प्रेमभाव आणि साधेपणा या गुणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे इतरांमध्ये आपुलकी निर्माण करणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘१०.२.२०२१ या दिवशी चेन्नई येथील एका प्रसिद्ध रुग्णालयात सनातनच्या ८४ व्या संत पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या आई श्रीमती केशरीदेवी भुकानिया यांच्या गुडघ्याचे शस्त्रकर्म झाले. त्यांचे वय ८० वर्षे आहे. मी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात त्यांचा मुलगा, सून, नातू इत्यादी सर्व जण आले होते. ते सर्व जण भाविक आहेत. या सर्वांना मी प्रथमच भेटत होते. त्यावेळी जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून पू. (सौ.) खेमका यांच्या भावाचा गुरुदेवांप्रतीचा भाव दाटून येणे आणि त्या वेळी ‘गुरुदेवांनी निरपेक्ष प्रेमानेच साधक अन् त्यांचे कुटुंबीय यांना जोडून ठेवले आहे’, असे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवणे

मला पाहून पू. (सौ.) सुनीता खेमका यांचे भाऊ श्री. महेशकुमार भुकानिया यांच्या डोळ्यांत तर पाणीच आले. त्यांना गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. तेव्हा मला वाटले, ‘देवा, प्रेमभावच महत्त्वाचा आहे ना ! प्रेमभावामुळे व्यक्ती लवकर जवळ येतात. त्यांना सनातनचे कार्य, संत आणि देव यांविषयी प्रेम वाटू लागते. गुरुदेवांनीही असेच केले आहे. त्यांनी संस्थेच्या कार्याच्या प्रारंभीच्या वर्षांत पुष्कळ भ्रमण केले आहे. त्यांनी साधकांना अत्यंत प्रेम दिले आहे. त्यांनी साधकांच्या कुटुंबियांनाही त्यांच्यातील निस्सीम प्रेमाने धरून ठेवले आहे. खरेच इतक्या वर्षांनंतर अजूनही ही कुटुंबे गुरुदेवांची आठवण काढतात. देवा, तुझे प्रेम किती निरपेक्ष असते ! तू आम्हाला दुसर्‍यांना असेच प्रेम द्यायला शिकव. गुरुदेवांनी जसे सर्वांना जवळ केले, तशीच प्रीती तू आमच्यात निर्माण कर.’

२. ‘अन्य संप्रदायांतील संतांचा बडेजाव असतो; परंतु ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आमच्या कुटुंबातीलच आहेत’, असे वाटले’, असे पू. (सौ.) खेमका यांच्या भावाने सांगणे

मी तेथे येऊन गेल्यानंतर पू. सुनीता यांच्या भावाने पू. सुनीता यांना भ्रमणभाष करून कळवले, ‘‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ येऊन गेल्यामुळे आम्हाला पुष्कळ चांगले वाटले. ‘त्या आम्हाला एवढा वेळ देतील’, असे वाटले नव्हते. अन्य संप्रदायांतील संतांचा किती बडेजाव असतो; परंतु येथे आम्हाला तसे काहीच वाटले नाही. ‘त्या आमच्या कुटुंबातीलच आहेत’, असे आम्हाला वाटले.’’

३. या प्रसंगातून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुदेवांनी साधकांवर केलेल्या नम्रता आणि साधेपणा या गुणांच्या संस्कारांचे महत्त्व लक्षात येणे अन् त्यामुळे सनातनविषयी समाजाच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाल्याचे त्यांना जाणवणे

तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘खरेच, गुरुदेवांनी आम्हा साधकांवर नम्रता आणि साधेपणा यांचे संस्कार केले आहेत. ते किती महत्त्वाचे आहेत ! समाजातील लोक आपल्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करत असतात. त्यांना आपण त्यांच्यातीलच एक वाटलो, तरच ते आपल्या जवळ येतील आणि काहीतरी शिकतील. अन्य संप्रदायांत असे होत नाही. सामान्यजनांच्या मनात संप्रदायांतील संतांविषयी ‘अरे, आम्हा सामान्यांना ते काय भेटणार ? लौकिक अर्थाने आमच्याकडे तेवढा पैसा नाही’, अशी भावना निर्माण होते.

गुरुदेवांनी आम्हाला घडवल्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. सनातन संस्थेने समाजाच्या मनात एक चांगले स्थान निर्माण केले आहे. हे लोक सनातनचे कार्य आणि साधक यांचा आदर करत आहेत. हे सर्व गुरुदेवांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१२.२.२०२१)


बराकर (बंगाल) येथील श्रीमती केशरीदेवी भुकानिया (वय ८० वर्षे) (सनातनच्या ८४ व्या संत पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या मातोश्री) यांच्याविषयी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

मी श्रीमती केशरीदेवी भुकानिया यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्या वेळी मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीमती केशरीदेवी भुकानिया (डावीकडे) यांच्या समवेत श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. शस्त्रकर्मानंतर पुष्कळ वेदना होत असूनही आनंदी असणे

श्रीमती केशरीदेवी भुकानिया यांचा गुडघा पालटून त्या ठिकाणी नवीन कृत्रिम गुडघा बसवला आहे. त्यांना शस्त्रकर्मानंतर पुष्कळ वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना आदल्या रात्री झोप लागली नव्हती, तरीही त्यांच्या तोंडवळ्यावरून त्या आनंदी वाटत होत्या.

२. त्यांचा गुरुदेवांप्रती भाव आहे.

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१२.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक