आग्वाद कारागृहाचा विवाह समारंभासाठी वापर करण्यास माझा विरोध ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

आग्वाद कारागृहाची इमारत

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – आग्वाद कारागृह ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचा वापर विवाह समारंभ किंवा ‘मनोरंजन विभाग’ या नात्याने करता येणार नाही. अशा प्रस्तावाला माझा पूर्ण विरोध असणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली. आग्वाद मध्यवर्ती कारागृह खासगी आस्थापनांना ‘विवाह समारंभा’चे ठिकाण किंवा ‘मनोरंजन विभाग’ करणे यांसाठी वापरण्यास देण्याचा प्रस्ताव असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मायकल लोबो बोलत होते.

मायकल लोबो

ते पुढे म्हणाले, ‘‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत आग्वाद कारागृहाचे २५ कोटी रुपये खर्चून सुशोभिकरण करण्यात आले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी कारागृहामध्ये गोवा मुक्तीलढ्याला वाहून घेतलेले वस्तूसंग्रहालय उभारण्याचा विचार होता आणि यामुळे त्यांनी कारागृहाचे सुशोभिकरण करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला होता. आग्वाद कारागृह ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. पोर्तुगीज राजवटीत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना या ठिकाणी कारागृहात टाकले होते. या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात लढणार्‍या भारतातील स्वातंत्र्यसैनिकांनाही कारागृहात टाकले जायचे. मी या ठिकाणाचे व्यापारीकरण करण्यास देणार नाही. कारागृह कुठल्याही हॉटेलला वापरासाठी देऊ नये.’’