१. पाप आणि पुण्य
१ अ. पाप
१ अ १. सुख आणि दुःख यांचा हिशोब : ‘जन्मभर पाप केले आणि ‘सुख नाही’ म्हणतो. दुसर्यांना दुःख दिले, मग याला सुख कुठून मिळणार ? तू दुसर्यांना सुख दिलेस, तर तुला सुख मिळेल. तू दुसर्यांना दुःख दिलेस, तर देव तुला दुःखात बुडवल्याविना रहाणार नाही.’
१ अ २. तुम्ही करत असलेल्या कर्माची नोंद परमेश्वराने ठेवणे आणि केलेल्या वाईट कर्माची फळे मेल्यावर भोगावीच लागणे : ‘पापे करू नका आणि हरामाचे खाऊ नका. कुणाला ‘ब्लॅकमेल’ करू नका. परमेश्वर पहात आहे. त्याचे डोळे मोठे आकाशाएवढे आहेत. आमचे डोळे अगदी लहान आहेत. तुम्ही जे काही कर्म करता त्याची सर्व नोंद देव वरती ठेवतो. केलेल्या वाईट कर्माची फळे मेल्यावर भोगावीच लागतील. पापाला तुमच्या घरातील कुणीच भागीदार होणार नाहीत. वाल्या कोळ्याच्या पापाला कुणी भागीदार झाला नाही. तशी तुमची दशा होईल.’
१ अ ३. पाप दुःख भोगून किंवा भक्ती करून पुण्य साठवूनच फेडावे लागत असणे, कुठेही आणि कसलेही पाप केले, तरी ते देवापासून लपू शकत नसणे : ‘पाप करतांना बरे वाटते, मजा वाटते; परंतु ते पाप फेडतांना सजा (शिक्षा) होते. देव आपल्याला पहात आहे. त्याच्याकडे मोठी पाप-पुण्याची वही आहे, हिशोब आहे. काळोखात काही केले, तरी ते लपत नाही. केलेले पाप दुःख भोगून फेडावे लागते किंवा भक्ती करून पुण्य साठवून फेडावे लागते. असे दोनच पाप फेडण्याचे मार्ग आहेत. तेही इथेच फेडता येईल. मेल्यावर शरीर नाही. मग पूजा, ध्यान आणि नामस्मरण कसे होणार ? पापी जिवाला मृत्यूनंतर फार यातना भोगाव्या लागतात.’
१ अ ४. कर्माचे फळ भोगावे लागू नये; म्हणून ‘आपल्या हातून पाप होणारच नाही’, अशी सावधानता बाळगावी ! : ‘तुमच्या घरात कुठला रोग पाठवायचा ? मोठा पाठवायचा कि छोटा रोग पाठवायचा ?’, हे देवाच्या हातात आहे. मोठमोठ्या रोगांच्या वरती बैठका होतात. ‘मृत्यू कुणाकडे पाठवायचा ? रोग कुठे पाठवायचे ? संकटे कुठे पाठवायची ?’, हे सर्व वरती देवाकडे ठरते आणि मग खाली आपल्यावर त्या ‘मिठाई’चा खोका आपटतो. ज्याचे जसे कर्म असेल, तसे त्याला बक्षीस मिळते. तुम्ही पापाने वागला असाल, तर तुमच्या घरी बहिरी, तिरळी, आंधळी, लंगडी, मंदबुद्धीची मुले जन्माला येतात. मग जन्मभर भोगा आपल्या कर्माची फळे ! यासाठी ‘आपल्या हातून पाप होऊ नये’, अशी सावधगिरी बाळगावी. पुण्यापोटी सुख आणि पापापोटी दुःख येतेच येते. सांभाळून वागा, सत्याने चाला, धर्माप्रमाणे वागा, नीतीने चाला, परोपकार करा. मग पहा, सुख तुमच्या घरी पाणी भरील. लक्ष्मी सदैव तुमच्या घरी रहायला येते, धनाचा पुरवठा करते आणि तुम्हाला काहीही न्यून पडू देत नाही.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), मु.पो. निवळी (कातळवाडी), ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
(पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)
(संदर्भ : लवकरच सनातन संस्था प्रकाशित करणार्या ग्रंथातून)