आजपासून वाचा नवीन सदर
‘साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’सेवेतील लहान-मोठ्या त्रुटींमुळे साधनेची हानी होते, हे लक्षात घेऊन चुकांविरहित आणि परिपूर्ण सेवा करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांकडून कसे प्रयत्न करवून घेतले, हे सांगणारी लेखमालिका आजपासून चालू करत आहोत. |
१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या लहान चुकांचा अभ्यास करण्याचे कारण‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘बातम्या चुकीच्या छापल्या’, यासारख्या गंभीर चुका होत नाहीत, तर व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या थोड्या चुका आहेत. या टप्प्याच्या चुकांमुळे वाचकांची काही हानी होत नाही; परंतु यामुळे गेल्या १० – १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांची प्रगती लवकर होत नाही. त्यांच्या जीवनातील साधनेचा काळ या चुकांमुळे वाया जाऊ नये, यासाठी मी या चुकांचा अभ्यास करत आहे.’ २. साधकांनो, तुम्हीही या पद्धतीने तुमच्या सेवेच्या स्तरावरील चुकांचा अभ्यास केल्यास तुमची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होईल !‘दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील साधकांनी त्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्यांची साधना व्हावी, यासाठी त्यांच्या चुका किती गांभीर्याने घेऊन त्यावर प्रयत्न चालू केले आहेत, हे या लेखमालेतून लक्षात येते. अशाच प्रकारे ग्रंथ, कला, संगीत, लेखा, ध्वनी-चित्रीकरण, संशोधन, प्रसार इत्यादी सेवा करणार्या आणि इतर सर्वच साधकांनी स्वतःच्या सेवेच्या संदर्भातील चुका लक्षात घेऊन अंतर्मुख होऊन त्यांवर या पद्धतीने प्रक्रिया केल्यास त्यांच्याही चुका अल्प होतील आणि त्यांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक-संपादक, ‘सनातन प्रभात’ |
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते दिवसातील ३ – ४ घंटे देऊन बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांना अनेक वेळा एकच बातमी किंवा लेख वाचूनही ज्या चुका लक्षात आलेल्या नसतात, त्या चुका एकाच वाचनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात येतात. ते त्या सर्व चुका ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवतात. चुका लक्षात आणून देण्यामागील त्यांचा उद्देश अत्यंत कृपाळू आहे. साधकांनी निष्काळजीपणे आणि पाट्याटाकूपणे सेवा केल्याने या चुका होतात. या चुकांचा समष्टी स्तरावर विशेष परिणाम दिसून येत नाही. यांतील बहुतांश चुका सामान्य वाचकांच्या लक्षातही येत नाहीत. असे असले, तरी या चुकांमुळे ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी होते. चुकांमुळे साधना व्यय झाल्यामुळे अनेक वर्षे साधना करत असूनही साधकांची आध्यात्मिक प्रगती झालेली नाही. साधकांनी साधनेच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या तळमळीमुळेच ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांना आता काही प्रमाणात चुकांची जाणीव होऊ लागली आहे. ‘चुकांचे प्रमाण अल्प होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून कशा प्रकारे प्रयत्न करवून घेतले ?’, हे या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या २ मासांहून अधिक काळ वारंवार चुका दाखवून परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला अंतर्मुखतेच्या दिशेने वाटचाल करायला शिकवत आहेत. या सदराच्या अंतर्गत केलेल्या लिखाणात प्राधान्याने शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्याच चुका असल्या, तरी त्यांचा अभ्यास सर्व प्रकारच्या सेवा करणार्या सर्वत्रच्या साधकांसाठी उपयुक्त आहे. एखादी सेवा पूर्ण करण्यासाठी अनेक टप्प्यांवर प्रयत्न करावे लागतात. अनेकदा दिसून येते की, एखाद्या सेवेची अंतिम फलनिष्पत्ती जरी चांगली मिळाली, तरी ‘त्या सेवेतून साधकाची साधनावृद्धी होतेच’, असे नाही. ‘ईश्वराची कृपा, गुरूंचा संकल्प आणि काळाची आवश्यकता’, यांमुळे सेवा चांगली होते. सेवेची फलनिष्पत्ती कशीही मिळाली, तरी साधकाने सदैव आत्मचिंतन करणे आवश्यक असते. ‘सेवा करतांना प्रत्येक टप्प्यावर ती अचूक होण्यासाठी प्रयत्न झाले का ? त्या सेवेद्वारे साधकात जे गुण रुजणे अपेक्षित असते, त्यासाठी प्रयत्न झाले का ? स्वतःतील कोणत्या स्वभावदोषामुळे सेवेतील आनंद अनुभवण्यास आपण अल्प पडलो ?’, याचे चिंतन होणे आवश्यक असते. त्यावर प्रयत्न केले की, सेवेतून साधना होऊ लागते. अशा सेवेतून साधकाची आध्यात्मिक वाटचाल जलद गतीने होते.
‘साधनेच्या एका टप्प्यावर अडकलेल्या आमच्यासारख्या जिवांना गती देण्यासाठी परात्पर गुरुमाऊलीने सूक्ष्मातून किती आणि काय काय केले आहे ?’, हे आमच्यासारख्या अतीसामान्य जिवांना कळूच शकत नाही. ‘त्यांनी आमच्या साधनेला गती देण्यासाठी या काळात किती कष्ट घेतले ?’, याचे केवळ स्थुलातील अनुभवकथन समष्टीला शिकता येण्यासाठी येथे करत आहोत. ‘हे लिखाण वाचून सर्वच साधकांना अचूक आणि परिपूर्ण सेवा करण्याची प्रेरणा मिळावी’, ही परात्पर गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०.५.२०२१ या दिवसापासून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुका लक्षात आणून देणे
२०.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये व्याकरण आणि लिखाणाचे संकलन यांच्या अनेक चुका लक्षात आणून दिल्या. त्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी निरोप पाठवला, ‘व्याकरणाच्या आणि संकलनाच्या छोट्या छोट्या चुका असलेला ‘सनातन प्रभात’चा पहिलाच अंक !’ त्यांनी साधकांना या चुकांविषयी स्वभावदोष-निर्मूलन सत्संगात चर्चा करून प्रायश्चित्त किंवा स्वतःला झेपेल, एवढी शिक्षा घेण्यास सांगितले. ‘या चुका श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दाखवून आश्रमातील फलकावरही लिहिणे, तसेच त्या चुकांसाठी उत्तरदायी असलेल्या साधकांची नावेही तेथे लिहावीत’, असा निरोप त्यांनी पाठवला. परात्पर गुरु डॉक्टरांनी या पूर्वीही दैनिकातील चुका दाखवल्या आहेत; मात्र त्यांचा हा निरोप वाचून साधक स्तब्ध झाले. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार साधकांनी ‘फलकावर चुका लिहिणे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना चुका दाखवून ‘आम्ही साधनेत कुठे उणे पडतो ?’, हे जाणून घेणे’, असे सर्व केले. त्यानंतर प्रतिदिन परात्पर गुरुदेव अशाच प्रकारे दैनिकातील चुका कळवू लागले.
२. साधकांना चुकांची जाणीव होऊनही साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांमध्ये विशेष वाढ न होणे
गुरुदेवांकडून नियमित चुका येऊ लागल्यावर ‘आपले साधनेच्या स्तरावर काहीतरी चुकत आहे’, हे सर्वांच्याच लक्षात येऊ लागले; पण आमच्या साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली नव्हती. ‘कळते; पण वळत नाही’, अशी आमची स्थिती होती. आम्हाला चुकांची जाणीव होऊ लागली असली, तरी त्या सुधारण्यासाठी प्रयत्न विशेष होत नसल्याने आमच्याकडून होणार्या चुकांची संख्या वाढतच होती.
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी लक्षात आणून दिलेल्या चुकांवरही दैनिकाच्या संदर्भातील सेवा करणार्या साधकांच्या नियमित सत्संगात वरवरची चर्चा होणे
दैनिकाच्या संदर्भातील सेवा करणार्या साधकांच्या नियमित सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांनी लक्षात आणून दिलेल्या चुकांविषयी चर्चा होत असे; मात्र ती चर्चा अपूर्ण असे. सामान्यतः आपल्याला वाटते, ‘ही चूक माझ्याकडून झाली आहे’, असे म्हटले की, आपण चूक स्वीकारली !’ ‘हे म्हणणे किती वरवरचे असते !’, हे देवाने या कालावधीत आमच्या लक्षात आणून दिले. खर्या अर्थाने चूक स्वीकारणे, म्हणजे ती चूक पुन्हा होऊ न देण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे ! दैनिकाच्या संदर्भातील सेवा करतांना झालेल्या चुकांची आम्ही चर्चा करायचो; पण चूक सुधारण्यासाठीची पुढील प्रक्रिया आमच्याकडून गांभीर्याने होत नव्हती. आमच्यापैकी काही साधक त्या चुका आश्रमातील फलकावर लिहायचे; पण चुका पुन्हा होऊ न देण्यासाठी ‘स्वभावदोषाच्या मुळाशी जाणे, त्यावर गांभीर्याने आणि सातत्याने प्रयत्न करणे’, हे आमच्याकडून होत नसे. ‘व्याकरणाची चूक म्हणजे निष्काळजीपणाची चूक’, असे एक समीकरण झाले होते. ‘पुढील वेळी काळजीपूर्वक वाचन करूया’, असे म्हणून तो विषय तिथेच थांबत असे.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संग घेऊन दिशादर्शन केल्यानंतर चुका होण्यामागील स्वभावदोष आणि अहं यांचे अनेक अडथळे साधकांच्या लक्षात येणे
आम्हाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी परात्पर गुरुदेवांनीच आम्हाला साहाय्य केले. परात्पर गुरुदेवांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हा साधकांचा सत्संग घेऊन अंतर्मुख होण्याच्या दृष्टीने आम्हाला दिशादर्शन केले. ‘अत्यल्प प्राणशक्ती असतांनाही आम्हाला चुका दाखवून गुरुमाऊली कृपेचा वर्षाव कसा करत आहे !’, याची त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी आम्हाला जाणीव करून दिली, ‘निष्काळजीपणा’ हा एक सामूहिक पैलू आहे. ‘प्रत्यक्षात स्वतःच्या संदर्भात नेमकेपणाने काय होते, ज्यामुळे पृष्ठवाचन करतांना त्रुटी रहातात ?’, याचा अभ्यास करा.’ त्यानंतर चिंतन केल्यावर ‘सेवा करतांना मनात अन्य अनेक विचार असल्यामुळे सेवेत लक्ष एकाग्र नसणे, त्या सेवेशी निगडित नसलेल्या विषयांवर चर्चा करणे, सेवेच्या वेळेत हास्य-विनोद इत्यादी होऊन बहिर्मुखता वाढणे’ आदी अनेक पैलू आमच्या लक्षात आले. यांसह पाट्याटाकूपणे आणि वरवरची सेवा केल्यामुळे ‘सेवेतील बारकावे न सुचणे, नियोजनाच्या अभावामुळे एखादी बातमी किंवा प्रत वाचण्यासाठी वेळ अल्प ठेवल्यामुळे घाईघाईने सेवा उरकणे, एकमेकांविषयी मनात पूर्वग्रह असल्यामुळे सेवेच्या संदर्भात आवश्यक असलेला संवादही होऊ न शकणे, अंतिम पडताळणी करणार्या साधकाने सेवेत लक्षात आलेल्या त्रुटी प्राथमिक स्तरावर सेवा करणार्या साधकांना न सांगणे, इतरांचे मत न घेता मनाने निर्णय घेणे’, यांसारख्या अनेक चुका आणि त्यांमागील स्वभावदोष अन् अहं यांच्या पैलूंची आम्हाला जाणीव झाली.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘देवाच्या चरणी क्षमायाचना करूनच सेवेला आरंभ करायचा’, असे सांगितले. क्षमायाचनेमुळे आमच्या मनात खंत निर्माण होण्यास साहाय्य झाले, तसेच ‘आपल्याकडून चुका होत असल्यामुळे साक्षात् गुरुमाऊलीला त्या दाखवून देण्यासाठी ऊर्जा व्यय करावी लागते’, याचे गांभीर्य आमच्या लक्षात येऊ लागले.
५. साधकांच्या चुकांचे प्रमाण अल्प होत नसल्याने परात्पर गुरुदेवांनी पुढच्या पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करून चुका सुधारण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रक्रिया करवून घेणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी स्वतः सत्संग घेऊन दिशा दिल्यामुळे साधकांचे प्रयत्न काही प्रमाणात चालू झाले असले, तरी आमच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे चुकांचे प्रमाण अल्प झाले नाही. आम्हाला अधिकाधिक अंतर्मुख करण्यासाठी आणि आमच्या साधनेची हानी टाळण्यासाठी गुरुदेवांनीच पुढाकार घेतला. त्यांनी मे २०२१ पासून २ मासांच्या काळात प्रत्येक काही दिवसांनी आम्हाला अधिकाधिक सखोल जाणीव करून देण्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवले.
५ अ. प्रथम त्यांनी दैनिकातील व्याकरण आणि शुद्धलेखन यांसंदर्भातील चुकांना ‘मोठी चूक’ असे म्हणून जाणीव करून द्यायला आरंभ केला.
५ आ. ‘चूक आणि त्यावरील प्रायश्चित्त’ लिखित स्वरूपात मागवणे आणि त्यामुळे साधकांचे गांभीर्य वाढणे
काही दिवसांनी त्यांनी ‘ज्या साधकाकडून चूक झाली आहे, त्याचे नाव आणि प्रायश्चित्त लिहून मला पहायला पाठवा’, असे सांगितले. ‘साक्षात् गुरुदेवांना प्रायश्चित्त लिहून पाठवायचे’, या विचारानेच साधकांकडून चुकांचे लिखाण करण्याचे आणि प्रायश्चित्त घेण्याचे गांभीर्य वाढले.
५ इ. ‘साधकांनी योग्य प्रायश्चित्त घ्यावे’, यासाठी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !
आम्ही त्यांना प्रतिदिन प्रत्येक चुकीसाठी घेतलेले प्रायश्चित्त लिहून पाठवू लागलो. त्या वेळी साधकांनी लिहिलेले प्रायश्चित्त वाचून त्यांनी त्या संदर्भातही सखोल मार्गदर्शन केले. ‘साधक प्रायश्चित्त पूर्ण करत आहेत ना ?’, हेही ते विचारत असत. ते कधी ‘कुणाला प्रायश्चित्तांमुळे त्रास होत नाही ना ?’, असा मातृवत्सल निरोपही पाठवत असत. एखाद्या प्रायश्चित्तामुळे शारीरिक त्रास होत असल्यास ते पालटून आपल्या प्रकृतीला सोसवेल, असे अन्य प्रायश्चित्त घेण्यास त्यांनी सांगितले.
५ इ १. कोणत्या चुकीसाठी कशा प्रकारचे प्रायश्चित्त घ्यावे ? : साधकांनी स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी प्रायश्चित्त लिहून दिल्यावर ‘कोणत्या चुकांसाठी कशा प्रकारचे प्रायश्चित्त घ्यावे ?’, याविषयीही परात्पर गुरु डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. काही साधकांनी समष्टी सेवेत झालेल्या चुकीसाठी ‘१ घंटा उभे राहून नामजप करणार’, अशा प्रकारचे प्रायश्चित्त घेतल्याचे कळवले. त्यावर त्यांनी ‘हास्यास्पद प्रायश्चित्त ! समष्टी सेवेत झालेल्या चुकीचे पापक्षालन होण्यासाठी सेवेचेच प्रायश्चित्त घ्यावे’, असा निरोप पाठवला.
५ इ २. किती तीव्रतेचे प्रायश्चित्त घ्यावे ? : ‘किती तीव्रतेचे किंवा किती प्रमाणात प्रायश्चित्त घ्यावे ?’, हेही श्री गुरूंनीच सांगितले. एका साधकाने एका चुकीसाठी ‘१५ मिनिटे अधिक सेवा करणार’, असे प्रायश्चित्त घेतले होते. त्याला ‘लहान मुलांप्रमाणे प्रायश्चित्त घेतले !’, असे सांगून अधिक प्रमाणात प्रायश्चित्त घेण्याविषयी जाणीव करून दिली. आरंभीच्या काही दिवसांत ‘शुद्धलेखनाचीच चूक आहे’, असा विचार करून साधक ‘१ दिवस १ घंटा अतिरिक्त सेवा करणार’, असे प्रायश्चित्त घ्यायचे. तेव्हाही परात्पर गुरु डॉक्टरांनी ते तोकडे असल्याची जाणीव करून दिली.
एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो. एका छोट्या स्वरूपाच्या चुकीवर एका वयस्कर साधिकेने ‘८ दिवस १ घंटा अतिरिक्त सेवा करणार’, असे मध्यम तीव्रतेचे प्रायश्चित्त घेतले होते. त्याच चुकीवर अन्य साधकांनी ‘३ दिवस १ घंटा अतिरिक्त सेवा’, ‘५ दिवस १ घंटा अतिरिक्त सेवा’, असे प्रायश्चित्त घेतले होते. त्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘वयस्कर साधिकेचे प्रायश्चित्त इतरांहून अधिक कसे ?’ तेव्हा आम्ही कळवले की, साधक त्यांच्या क्षमतेनुसार प्रायश्चित्त घेत आहेत. त्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘प्रायश्चित्त स्वतःच्या क्षमतेनुसार घ्यायचे असते कि चुकीच्या तीव्रतेनुसार ?’’
‘साधिकेला तीव्र खंत वाटून तिने अधिक प्रायश्चित्त घेतले’, असे जरी असले, तरी ‘प्रायश्चित्त घेतांनाही तारतम्य असावे’, हे आमच्या लक्षात आले.
५ इ ३. ‘साधक प्रायश्चित्त योग्य प्रकारे पूर्ण करतात ना ?’, याचा पाठपुरावा घेणे : एका साधकाने ‘सायंकाळी प्रसाद ग्रहण करणार नाही’, असे प्रायश्चित्त घेतले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले होते, ‘‘प्रसाद म्हणजे सायंकाळचा अल्पाहार’, हे त्या साधकाला ठाऊक आहे ना ? प्रसाद न घेण्याचे प्रायश्चित्त घेऊन कुणी खोलीत जाऊन खाऊ खात नाहीत ना ?’’ अशा प्रकारे ‘प्रायश्चित्त गांभीर्याने पूर्ण केले जाते का ?’, याचाही तेच पाठपुरावा घेत असत.
चुकांमुळे साधना व्यय होते. प्रायश्चित्त घेतल्याने चुकांचे परिमार्जन होते. त्यामुळे साधकांची साधना चुकांच्या परिमार्जनासाठी व्यय न होता आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी सार्थकी लागते. परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ साधकांची व्यय होणारी साधना वाचवण्यासाठी आहे. श्री गुरूंनी साधनेसाठी ‘सनातन प्रभात’सारखे प्रभावी माध्यम देऊनही गतीने साधनावृद्धी न हाेण्यामागे ‘चुका’ हेही एक कारण आहे. त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर स्वतः आम्हाला साधनेचे हे धडे देत आहेत.
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०२१)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/506759.html