कोलवाळ येथील दुकानमालकाचे अपहरण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांना घेतले कह्यात !

पडीक इमारतीत लपवून ठेवलेल्या दुकानमालकाची केली सुटका !

पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – कोलवाळ येथील ‘प्लायवूड’ विक्रेते नवीन पटेल यांचे अपहरण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी घटना घडल्यानंतर २४ घंट्यांच्या आत ५ संशयितांना कह्यात घेतले आहे. संशयितांनी एका पडीक इमारतीत लपवून ठेवलेले दुकानमालक नवीन पटेल यांचीही पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी दुकानमालक नवीन पटेल यांचा माजी कर्मचारी निशांत मोगन आणि त्याचा सहकारी वीरेंद्र कुमार हे मुख्य सूत्रधार आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांच्या मते संशयित प्रथम नवीन पटेल यांना ‘प्लायवूड’ विकत घेणार असल्याचा बहाणा करून भेटले आणि त्यांना पळवून नेऊन दोरीने बांधून एका पडीक इमारतीत ठेवले. तेथून संशयितांना नवीन पटेल यांच्या पत्नीशी संपर्क साधून नवीन पटेल यांची सुटका करण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. संशयितांनी या वेळी संपर्क करण्यासाठी जुने गोवे परिसरातून चोरलेल्या एका भ्रमणभाषचा वापर केला. भ्रमणभाषच्या आधारावरून पोलिसांनी ५ संशयितांना कह्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी मंजुनाथ, सुजीत आणि सुभाष या संशयितांनाही कह्यात घेतले आहे.

भ्रमणभाष चोरीच्या प्रकरणी गुन्हा नोंद न करणारे जुने गोवे पोलीस ठाण्यातील प्रमुख हवालदार (हेड कॉन्स्टेबल) सेवेतून निलंबित

भ्रमणभाष चोरीच्या प्रकरणी गुन्हा नोंद न करणार्‍या जुने गोवे पोलीस ठाण्यातील प्रमुख हवालदाराला (हेड कॉन्स्टेबलला) पोलीस खात्याने सेवेतून निलंबित केले आहे. (निलंबन म्हणजे अर्ध्या वेतनाची सुटी ! त्यामुळे ती शिक्षा होऊ शकत नाही. कर्तव्य न बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून काढून टाकणेच योग्य ! – संपादक)