क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताहून पुष्कळ लहान असलेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर १ वर्षांनंतर स्वत:ची भूमी मिळवलेल्या इस्रायलने अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक उत्कर्ष साधला आहे. त्या तुलनेत भारताला साधनसंपत्ती, तरुण जनता मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊनही भारताला म्हणावी तशी प्रगती साध्य करता आलेली नाही. काही सरकारी क्षेत्रांत तर अधोगतीही झालेली आहे. इस्रायलने मिळवलेल्या समृद्धीमागील काही कारणे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
स्व-पंथियांच्या रक्षणाचा घालून दिलेला धडा !
‘दोन सहस्र वर्षांपूर्वी रोमन कॅथोलिकांच्या अत्याचारांमुळे मातृभूमी जेरूसलेममधून विस्थापित होऊन जगभर विखुरल्या गेलेल्या ज्यू पंथियांवर जगभर शतकानुशतके अत्याचार करण्यात आले. हिटरलने तर ज्यूंचा वंशविच्छेदच आरंभला. तरीही राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाने जगभरातील ज्यू संघटित झाले आणि त्यांनी ज्यूंसाठी इस्रायलची निर्मिती केली. या स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांनी जगभरातील ज्यूंना इस्रायलमध्ये आणून त्यांचे पुनर्वसन केले. तसेच त्यांनी ‘या देशातील सर्व कायदे, नियम, धोरणे ज्यू पंथाला पोषक होतील’, अशी केली. आज याच इस्रायलचे शासनकर्ते इस्रायलमधून सर्व जगातील ज्यू पंथियांच्या सुरक्षेची काळजी घेतात. दोन ज्यू सैनिक मारले; म्हणून इस्रायलने लेबेनॉनवर अण्वस्त्रे डागली. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणात ज्यूंच्या केंद्रावर आक्रमण झाल्यावर इस्रायलने पाकवर हवाई आक्रमक करण्याची सिद्धता केली होती. जर्मनीमध्ये ज्यूंचा नरसंहार करणार्या आणि नंतर लपून बसणार्या नाझी अधिकार्यांना पुढे पन्नास वर्षांत शोधून काढून त्यांना कंठस्नान घालण्याचे काम इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने केले. थोडक्यात इस्रायलने ‘स्वपंथियांचे रक्षण कसे करायचे ?’, याचा आदर्शच भारतासमोर ठेवला आहे.’
– कै. अरुण रामतीर्थकर, ज्येष्ठ पत्रकार
हिब्रू भाषा जनतेला शिकवून तिला राजभाषेचा दर्जा देणारा इस्रायल !
वर्ष १९४८ मध्ये इस्रायली लोकांना त्यांची पवित्र भूमी मिळाल्यावर त्यांनी जगभरातील ज्यू लोकांना या भूमीत परतण्यास सांगून त्यांचे स्वागत केले; परंतु इस्रायलमध्ये परतल्यावर ते वेगवेगळ्या भाषा बोलत असल्याने समस्या निर्माण झाली. इस्रायलमधील शासनाने तेथील विद्वानांना मृतावस्थेत असलेल्या हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन करण्यास सांगितले. हिब्रू जाणणारे केवळ चार लोक असतांना आज ती इस्रायलची राजभाषा झाली आहे.
भारतात १६ भाषा असतांना आणि संस्कृत जाणणारे सहस्रो लोक असतांना ती मृत भाषा ठरवून राष्ट्रभाषेच्या प्रश्नाचा गुंता करण्यात आला. आपल्याला आजही भेडसावणार्या गोष्टी इस्रायलने चुटकीसरशी सोडवल्या आहेत. यासाठीच इस्रायलची मैत्री आवश्यक आहे.
भारतीय संस्कृतीसाठी संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक !
‘इस्रायलच्या भाषा विषयातील वाटचालीतून स्फूर्ती घेऊन भारताने संस्कृतचे पुनरुज्जीवन करायला हवे. सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा सुलभ आणि आधुनिक दृष्टीने योग्य करण्यासाठी शासनाने भाषातज्ञांना निमंत्रित केले पाहिजे. त्यामुळे भारतीय संस्कृतीला उभारी येऊन ती सशक्त होईल, याची मला निश्चिती आहे.’ – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार
इस्रायलकडून भारताने स्वाभिमान शिकणे आवश्यक !
इस्रायलच्या १५८ पट अधिक क्षेत्रफळ असणार्या भारताने त्याच्यापासून थोडातरी स्वाभिमानाचा धडा घ्यावा. सतत शांती, संयम आणि अहिंसेचा नारा आपल्याला लवकरच पुनश्च पारतंत्र्यात नेल्यावाचून रहाणार नाही. आत्यंतिक अहिंसेच्या आणि मानवतेच्या वेडापायी आपण दाऊद, मेमन इत्यादींना मोकळे सोडू, तर ते आपलेच प्राण घेतल्याविना रहाणार नाहीत. आपल्या सर्व देवतांनी अधर्माविरुद्ध, दुर्जनांविरुद्ध शस्त्रे उचलली आहेत. तेव्हा आपले देव, आपला धर्म यांच्या रक्षणार्थ आपणच आता सज्ज झालेच पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून इस्रायलप्रमाणे आपणही जगाला आपले सामर्थ्य दाखवून देणे, ही काळाची आवश्यकता आहे.
इस्रायलप्रमाणे भारतात तरुणांना सक्तीचे सैन्य प्रशिक्षण हवे !
‘सर्व जगात आज इस्रायलसारखे सक्तीचे सैन्य शिक्षण कोठे नाही. कोणत्याही वेळी इस्रायलचे सर्व नागरिक हे देशाच्या संरक्षणासाठी सिद्ध असतात. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांतील युद्धाच्या वेळी इस्रायलचे तरुण अधिक सतर्क असतात. कोणत्याही देशामध्ये युद्ध, पूर, भूकंप, नैसर्गिक आपत्तीमध्ये संकटकाळी साहाय्यासाठी जनता नित्य सिद्ध असणे आवश्यकच असते. यासाठीच इस्रायलमध्ये तरुणांना अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे शिक्षण सैन्य शिक्षणातून दिले जाते. तरुणांची सर्वप्रकारची क्षमता या शिक्षणातून वाढवली जाते. शेती, उद्योग आणि देश यांसाठी कोणतेही काम असो, हे तरुण कार्यक्षमतेने करतात. न्यूनतम पाण्यामध्ये उत्तम शेती, वृक्ष लावणे, दंडकाचे पालन करणे या सर्व गोष्टी हे सैन्याचे शिक्षण घेतलेले तरुण चांगल्या पद्धतीने पार पाडतात. इस्रायल आज सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. तेथील राजकारण, सरकारी व्यवस्था, व्यापार हा प्रामाणिकपणेच चालू असतो; कारण सामान्य माणूस प्रामाणिक आहे. भारतात सक्तीचे सैन्य प्रशिक्षण दिल्यामुळे तरुण-तरुणींची प्रकृती चांगली राहील. या व्यतिरिक्त दिवसातील अर्धा वेळ वृक्ष लागवड, स्वच्छता, शिक्षण इत्यादी विषयक योजना कार्यान्वित होऊ शकतील. एक शिस्त जीवनात येईल. सैन्य शिक्षण, हे भारतात प्रत्येक तरुण-तरुणीला हवेच आहे.’ – कॅप्टन जाधव
पाण्याची जटील समस्या सोडवणे
‘वालुकामय भूमी आणि समुद्राचे खारे पाणी, असे राष्ट्र मिळाले असतांना हताश न होता समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान निर्माण करून इस्रायलने वालुकामय प्रदेशात प्रगत शेती केली आहे. प्रतिवर्षी भारतात पुष्कळ पाऊस पडत असूनही पाण्याचा दुष्काळ होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही पंचाईत असल्याने अनेक जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले जातात. इस्रायल हा देश पुणे जिल्ह्याच्या दीडपट आहे; पण पाणी नियोजनात जगात अग्रेसर आहे. तिथे सरासरी ४३५ मि.मी. पाऊस पडतो. पुणे जिल्ह्यात ७०० मि.मी. पाऊस पडतो. देशाची आवश्यकता भागवून आज तो देश शेतीमालाची निर्यात करत आहे.
(पुनर्प्रकाशित लिखाण : दैनिक सनातन प्रभात)
हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी जिद्द हवी !इस्रायलच्या निर्मितीच्या आधी दोन सहस्र वर्षे जगभर विखुरलेल्या ज्यूंमध्ये एक प्रथा निष्ठेने पाळली जात असे. मृत्यूसमयी ज्यू पिता आपल्या ज्येष्ठ मुलाला जवळ बोलावत असे आणि सांगत असे की, आपल्या जीवनात ज्यूंसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू शकलो नाही, आता हे दायित्व मुलाने पित्याची अन् पूर्वजांची अंतिम इच्छा म्हणून डोक्यावर घ्यावी. अशा तर्हेने स्वराष्ट्र निर्मितीची जिद्द ज्यूंनी दोन सहस्र वर्षे स्वतःची भूमी नसतांना स्वत:च्या समाजात तेवत ठेवली. हिंदूंनी आता अशाच पद्धतीने स्वधर्माची शिकवण द्यायला हवी. |