कळणे खनिज प्रकल्पाचा बांध फुटल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

कळणे प्रकल्पाचा बांध फुटल्याने पाण्याचा मोठा प्रवाह घरांसह शेती आणि बागायती यांमध्ये घुसल्याने मोठी हानी.

दोडामार्ग – तालुक्यातील कळणे खनिज (खाण) प्रकल्पाचा मातीचा बांध फुटल्याने खनिजयुक्त मातीसह पाण्याचा मोठा प्रवाह घरांसह शेती आणि बागायती यांमध्ये घुसल्याने मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘वनशक्ती संस्थे’चे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याची तात्काळ नोंद घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या पर्यावरण सचिव मनीषा म्हैसकर यांना या घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या पत्रात स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, कळणे येथे अवैध, तसेच प्रकल्पाच्या क्षेत्राबाहेर जाऊन उत्खनन केले जात आहे. अशा उत्खननामुळे डोंगर खचला आहे. दोडामार्गमधील ही खाण अंक्षी, दांडेली ते राधानगरी अभयारण्याला जोडणार्‍या पश्चिम घाटाच्या महत्त्वूपर्ण वन्यजीव ‘कॉरिडॉर’च्या मध्यभागी आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीला धोका निर्माण झाल्यावरही येथील सहस्रो झाडे तोडून उत्खनन केले गेले. याची माहिती ३० मे २०२० या दिवशी ई-मेलद्वारे देऊन येथे उत्खननास संमती देण्यास आक्षेप नोंदवला होता; मात्र आमच्या तक्रारीची नोंद घेतली गेली नाही. आज केवळ जंगलेच नष्ट झाली नाहीत, तर लोकांच्या जीवनावरही परिणाम झाला आहे. खाणीत डोंगर कोसळल्याने सहस्रो टन मातीचा गाळ ग्रामस्थांच्या घरात शिरला आणि कळणे येथील नदीही प्रदूषित झाली आहे.

कळणे येथे घटना घडल्यानंतर तेली यांनी ‘आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहोत. अवैध काम येथे होऊ देणार नाही. प्रसंगी हरित लवादाकडेही तक्रार नोंदवू’, अशी चेतावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे तालुका सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तेली यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले ‘‘राजन तेली आणि त्यांचे सहकारी हेच या प्रकल्पाचे जन्मदाते आहेत. आता बोलणार्‍यांनी ‘या प्रकल्पाला जन्माला घालणारे कोण आहेत ?’ हे अगोदर सांगावे आणि नंतरच यावर बोलावे.’’

कळणे खनिज प्रकल्प बंद करा ! – संतप्त ग्रामस्थांची मागणी  

दोडामार्ग – लोकांच्या जिवावर बेतणारा कळणे येथील खनिज प्रकल्प बंद करा, अशी मागणी येथील संतप्त ग्रामस्थांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली. खासदार राऊत यांनी ३० जुलैला कळणे येथील आपद्ग्रस्त भागाला भेट देऊन पहाणी केली. या वेळी ग्रामस्थांनी ही मागणी केली.

कळणे येथील आपद्ग्रस्त भागाची पहाणी केल्यावर खासदार राऊत यांनी,‘खाणीत डोंगर कोसळून झालेल्या हानीला चुकीच्या पद्धतीने झालेले उत्खनन कारणीभूत आहे. त्याला उत्तरदायी असणार्‍यांवर गुन्हे नोंद करा’, असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिला.