पू. नीलेश सिंगबाळ केबलवाल्यांना संपर्क करण्यासाठी धर्मसत्संगाच्या ‘सी.डी.’ घेऊन आले होते. मला उठून बसताही येत नव्हते. त्यांची क्षमा मागून मी त्यांना ‘मला काहीतरी थंड पेय प्यायला घेऊन या’, असे सांगितल्यावर त्यांनी मला थंड पेय आणून दिले. आगगाडी चालू झाली. थंड पेय घेतल्यावर मला पुष्कळ बरे वाटले. ‘परात्पर गुरुदेवांचे चरणतीर्थच प्यायला मिळाले’, असे मला वाटले. ‘धनबादला उतरल्यावर मी ठीक झाले’, याचे मला आश्चर्य वाटले. ‘पू. नीलेशदादांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी चैतन्य दिले’, यासाठी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.
(क्रमश: पुढील रविवारी)
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/506800.html