नागपूर आणि वर्धा येथील १० नामवंत खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मानसिक छळ !

  • ‘विशेष अन्वेषण समिती’च्या अहवालात धक्कादायक माहिती !

  • प्राध्यापक आणि शिक्षक यांना ३५ मासांपासून वेतन नाही !

  • खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन न देता त्यांचा मानसिक छळ करणे, हे महाविद्यालय प्रशासनाला लज्जास्पद आहे. या प्रकरणात जे पदाधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर शिक्षणमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक

  • प्राध्यापकांचा मानसिक छळ करणारी महाविद्यालये विद्यार्थ्यांना काय घडवणार ?- संपादक

नागपूर – ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठा’शी संलग्नित नागपूर आणि वर्धा येथील १० नामवंत खासगी महाविद्यालयांकडून प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांचा मानसिक छळ केला जात आहे. काही महाविद्यालयांनी ‘प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांना तब्बल ३५ मासांपासून वेतन दिलेले नाही’, अशी धक्कादायक माहिती विद्यापिठाच्या ‘विशेष अन्वेषण समिती’ने सादर केलेल्या अहवालातून उघड झाली आहे.

कोरोनाच्या काळामध्ये महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. याचा लाभ घेत अनेक महाविद्यालयांनी ‘प्राध्यापकांना वेतन न देणे, त्यांचा मानसिक छळ करणे, नियमानुसार कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी (प्रॉविडेंट फंड) सुविधेचा लाभ न देणे’, असे प्रकार चालू केले आहेत. याविषयी १० महाविद्यालयांमधील कर्मचार्‍यांनी विद्यापिठाकडे तक्रार केली होती.

याची नोंद घेत विद्यापिठाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.आर्.जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली ‘विशेष अन्वेषण समिती’ स्थापन केली. या समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. उर्मिला डबीर, प्रा. नितीन कोंगरे, विष्णू चांगदे आणि उपकुलसचिव रमण मदने यांचा समावेश होता. या समितीने नागपूर आणि वर्धा येथील १० महाविद्यालयांचे अन्वेषण करून तसा अहवाल विद्यापिठाकडे सादर केला. या महाविद्यालयांपैकी काहींनी ३५ मासांपासून, तर काहींनी ६ मासांपासून कर्मचार्‍यांना वेतन दिलेले नाही. काहींनी तुटपुंजी रक्कम देऊन प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

अहवालावर अद्याप कारवाई नाही !

अन्वेषण समितीने विद्यापिठाकडे अहवाल सादर केला असला, तरी त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रारदार कर्मचार्‍यांनी विद्यापिठाच्या महाविद्यालय विभागाकडे या अहवालासंदर्भात मागणी केली असता तो गोपनीय असल्याचे कारण देत अहवाल देण्यात आलेला नाही. त्यामुळे समितीच्या शिफारशी काय आहेत ? यावर काय कारवाई होणार ? याची तक्रारदारांना प्रतीक्षा आहे.

वेतन न देणारी खासगी महाविद्यालये

गुरुनानक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर; बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम, जिल्हा वर्धा; प्रियदर्शिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर; प्रियदर्शिनी भगवती अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर; प्रियदर्शिनी इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर; प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर; अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, नागपूर; एस्.बी. जैन व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, नागपूर; जेडी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय; कवी कुलगुरू विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर.