पाकच्या पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान आता भाड्यावर देण्यात येणार

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिहादी पाकला वाचवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निवासस्थान रिकामे करण्याची आली पाळी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीकडे वाटचाल करणार्‍या पाकमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान आता भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या घराचे रूपांतर विद्यापिठात करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर इम्रान खान यांनी निवासस्थान सोडले होते. आता सरकारने भूमिका पालटली आहे. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, हे निवासस्थान शैक्षणिक संस्थेला देण्याऐवजी सांस्कृतिक, ‘फॅशन’ (समाजात रूढ होत असलेले पेहरावाचे प्रकार) आणि अन्य कार्यक्रम यांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. पंतप्रधान निवासस्थानातील सभागृह, पाहुण्यांसाठीची जागा आणि एक ‘लॉन’ (बाग) भाडेतत्वावर देऊन महसूल मिळवला जाऊ शकतो. तसेच उच्चस्तरीय राजनयिक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिसंवाद यांचे आयोजनही येथे करण्यात येईल.