परात्पर गुरुदेवांच्या कृपेने अनेक प्रसंगांत रक्षण झाल्याची अनुभूती घेऊन विज्ञापने आणि विविध माध्यमांतून अर्पण मिळवण्याची सेवा करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर यांचा साधनाप्रवास !
‘श्रीमती स्मिता नवलकर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. त्या ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांसाठी विज्ञापने मिळवणे आणि अर्पण घेणे, या सेवा करतात. त्यासाठी त्या भारतभर प्रवास करतात. त्यांचा साधना प्रवास आणि साधना करतांना त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे दिल्या आहेत.
१. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी
१ अ. सांप्रदायिक जीवन न रुचणे : आम्ही व्यावसायिक असल्याने माझा निरनिराळ्या संप्रदायांच्या लोकांशी संपर्क यायचा. तेव्हा प्रत्येकाला वाटायचे ‘आम्ही त्यांच्या संप्रदायाप्रमाणे साधना करावी’; परंतु एकाही संप्रदायाचे विचार माझ्या आतमध्ये पोचत नव्हते. मला त्यांचे ‘भजन, कीर्तन, सत्संग, प्रसाद घेणे, तेथील संतांचे ऐषारामात रहाणे, दिखावा’, हे भावत नव्हते. त्यामुळे मी अशा लोकांपासून दूर रहाणेच पसंत केले. माझा परात्पर गुरु डॉक्टरांशी संपर्क झाल्यावर मला सत्संगाची ओढ लागली.
२. सनातन संस्थेशी संपर्क
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट होऊन तीळ गुळाला चिकटतो, तशी परात्पर गुरुदेवांच्या चरणी जोडले जाणे : १४.१.१९९९ या दिवशी माझी मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांशी प्रथम भेट झाली. आमच्या व्यवसायामुळे मला भारतभरातील पुष्कळ तीर्थक्षेत्रांचे दर्शन झाले. माझ्या अनेक संतांच्या भेटी झाल्या; परंतु ‘परात्पर गुरुदेवांची भेट झाली आणि मला हवे असलेले तीर्थस्थान मिळाले’, असे मला वाटले. तीळ गुळाला चिकटतो, तशी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी जोडले गेले.
काशी देखी मथुरा देखी ।
घूमे चारों धाम ।
पर कहीं न मनका मीत मिला ।
आई सनातन धाम (सनातन- गुरूंचे समष्टी रूप) ।।
२ आ. सत्संगाला जाणे : मला परात्पर गुरुदेवांचे विचार, कार्य आणि साधनापद्धत मनापासून भावली. मी सत्संगाला जाऊ लागले. ‘सत्संगाचा मला झालेला लाभ अन्य लोकांनाही मिळावा’, यासाठी मी माझ्या बांद्रे येथील निवासस्थानी आणि जवळच असलेल्या गणेशमंदिरात सत्संग चालू केले.
२ इ. सेवेला आरंभ
२ इ १. मी ओळखीच्या लोकांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, ग्रंथ प्रदर्शन लावणे, अशा सेवांना आरंभ केला. आमच्या विभागात एका जाहीर प्रवचनाचे नियोजन केले.
२ इ २. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित होणार्या स्मरणिकेसाठी विज्ञापने आणणे, नियमितपणे विज्ञापनदात्यांना संपर्क करणे अन् विज्ञापने आणि अर्पण घेण्यास जाणे : त्यानंतर गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू झाला. स्मरणिकेसाठी विज्ञापने आणणे, संपर्क करणे आणि अर्पण घ्यायला जाणे चालू केले.
२ इ २ अ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवणे : पुढे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने आणणे आणि संपर्क करणे चालू केले. त्या वेळी ‘पितांबरी’ आणि ‘युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’ यांच्याकडून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ला पूर्ण पान विज्ञापने मिळाली. तेथून माझा विज्ञापने आणण्यासाठी संपर्क करण्याच्या सेवेला आरंभ झाला.
२ इ २ आ. विज्ञापन संपर्क विभाग चालू करणे : ‘युनिट ट्रस्ट’ला पावती हवी होती. त्या वेळी आमच्या व्यवसायामुळे आम्हाला जाहिरात आस्थापनांची देयके आणि पावत्या यायच्या. त्यावरून मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’साठी देयके आणि त्याच्या पावत्या बनवल्या. पू. पृथ्वीराज हजारे यांच्या साहाय्याने ‘विज्ञापन संपर्क विभाग’ चालू झाला. त्याच वेळी एप्रिल १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ची गोवा-सिंधुदुर्ग आवृत्ती चालू झाली आणि लागोपाठ पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे आणि रायगड ही आवृत्तीही चालू झाली.
२ इ २ इ. विज्ञापन (जाहिरात) आस्थापनांच्या लोकांनी सेवेतील बारकावे सांगून साहाय्य करणे आणि विज्ञापनांच्या संपर्क सेवेचे दायित्व घेणे : आम्ही सर्व नवीन असल्याने कुणालाच या सेवेविषयी अनुभव नव्हता. विज्ञापन मिळवण्यासाठी मी प्रथम काही विज्ञापन देणारी आस्थापने (जाहिरात कंपन्या), अधिकोष आणि लहान-मोठे उद्योजक यांना संपर्क करायला आरंभ केला. त्या वेळी ‘विज्ञापनांचे (जाहिरातींचे) दरपत्रक बनवणे, विज्ञापने घेतांना विज्ञापनदात्यांकडून कुठल्या प्रकारे लिखाण (मजकूर) घ्यायचे’, यासाठी मला काही विज्ञापन (जाहिरात) आस्थापनांच्या लोकांनी साहाय्य केले. त्यांनी ‘पॅकेज विज्ञापने’ कशी घ्यायची ? किती सूट ठेवायची ? ‘देयके’ कशी बनवायची ? विज्ञापनाची संरचना कशी करायची ? कुठल्या विज्ञापनांना प्राधान्य द्यायचे ? छपाई (प्रिंटिंग) चांगली होण्यासाठी रंगसंगती कशी असायला हवी ?’ इत्यादी बारकावे सांगितले. त्याप्रमाणे संरचना करणार्या साधकांनी पालट केले. हे सर्व करत असतांना ‘विज्ञापनांच्या संपर्क सेवेचे दायित्व माझ्याकडे कधी आले ?’, ते माझ्या लक्षातच आले नाही.
२ इ २ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘विज्ञापनांसाठी संपर्क करणे’ हा नवीनच विषय असल्याने सर्व ठिकाणी जाऊन साधकांना शिकवावे लागणार असल्याचे सांगणे : एप्रिल १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ची गोवा आवृत्ती चालू झाल्यापासून पुष्कळ वेळा माझा गोव्यात मुक्काम असायचा. डिसेंबर १९९९ मध्ये गुरुदेव मुंबईत आले असतांना मी त्यांना भेटले असता ‘विज्ञापनांच्या संपर्क सेवेसाठी आणखी कसे प्रयत्न करू?’, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला विज्ञापनांसाठी संपर्क करण्याविषयी काय सांगणार ? मी वैद्यकीय क्षेत्रातील माणूस, मला औषधांविषयी विचारले, तर सांगू शकतो.’’ त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही नाही सांगणार, तर कोण सांगणार ?’’ मी त्यांना माझ्याकडून झालेले प्रयत्न, प्रसारासाठी लागणारे आवाहन पत्र, दर पत्रक, काही विज्ञापनदात्यांकडून ‘सनातन प्रभात’मुळे मिळालेला चांगला प्रतिसाद, याविषयीची पत्रे दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘वा छान ! ’’ त्यांनी धारिका पाहिली आणि श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवानदादा) यांना सांगितले, ‘‘या सर्वांच्या छायांकित प्रती काढून सर्व ठिकाणी पाठवा.’’ ते मला म्हणाले, ‘‘साधकांना सत्संग घ्यायला १० वर्षे लागली. ‘विज्ञापनांसाठी संपर्क करणे’, हा नवीनच विषय आहे. तुम्हालाच सर्व ठिकाणी जाऊन साधकांना शिकवावे लागणार आहे.’’ तेव्हापासून मी ठिकठिकाणी जाऊ लागले. त्या वेळी त्यांचा संकल्पच झाला होता. त्यांचा संकल्प आणि कृपा यांमुळे मी सर्व ठिकाणी जाऊन सेवा करू शकले. परात्पर गुरुदेवांनी या सेवेचा संकल्प वर्ष १९९९ मध्ये केला आणि तेव्हापासून ते आम्हा साधकांकडून ही सेवा करवून घेत आहेत. मला त्यासाठी कृतज्ञता वाटते. त्यांच्या संकल्पामुळे आता भारतभरातील अनेक साधक ही सेवा उत्तम प्रकारे करत आहेत. त्या माध्यमांतून साधक ‘सनातन प्रभात’ची सर्व नियतकालिके, सनातन पंचांग, ग्रंथ, फ्लेक्स’, यांसाठी विज्ञापने मिळवत आहेत. मी सर्व साधक आणि परात्पर गुरुदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
२ इ २ उ. सेवा करतांना कधीही थकवा आणि कंटाळा न येणे, उलट सेवेचा उत्साह वाढणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सतत आनंदात ठेवले असणे : विज्ञापनांच्या संपर्क सेवेसह परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सनातनचे आश्रम आणि स्वयंपाकघर यासाठी लागणारे साहित्य, कलामंदिरासाठी लागणारे विविध छायाचित्रक (‘कॅमेरे’) अन् अन्य साहित्य, शक्तिरथ अन् धर्मरथ या संदर्भातील सेवाही होत आहे. ते मला त्यांतील बारकावे शिकवत आहेत. माझा या सेवेतून समाजाशी संपर्क वाढला आणि शिकायलाही पुष्कळ मिळाले. परात्पर गुरुदेवच सर्वकाही करायचे. त्यांचेच नियोजन असायचे. त्यांच्या संकल्पामुळे मला प्रत्येक ठिकाणी भरपूर साहाय्य मिळाले आणि अर्पणही मिळायचे. मी केवळ निमित्तमात्र असायचे. त्यामुळे कुठलीही मागणी आली की, मी ‘हो’ म्हणायचे. मला लक्षात यायचे, ‘सर्व नियोजन झालेले आहे. मला केवळ प्रत्यक्ष जाऊन कृती करायची आहे.’ या सेवा करत असतांना कधीही थकायला झाले नाही की, कंटाळा आला नाही. उलट माझा उत्साह वाढायचा. परात्पर गुरुदेवांनी मला आनंद दिला आणि सतत आनंदात ठेवले आहे.
३. देवद आश्रमात वास्तव्याला येणे
३ अ. परात्पर गुरुदेवांनी आश्रमात रहायला यायला सांगणे आणि आश्रमात आल्यावर थोड्याच अवधीत यजमानांनीही आश्रमजीवन स्वीकारणे : वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरुदेवांनी ‘तुम्ही आश्रमात रहायला या’, असे सांगितले. श्री. नवलकर यांच्या मनाची सिद्धता व्हायला २ वर्षे लागली. परात्पर गुरुदेवांचा संकल्प आणि कृपा यांमुळे आम्ही वर्ष २००६ पासून आमचे मुंबई येथील निवासस्थान सोडून देवद आश्रमात वास्तव्याला आलो. मी बाहेर प्रसारात असल्याने मला आश्रमात रहाणे जुळवून घेता आले; परंतु मला वाटले, ‘श्री. नवलकर यांना हे जमेल का ?’; परंतु त्यांनीही थोड्या अवधीत आश्रमजीवन स्वीकारले. श्री. नवलकर यांनी २ वर्षानंतर व्यवसाय बंद केला.
३ आ. घरातील श्री स्वामी समर्थांच्या पादुका रामनाथी आश्रमात ठेवणे : श्री. नवलकर यांच्या आई (माझ्या सासूबाई) स्वामी समर्थांची भक्ती करायच्या. आमच्या घरी सोवळ्याने पूजा व्हायची. माझ्या सासर्यांना त्यांच्या लहानपणी स्वतः श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या पादुका आमच्या निवासस्थानी होत्या. आम्ही देवद आश्रमात कायमस्वरूपी निवासाला आल्यावर मी सेवेनिमित्त सतत बाहेर असल्याने आश्रमात माझ्याकडून नित्यनेमाने प्रति गुरुवारी अभिषेक होत नसे. मी १ – २ वर्षांनी त्या पादुका परात्पर गुरु पांडे महाराज यांना दाखवल्या. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांना ‘पादुका पाहून काय वाटते ?’, असे विचारले. तेव्हा साधकांना औदुंबराचे झाड, गाय आणि दत्तगुरु यांचे दर्शन झाले. त्याच कालावधीत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देवद आश्रमात आल्या होत्या. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांना पादुका दाखवल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘यांचे स्थान येथे नाही तर, रामनाथी आश्रमात आहे.’’ त्या पादुका रामनाथी आश्रमात घेऊन आल्या. आता त्या पादुका रामनाथी आश्रमात जतन केल्या आहेत. पादुकांना त्यांचे योग्य स्थान मिळाल्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३ इ. यजमानांच्या आजारपणात साधकांनी त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेणे, यजमानांच्या मृत्यूनंतरही परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सर्व विधी आणि वर्षश्राद्ध आश्रमात केले जाणे : आम्ही आश्रमात रहायला आल्यावर साधकांनी श्री. नवलकर यांच्या आजारपणात त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली. एवढेच नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतरही सर्व विधी, दिवस कार्य आणि वर्षश्राद्ध, हे सर्व मी जे घरी करू शकले नसते, ते परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आश्रमात केले. मला जराही लक्ष घालावे लागले नाही. यावरून ‘परात्पर गुरुदेवांनी एकदा हात पकडला, तर ते शेवटपर्यंत सोडत नाहीत’, याची जाणीव झाली. ‘श्री. नवलकर जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले’, ही परात्पर गुरुदेवांची मोठी कृपाच आहे. (कै. सुबोध नवलकर यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे.)
३ ई. यजमानांच्या मृत्यूनंतर साधिकेची उत्तम काळजी घेणे : कै. नवलकर यांच्या मृत्यूनंतर आश्रमात माझी उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते. मला जराही एकटे वाटत नाही. मला सर्व साधकांचे प्रेम मिळते. मला मोठे कटुंब मिळाले. आम्ही घर सोडून आश्रमात आल्यावर एकदा परात्पर गुरुदेवांनी विचारले, ‘‘तुम्ही मोठ्या घरातून एका लहान खोलीत रहायला आलात. तुम्हाला कसे वाटते ?’’ त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही लहान घरातून मोठ्या घरात, मोठ्या कुटुंबात रहायला आलो आहोत.’’ त्यांना हे ऐकून आनंद झाला आणि ते म्हणाले, ‘‘छान, आता मी निर्धास्त झालो.’’
(क्रमशः वाचा पुढच्या रविवारी)
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०२०)
|