हवामान पालटामुळे ब्रिटन बर्फाखाली दबण्याची भीती ! – प्रमुख शास्त्रज्ञांचा दावा

विज्ञानाने केलेल्या तथाकथित प्रगतीचा परिणाम !

शास्त्रज्ञ डॉ. निकलस बॉयर्स

मुंबई – जगातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. निकलस बॉयर्स यांनी दावा केला आहे की, सध्या हवामानामध्ये वेगाने पालट होत आहे. त्यामुळे येत्या काळात ब्रिटन बर्फाखाली दबण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. निकलस बॉयर्स यांनी म्हटले की,

१. गेल्या १ सहस्र वर्षांत प्रथमच आखाती देशांतून युरोपला येणारे गरम वारे सर्वांत दुर्बल बनले आहेत. या वार्‍यांमुळे युरोपचे वातावरण उबदार रहाते; मात्र आता या गरम वार्‍यांचा  प्रवाह फारच न्यून झाला आहे. परिणामी ब्रिटनमधील तापमान न्यून होत चालले आहे. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिली, तर लवकरच ब्रिटन बर्फाखाली दबण्याची  शक्यता आहे. त्यामुळे येथील जीवसृष्टी संपू शकते.

२. गेल्या वर्षीच नॉर्थअंबरलँड विद्यापिठाने याविषयी चेतावणी दिली होती. त्यानुसार आगामी ३० वर्षे पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतील. म्हणजेच येणारा काळ पृथ्वीसाठी ‘मिनी आईस एज’ (छोटे हिम युग) असेल. या काळात तापमान अत्यंत न्यून होईल. जगाला उणे ५० डिग्री सेल्सियस एवढ्या अल्प तापमानाचा सामना करावा लागू शकतो.

३. सूर्याची उष्णताही अल्प होत आहे. येत्या काळात सूर्याची उष्णता आणखी अल्प झाल्याने ब्रिटनमध्ये सूर्यप्रकाश पोचणार नाही. परिणामी ब्रिटन थंडीमुळे गोठून जाईल. या दाव्यानंतर लोकांनी घाबरून जाऊ नये, असेही बॉयर्स यांनी सांगितले.

अनेकांनी ‘मिनी आइस एज’ ही अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा पालट झाला, तर तो केवळ ब्रिटनमध्येच होईल, असे नाही. केवळ एकच देश बर्फाखाली दबला जाईल, असे होणार नाही.