५८ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डिचोली (गोवा) येथील कु. भक्ती गांवकर (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. भक्ती गांवकर एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आषाढ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२३.७.२०२१) या दिवशी कु. भक्ती गांवकर हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेली अनुभूती आणि तिच्या जन्मानंतर तिची आई अन् आत्या यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. भक्ती गांवकर

१. गर्भारपणात आईला आलेली अनुभूती

आधुनिक वैद्यांनी ‘गर्भातील बाळ जिवंत नाही’, असे सांगणे आणि प्रार्थना करून स्त्रीरोग तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा ‘सोनोग्राफी’ केल्यावर बाळ सुखरूप असल्याचे समजणे : ‘एकदा माझ्या पोटात दुखून मला जुलाब चालू झाले. आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) गेल्यावर मला दिवस गेल्याचे समजले. त्यांनी आम्हाला ‘गर्भातील बाळ जिवंत नाही’, असे सांगितले. त्या दिवशी देवानेच मला स्त्रीरोग तज्ञांकडे जायला सुचवले. स्त्रीरोग तज्ञांनी माझी पुन्हा एकदा ‘सोनोग्राफी’ केली. तेव्हा मी भगवंताला कळवळून हाक मारली, ‘काहीतरी कर; पण माझ्या बाळाला वाचव.’ त्यानंतर स्त्रीरोग तज्ञांनी सांगितले, ‘‘बाळ सुखरूप आहे. घाबरण्याची काही आवश्यकता नाही.’’ ८ दिवसांनंतर बाळाची वाढ उत्तम होत असल्याचे समजले. त्यामुळे मी आणि माझ्या यजमानांनी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. मला गर्भारपणात कोणताही त्रास झाला नाही. मी नेहमी आनंदी असायचे.’ – सौ. स्वाती गांवकर (आई), मये, डिचोली, गोवा. (८.७.२०२१)

२. जन्म ते २ वर्षे

अ. ‘भक्ती पुष्कळ उत्साही आणि हुशार होती. ती तिसर्‍या मासाच्या आधीच उपडे वळणे, हसणे, हुंकार देणे इत्यादी कृती करत असे. ती तिच्या वयाच्या मानाने या कृती लवकर करत होती. ती १० मासांची असतांनाच चालायला लागली. (‘सर्वसाधारण मुले १ वर्षाची असतांना चालायला लागतात.’ – संकलक)

आ. पुढे काही दिवसांनी आम्हाला काही त्रास झाल्यावर भक्ती देवघरातील कापूर आणि विभूती आणायची अन् आम्हाला लावायची.

इ. प्रतिदिन सायंकाळी ती आजीच्या मांडीवर बसून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायची आणि आजीच्या समवेत तिला जसे जमते तसे रामरक्षा स्तोत्रही म्हणायची.

३. वय ३ ते ५ वर्षे

सौ. स्वाती गांवकर

अनुभूती – भक्ती हिने श्री गणपतीला प्रार्थना केल्यावर गणपतीच्या मस्तकावर वाहिलेले जास्वंदाचे फूल खाली पडणे : एकदा श्री गणेशचतुर्थीच्या रात्री गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवून आम्ही सगळे जेवायला बसलो. एवढ्यात भक्तीच्या लक्षात आले, ‘गणपतीला दुपारी जसा पूर्ण पान भरून नैवेद्य दाखवला, तसा आता दाखवला नाही.’ त्या वेळी गणपतीला उपाशी ठेवले; म्हणून तिला वाईट वाटले आणि ती म्हणाली, ‘‘मीही जेवणार नाही.’’ तेव्हा तिच्या आजीने तिला सांगितले, ‘‘गणपति केवळ दुपारी जेवतो आणि रात्रभर केवळ माटोळीची फळे (कोकणात श्री गणेशचतुर्थीला गणपतीच्या मूर्तीच्या वर लाकडी चौकटीला फळे बांधलेली असतात. त्यांना ‘माटोळीची फळे’ म्हणतात.) खातो. तू आता गणपतीला माटोळीची फळे तोडून खायला सांग.’’ तेव्हा भक्ती लगेच रडायची थांबली आणि तिने गणपतीला सांगितले, ‘देवबाप्पा, तू माटोळीची सगळी फळे खा.’ त्याच क्षणी गणपतीच्या मस्तकावर वाहिलेले जास्वंदाचे फूल खाली पडले. त्या वेळी भक्तीला पुष्कळ आनंद झाला.’  – सौ. स्वाती गांवकर (आई), मये, डिचोली, गोवा आणि सौ. राधा गावडे (आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. वय ६ ते ८ वर्षे

४ अ. लहान बहिणीला सांभाळण्यास साहाय्य करणे : ‘भक्ती ‘तिच्या लहान बहिणीचे लंगोट पालटणे, अंथरूण घालणे, सुकलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, बहीण रडली, तर तिला गाणी म्हणून किंवा नाचून दाखवणे’ इत्यादी करायची. मी बाळाला भक्तीजवळ ठेवून सर्व कामे करायचे.’ – सौ. स्वाती गांवकर

४ आ. स्पष्टवक्तेपणा : ‘आमच्या परिचयाचे एक गृहस्थ सिगारेट आणि तंबाखू यांचे सेवन करत असत. भक्ती तिच्या आजीच्या समवेत त्या गृहस्थांच्या घरी जायची. एकदा भक्तीने त्यांना सांगितले, ‘‘सिगारेट ओढू नका आणि तंबाखू खाऊ नका. ते शरिराला अत्यंत हानीकारक असते.’’

५. वय ९ ते १३ वर्षे

सौ. राधा गावडे

कुशाग्र बुद्धीमत्ता : रामरक्षा स्तोत्रपठणात तिला पहिले पारितोषिक मिळाले होते. भक्ती चौथीत असतांना तिच्या शाळेमध्ये ‘सुलभ रामायण’ या पुस्तकावर आधारित लेखी परीक्षा होती. तिच्यात तिला १०० पैकी ९७ गुण मिळाले होते.

६. वय १४ ते १५ वर्षे

६ अ. ती शाळेत सर्वांना प्रिय आहे. तिला पुष्कळ मैत्रिणी आहेत. शेजार्‍यांनाही ती पुष्कळ आवडते.

६ आ. काटकसर : तिला अनावश्यक पैसे व्यय करायला आवडत नाही. तिचा ‘ऑनलाईन’ वर्ग होता. तेव्हाही ती नवीन भ्रमणभाष घ्यायला ‘नको’ म्हणाली होती.

६ इ. इतरांचा विचार करणे : ती पुष्कळ समजूतदार आहे. दुसर्‍यांची व्यथा तिला लगेच समजते. ती सर्वांची पुष्कळ काळजी घेते. एकदा तिच्या आजीचे बोट दारामध्ये चेंगरले आणि त्यातून पुष्कळ रक्त आले. तेव्हा तिने कितीतरी दिवस आजीच्या बोटाला मलमपट्टी केली.

६ ई. प्राणीमात्रांवर प्रेम करणे : मुक्या प्राण्यांना काही इजा झाली, तर ती लगेच त्यांच्यावर औषधोपचार करते. मांजर आणि गाय तिला पुष्कळ प्रिय आहेत. भक्ती लहान असतांना गायी पावसात भिजल्यावर मोठ्याने रडायची आणि ‘त्यांना आत घ्या’, असे सांगायची. ती त्यांना काहीतरी खायला द्यायची.

६ उ. कलेची आवड : भक्तीला लहानपणापासून ‘चित्रकला, तसेच मेंदी आणि रांगोळी काढणे’ यांची आवड आहे. ती शाळेत विविध स्पर्धांत उत्स्फूर्तपणे भाग घेते.

६ ऊ. नेतृत्व : तिच्या शाळेतील शिक्षक तिचे पुष्कळ कौतुक करतात. एकदा मला तिच्या शिक्षिका म्हणाल्या, ‘‘तुमच्या मुलीमध्ये नेतृत्वगुण आहे.’’

६ ए. सत्सेवेची आवड : भक्ती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करते. ती माझ्या समवेत गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला येत असे. ती आनंदाने सेवा करत असे.

६ ऐ. देवाची ओढ : दळणवळण बंदीच्या काळात शाळा नसतांना ती प्रतिदिन सकाळी उठून देवपूजा करायची. ती प्रतिदिन गणपति स्तोत्र, रामरक्षा, मारुति स्तोत्र, विष्णुषट्पदी स्तोत्र आणि इतर श्लोक म्हणते अन् नामजपही करते.’ – सौ. स्वाती गांवकर आणि सौ. राधा गावडे

७. कु. भक्तीमधील स्वभावदोष

‘चालढकलपणा, आळस, मोठ्याने बोलणे, अनावश्यक बोलणे, हट्टीपणा आणि उलट उत्तरे देणे.’ – सौ. स्वाती गांवकर (८.७.२०२१)

  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक