प्रत्येक टप्प्यावर परिपूर्ण सेवा केल्यास फलनिष्पत्ती वाढून आध्यात्मिक उन्नती जलद होईल !
वाचा नवीन सदर
‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’चुकांविरहित आणि परिपूर्ण सेवा करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांकडून कसे प्रयत्न करवून घेतले, हे सांगणारी लेखमालिका प्रसिद्ध करत आहोत. या लेखमालिकेअंतर्गत प्रत्यक्ष चुकांची उदाहरणे आणि त्यांवर साधकांनी घेतलेले प्रायश्चित्त पुढील भागात प्रसिद्ध करण्यात येईल. |
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/504942.html
१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या लहान चुकांचा अभ्यास करण्याचे कारण‘सनातन प्रभात’मध्ये ‘बातम्या चुकीच्या छापल्या’, यासारख्या गंभीर चुका होत नाहीत, तर व्याकरण आणि वाक्यरचना यांसारख्या थोड्या चुका आहेत. या टप्प्याच्या चुकांमुळे वाचकांची काही हानी होत नाही; परंतु यामुळे गेल्या १० – १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांची प्रगती लवकर होत नाही. त्यांच्या जीवनातील साधनेचा काळ या चुकांमुळे वाया जाऊ नये, यासाठी मी या चुकांचा अभ्यास करत आहे.’ २. साधकांनो, तुम्हीही या पद्धतीने तुमच्या सेवेच्या स्तरावरील चुकांचा अभ्यास केल्यास तुमची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होईल !दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील साधकांनी त्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्यांची साधना व्हावी, यासाठी त्यांच्या चुका किती गांभीर्याने घेऊन त्यावर प्रयत्न चालू केले आहेत, हे या लेखमालेतून लक्षात येते. अशाच प्रकारे ग्रंथ, कला, संगीत, लेखा, ध्वनी-चित्रीकरण, संशोधन, प्रसार इत्यादी सेवा करणार्या आणि इतर सर्वच साधकांनी स्वतःच्या सेवेच्या संदर्भातील चुका लक्षात घेऊन अंतर्मुख होऊन त्यांवर या पद्धतीने प्रक्रिया केल्यास त्यांच्याही चुका अल्प होतील आणि त्यांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक-संपादक, सनातन प्रभात |
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते दिवसातील ३ – ४ घंटे देऊन बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांना अनेक वेळा एकच बातमी किंवा लेख वाचूनही ज्या चुका लक्षात आलेल्या नसतात, त्या चुका एकाच वाचनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात येतात. ते त्या सर्व चुका ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवतात. साधकांनी निष्काळजीपणे आणि पाट्याटाकूपणे सेवा केल्याने या चुका होतात. चुकांमुळे ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी होते. साधकांनी साधनेच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी ते स्वतःच अथक प्रयत्न करत आहेत. ‘चुकांचे प्रमाण अल्प होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून कशा प्रकारे प्रयत्न करवून घेतले ?’, हे या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘साधनेच्या एका टप्प्यावर अडकलेल्या आमच्यासारख्या जिवांना गती देण्यासाठी परात्पर गुरुमाऊलीने सूक्ष्मातून किती आणि काय काय केले आहे ?’, हे आमच्यासारख्या अतीसामान्य जिवांना कळूच शकत नाही. ‘त्यांनी आमच्या साधनेला गती देण्यासाठी या काळात किती कष्ट घेतले ?’, याचे केवळ अनुभवकथन समष्टीला शिकता येण्यासाठी येथे करत आहोत. ‘हे लिखाण वाचून सर्वच साधकांना परिपूर्ण सेवा करण्याची प्रेरणा मिळावी’, ही परात्पर गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना !
२२ ऑगस्ट २०२१ या दिवशीच्या लेखात आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०.५.२०२१ या दिवसापासून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुका लक्षात आणून देणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संग घेऊन दिशादर्शन केल्यानंतर चुका होण्यामागील स्वभावदोष आणि अहं यांचे अनेक अडथळे साधकांच्या लक्षात येणे याविषयीचा भाग पाहिला. आता पुढील भाग पाहूया.
५. साधकांच्या चुकांचे प्रमाण अल्प होत नसल्याने परात्पर गुरुदेवांनी पुढच्या पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करून चुका सुधारण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रक्रिया करवून घेणे
५ ई. ‘साधकांच्या वर्तनातून चुकांविषयी खंत जाणवते का ?’, असे विचारून अंतर्मुख करणे : आम्ही चुका आणि प्रायश्चित्त लिहिलेला कागद परात्पर गुरु डॉक्टरांच्या सेवेतील साधकाकडे द्यायचो. तो साधक हा कागद परात्पर गुरु डॉक्टरांना द्यायचा. ते त्या साधकाला विचारायचे, ‘‘चुका सांगतांना दैनिकाच्या संदर्भातील सेवा करणारे साधक हसत नाहीत ना ? त्यांच्या मुखावर खंत दिसते का ?’’ अशा प्रकारे ‘आमच्या चुकांची जाणीव आम्हाला किती आतून व्हायला हवी ?’ हे ते लक्षात आणून देत असत.
५ उ. एकदा ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना म्हणाले, ‘‘मी दैनिक वाचून त्यातील चुका लक्षात आणून देण्यासाठी ३ – ४ घंटे देतो. असे असूनही अजून दैनिकातील चुकांचे प्रमाण अल्प का होत नाही ?’’
५ ऊ. चुकांचे प्रमाण अल्प होत नसल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या स्वभावदोष-निर्मूलनासाठीच्या सारण्या पहाण्यासाठी मागवणे : दैनिकाच्या संदर्भातील सेवा करणार्या साधकांच्या चुका अल्प होत नाहीत; म्हणून एक दिवस त्यांनी साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी लिहिलेल्या सारण्या पहायला मागितल्या होत्या. आमच्या चुकीच्या क्रियमाणामुळे आम्ही त्या काळात सेवा अधिक असल्याचे कारण सांगून सारणी लिखाण करण्यात सवलत घेतली होती. त्या काळात साधारण १५ दिवस बहुतांश साधकांनी सारणी लिखाण केलेले नसल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या सारण्या दाखवू शकलो नाही. असे झाले, तरी त्या निरोपाचा परिणाम असा झाला की, आम्हाला आमच्याकडून सतत १५ दिवस होत असलेल्या अयोग्य कृतीची जाणीव झाली. तातडीच्या सेवा चालू असूनही निरोप मिळालेल्या दिवसापासूनच आमचे सारणी लिखाण चालू झाले !
५ ए. चुका होत नसलेल्या साधकांची नावे मागवणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘सेवेत चुका होत नाहीत, अशा साधकांची नावे कळवा.’’ आमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर अत्यंत लाजिरवाणे होते की, सेवा परिपूर्ण करणारा एकही साधक नाही. सर्वांच्या सेवेत वेगवेगळ्या टप्प्यांच्या चुका होत आहेत.
५ ऐ. साधकांच्या चुकांसाठी उत्तरदायी साधकाला प्रायश्चित्त घेण्यास सांगणे : ‘दीर्घकाळ प्रक्रिया चालू असूनही साधकांच्या सेवेतील चुकांचे प्रमाण अल्प होत नाही; म्हणून चुकांना उत्तरदायी असलेल्या साधकाने प्रायश्चित्त घ्यावे’, असेही त्यांनी एकदा कळवले.
६. परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभलेल्या या शुद्धीकरण प्रक्रियेमुळे साधकांकडून काही प्रमाणात चालू झालेले साधनेचे प्रयत्न
परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः आरंभलेल्या या शुद्धीकरण प्रक्रियेचा लाभ, म्हणजे साधकांचे साधनेप्रतीचे गांभीर्य वाढले. सध्या साधकांचे जे प्रयत्न चालू आहेत, ते पुढे थोडक्यात दिले आहेत.
अ. दैनिकाच्या संदर्भातील सेवा समयमर्यादेत करायची असल्यामुळे या पूर्वी आम्हाला वेळेशी गाठ घालून वरवर सेवा करण्याची सवयच लागली होती. बर्याचदा ‘आमच्याकडे साधकसंख्या अल्प आहे’, हेही एक कारण होते. आता ‘आहे त्या साधकसंख्येत आणि उपलब्ध होईल तेवढ्या वेळेत चुकांविरहित सेवा कशी करू शकतो ?’, यासाठी सर्वच साधक प्रयत्न करत आहेत.
आ. ‘मनाने निर्णय घेतल्यामुळे, तसेच विचारून सेवा न केल्यामुळे चुका होत आहेत’, हे लक्षात आल्यामुळे साधकांकडून विचारून करण्याचा प्रयत्न होऊ लागला.
इ. ज्या साधकांना पूर्वग्रहामुळे अन्य साधकांशी संवाद साधणेही कठीण वाटायचे, तेही आता समष्टीत सहभागी होऊ लागले आहेत; कारण ‘बोललो नाही, तर सेवेत चुका रहातात’, हे त्यांनी अनुभवले.
ई. ‘सेवेच्या वेळेत बहिर्मुखतेने बोलणे, चेष्टा-मस्करी करून स्वतःसह इतरांची एकाग्रता भंग करणे’, यांवरही साधकांनी कटाक्षाने नियंत्रण मिळवले.
उ. चुका टाळण्यासाठी सर्वांचीच धडपड दिसून येत असल्याने ‘एकमेकांना साहाय्य करणे, समजून घेणे, प्रसंगी परखडपणे चुका सांगणे’, यांचे प्रमाण वाढले आहे. साधकांमध्ये संघटितपणा वाढू लागला आहे. त्यामुळे सेवेच्या ठिकाणचे वातावरण गंभीर न रहाता खेळीमेळीचे राहू लागले आहे.
थोडक्यात काय, वरवर पहाता शुद्धलेखन आणि व्याकरण या टप्प्याच्या चुका असल्या, तरी साधकांचे अंतर्बाह्य मंथन चालू आहे. ‘दैनिकात काही गंभीर चुका होत नाहीत’, याचा अर्थ आमचे सर्व चांगले चालू आहे’, या भ्रमात आम्ही अनेक वर्षे वाया घालवली. साक्षात् गुरुदेवांनीच आम्हाला त्यातून बाहेर काढले आहे. ‘आम्ही साधनेत न्यून पडत आहोत’, ही जाणीव आता रुजत आहे. या टप्प्यातून पुढे जाऊन श्री गुरूंना अपेक्षित अशा गतीने आम्हाला साधना करायची आहे.
७. एकाच वेळी अनेक सेवा चालू असूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सर्व सेवा सुरळीत चालू राहिल्याने बुद्धीच्या मर्यादा साधकांच्या लक्षात येणे
मर्यादित साधकसंख्येत दैनिकाच्या व्यतिरिक्त अन्य सेवांची तातडी चालू असतांना ‘अनेक बारकाव्यांनिशी नियमित सेवा करणे, त्या अनुषंगाने समन्वय करणे, नियमित झालेल्या चुकांवर पुढील प्रक्रिया करणे, आमच्या शिथिलतेमुळे मधल्या काळात विस्कळीत झालेली अनेक सेवांची घडी बसवण्याच्या संदर्भातील प्रक्रिया करणे’, हे सध्याच्या स्थितीत अशक्यच आहे, तरीही गुरुदेवांनी चालू केलेल्या प्रक्रियेचा वेग अल्प झालेला नाही. सर्व टप्प्यांवर सेवा सुरळीत चालू आहेत. हे पाहून लक्षात आले की, बुद्धीने विचार करून जे अशक्य वाटते, ते श्री गुरु केवळ संकल्पाने सहजसाध्य करून देतात. ‘आपण देवाला शरण जाऊन परिस्थिती स्वीकारली की, देवच या सगळ्यांतून अलगद पुढे घेऊन जातो’, हे आम्हाला अनुभवता आले. वास्तविक आमची शरणागतीही अल्प आहे, तरीही परात्पर गुरु डॉक्टर आमच्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत.
८. समष्टीपर्यंत लवकरात लवकर मार्गदर्शन पोचण्यासाठी ग्रंथ आणि लेखमालिका चालू करण्यास सांगून त्याविषयी पाठपुरावा घेणे
‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या माध्यमातून अनेक वर्षे एकच सेवा करूनही साधनेत प्रगती न होण्यामागील कारणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात आली. ‘ही प्रक्रिया केवळ दैनिकातील साधकांच्या साधनेला गती देण्यापुरती सीमित नाही, तर सर्वत्रच्या साधकांना याचा लाभ व्हावा’, अशी गुरुमाऊलीची तळमळ आहे. ही सूत्रे समष्टीपर्यंत लवकरात लवकर पोचवण्यासाठी त्यांनी या चुकांविषयीचा ग्रंथ करण्यास वेळोवेळी सांगितले. ‘ग्रंथ करण्यासह या चुकांचे दैनिकात एक सदर किंवा लेखमाला चालू करूया’, असेही त्यांनी सांगितले. आम्ही नियमित चुका आणि प्रायश्चित्त लिहिलेला जो कागद पाठवायचो, ‘त्या कागदावरील मजकूरही थेट ग्रंथात घेता येईल, इतका शुद्ध आणि परिपूर्ण असावा’, याकडे ते कटाक्षाने लक्ष देत. त्यांच्या प्रेरणेने हे सदर चालू करत आहोत. या सदरात प्रसिद्ध होणारे लिखाण वाचून ‘सेवा करतांना तिच्याशी एकरूप न झाल्यामुळे चुका कशा होतात आणि त्यावर मात कशा प्रकारे करायची ?’, हे लक्षात येईल. ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा विहंगम साधनामार्ग आहे. ‘आंतरिक प्रेरणेने उत्स्फूर्तपणे साधना केली की, भगवंताला अनुभवता येतेच’, हे अनेक साधकांनी अनुभवले आहे. असे असूनही ‘अनेक वर्षे साधना करत असूनही साधक आंतरिक साधनेच्या आनंदापासून वंचित का रहातात ?’, हे ही लेखमाला वाचून लक्षात येईल.
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, सनातन प्रभात नियतकालिके (१३.८.२०२१)
क्षमायाचना आणि प्रार्थना‘परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सच्चिदानंद परब्रह्म’ आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. त्यांचे अवतारी कार्य चालू आहे. असे असूनही आम्हा साधकांना पुढच्या टप्प्याला नेण्यासाठी ते पुन्हा गुरुरूपात येऊन कार्य करत आहेत. ‘हे गुरुमाऊली, ‘आपले दीर्घकाळ मार्गदर्शन लाभले असूनही आम्ही अद्याप आपल्याला अपेक्षित अशी साधना करू शकलो नाही’, यासाठी आम्ही आपल्या चरणी क्षमायाचना करतो. आमच्यासाठी आपण घेत असलेल्या कष्टांना सीमाच नाही गुरुदेव ! ‘आपल्या चरणी अखंड कृतज्ञता अनुभवण्यासाठी आम्हाला पात्र करावे’, एवढीच प्रार्थना आहे.’ – श्री. भूषण केरकर |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510351.html