पणजी, १९ ऑगस्ट (वार्ता.) – यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींचा वापर करणार्यांना कारागृहातही टाकले जाण्याची शक्यता आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल १८ ऑगस्ट या दिवशी पत्रकारांना म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री किंवा वापर करण्यावर राज्यात बंदी आहे. त्यामुळे अशा गणेशमूर्तींची विक्री करणारे किंवा वापर करणारे यांना अधिक पैशांचा दंड ठोठावला जाणार आहे, तसेच वेळप्रसंगी संबंधितांना कारागृहातही टाकले जाऊ शकते. ही कारवाई मुख्यत्वे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार आहे आणि त्यांना यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस आदींचे सहकार्य लाभणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरण प्रदूषण होते.’’
गोवा शासन गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी घालून पर्यावरणपूरक शाडूमातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती अल्प दरात उपलब्ध होत असल्याने आणि मूर्ती दिसण्यास सूबक असल्याने लोकांचा कल प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या वापराकडे अधिक असल्याचे दिसून येतो.