तात्पुरत्या डागडुजीस त्वरित प्रारंभ न झाल्यास पुन्हा आंदोलनाची चेतावणी
यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? असे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ?
सावंतवाडी – तालुक्यातील बांदा-दोडामार्ग या राज्यमार्गाच्या झालेल्या दुरवस्थेच्या विरोधात भाजपच्या वतीने ९ ऑगस्टला बांदा येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. अखेर ३ घंट्यांनंतर प्रशासनाने याची नोंद घेतली. ‘या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया चालू असून डिसेंबर मासात रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण यांचे काम चालू करण्यात येईल. तोपर्यंत तात्पुरती डागडुजी (पावसाळी डांबरीकरण) करण्यात येईल’, असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्या छाया नाईक यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. ‘रस्त्याच्या पावसाळी डांबरीकरणाच्या कामास तात्काळ प्रारंभ न केल्यास प्रखर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी या वेळी दिली.
बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरवस्थेविषयी यापूर्वी अनेक आंदोलन करण्यात आली; मात्र प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबले. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने हे आंदोलन केले. या वेळी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील भाजपचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील रस्त्याची कामे निकृष्ट करणार्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी १५ ऑगस्टला उपोषणाची चेतावणी
दोडामार्ग – बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरवस्थेचा विषय चर्चेत असतांनाच आता दोडामार्ग तालुक्यातील सर्वच रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी चर्चा होऊ लागली आहे. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत तालुक्यात अनेक रस्त्यांचे काम पूर्ण झाले, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत; परंतु या रस्त्यांची स्थिती पहाता ही कामे निकृष्ट झाल्याचे दिसून येते. या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र रस्त्याच्या दुरवस्थेला ठेकेदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी उत्तरदायी आहेत. याविषयी वारंवार निवेदने देऊन आणि तोंडी सांगूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील निकृष्ट कामांसह संबंधित अधिकार्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार असल्याची चेतावणी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उपाख्य बाळा नाईक यांनी दिली आहे.