अशा प्रकारे किती राजकारणी राजकारणातून निवृत्ती पत्करतात ?
कुडचडे, १ ऑगस्ट (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणूक ही माझ्यासाठी शेवटची आहे. पुढील विधानसभा निवडणूक न लढवता युवा नेतृत्वाला मी संधी देणार आहे, अशी घोषणा ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ‘मगोप’च्या कुडचडे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सुदिन ढवळीकर यांनी ही घोषणा केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘मगोप’ने राज्यात शिक्षण आणि उद्योग यांची गंगा आणली. शाळा, विद्यालये, आदींची स्थापना केली. शेतकर्यांना चांगले दिवस यावेत; म्हणून साळावली आणि अंजुना ही धरणे बांधण्यासह संजीवनी सहकारी साखर कारखाना चालू केला; मात्र भाजपने मगोपचे नेते तथा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या आठवणी पुसून टाकतांना सर्व तत्त्वे पायदळी तुडवली आहेत. भाजपने एका रात्रीत सरकार घडवले. ‘मगोप’ आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये रात्रीच फूट पाडली. भाजप शासन विधानसभा रात्रभर चालवत आहे. राज्य चालवण्यासाठीची विधेयके रात्रीच संमत केली जात आहेत. राज्यात संकटे आल्यास शासन निद्रेचे सोंग घेते.
आगामी निवडणुकीत ‘मगोप’चे १८ उमेदवार निश्चित झाले आहेत आणि आवश्यकता भासल्यास चांगल्या पक्षाशी ‘मगोप’ युती करणार आहे. प्रत्येकाने ‘मगोप’चे काम पाहून पक्षाला मतदान करावे. आगामी विधानसभा निवडणुकीत कुडचडे मतदारसंघासाठी आनंद प्रभुदेसाई यांना ‘मगोप’ची उमेदवारी देण्यासाठी मी आग्रही असेन. उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाची कार्यकारिणी घेणार आहे. विधानसभेचे कुडचडे आणि सावर्डे हे मतदारसंघ हे ‘मगोप’चे बालेकिल्ले आहेत.’’