सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – अतीवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या पश्चिम भागाला बसला आहे. यामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. तसेच भूस्खलन, दरडी कोसळणे आणि पुराचे पाणी शेतात शिरणे यांमुळे उभ्या पिकांची हानी झाली आहे. कृषी विभागाकडून अतीवृष्टीने प्रभावित झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक हानी पाटण, महाबळेश्वर आणि जावळी या भागांत झाली आहे. पीक हानीच्या माहितीसाठी शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा. माहिती देतांना सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक आणि हानी झालेले क्षेत्र कळवणे आवश्यक आहे. पिकांची हानी झाली असल्यास शेतकरी ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि.’ या विमा आस्थापनाला १८०० १०३७ ७१२ या टोल फ्री क्रमांकावर कळवू शकतात. समवेत इन्शुरन्स ॲप, बँक, कृषी विभाग, महसूल विभाग यांनाही पिकांची हानी कळवता येईल. हानीची पहाणी करून संपूर्ण माहिती घेऊन शासन निर्णयानुसार संबंधितांच्या अधिकोष खात्यावर निधी जमा करण्यात येईल, असे कृषी विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.