गोविरोधी विधान करणारे मेघालयचे भाजपचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांना मंत्रीमंडळातून काढून टाका ! – ‘गोवंश रक्षा अभियान’ची मागणी

मेघालयचे भाजप शासनातील पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांच्या गोविरोधी विधानाचे प्रकरण

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना गोप्रेमी

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा समज दूर होईल!’ असे गोविरोधी विधान मेघालयातील भाजप शासनातील पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांनी केले होते. गोविरोधी विधान करणारे सानबोर शुलाई यांना मंत्रीमंडळातून काढून टाका आणि घटनाविरोधी विधान केल्याने त्यांच्या विरोधात ‘प्रथमदर्शनी अहवाल’ (एफ्.आय्.आर्.) नोंदवा, अशी मागणी ‘गोवंश रक्षा अभियान’ आणि गोव्यातील गोप्रेमी यांनी केली आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर यांची ४ ऑगस्ट या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. या वेळी ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब, श्री. शैलेंद्र वेलींगकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोप्रेमींनी केलेली ही मागणी गोव्याचे राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोचवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर गोप्रेमींनी पत्रकार परिषद घेतली. यात पुढीलप्रमाणे गोप्रेमींनी त्यांची मते मांडली.

गोविरोधी आणि घटनाविरोधी विधान करणारे मेघालयचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांचा जाहीर निषेध ! – हनुमंत परब, ‘गोवंश रक्षा अभियान’

हनुमंत परब

गोविरोधी आणि घटनाविरोधी विधान करणारे मेघालयचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांचा ‘गोवंश रक्षा अभियान’ आणि समस्त गोप्रेमी जाहीर निषेध करत आहेत. पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांचे हे विधान हिंदु संस्कृती नष्ट करणारे आहे. ‘गायीचे रक्षण झाले पाहिजे’, असे घटना सांगते. भाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नसून तो एक व्यावसायिक पक्ष बनलेला आहे. राजकारण आज जनसेवा करण्याचे साधन न रहाता ते आता पैसे कमवण्याचे एक माध्यम बनले आहे.

काँग्रेसपेक्षाही भाजपकडून गोवंशियांच्या हत्येला अधिक पाठिंबा लाभणे दुर्दैवी ! – अमृतसिंह, प्राणीप्रेमी

काँग्रेसपेक्षाही भाजपकडून गोवंशियांच्या हत्येला अधिक पाठिंबा लाभत असल्याचे दिसत आहे आणि हे दुर्दैवी आहे. गोव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पशूवधगृहांवर धाडी टाकून तेथे होणार्‍या अनधिकृत गोवंश हत्येवर प्रकाश टाकण्यात आला; मात्र आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही गोवा शासनाने या अनधिकृत पशूवधगृहांवर पुढे कोणतीही कारवाई केलेली नाही.

अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणापोटी गोव्यातील भाजप शासन गोवंश रक्षणाच्या सूत्रावर उदासीन ! – शैलेंद्र वेलींगकर

 

उत्तरप्रदेशमध्ये भाजप गायीला ‘गोमाता’ असे संबोधित करते, तर मेघालयमध्ये हीच भाजप गायीला रस्त्यावर टाकते. ‘एकात्मता मानव दर्शन’ यामध्ये गोमातेचे महत्त्व सांगण्यात आले आहे आणि ‘एकात्मता मानव दर्शन’च्या अधिष्ठानावर स्थापन झालेल्या भाजपची वाटचाल आता चुकीच्या मार्गाने होत आहे. ‘हिंदुत्वा’चे बिरूद मिरवणारा भाजप आज हिंदुत्वाचाच खून करत आहे. गोव्यातील भाजप सरकार अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यासाठी गोवंश रक्षणाच्या सूत्रावर उदासीन आहे.

‘गोवंश रक्षा अभियान’ने निवेदनात केलेल्या मागण्या

१. गोविरोधी आणि घटनाविरोधी विधान करणारे मेघालयचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे आणि त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय्.आर्.) नोंदवावा.

२. देशभरात गोवंश हत्या बंदी लागू करावी आणि गोवंशियांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा.