देवद आश्रमातील श्री. नंदकिशोर नारकर यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरुदेवांविषयी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

‘५.७.२०२० या दिवशी  (गुरुपौर्णिमेच्या दिवशी) रामनाथी आश्रमात होत असलेल्या गुरुपूजनाचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण आम्ही देवद आश्रमातील साधक पहात होतो. तेव्हा मी डोळे मिटून बसलो असतांना मला पुढील दृश्य दिसले.

श्री. नंदकिशोर नारकर

१. परात्पर गुरु डॉक्टर विश्वरूपात असल्यामुळे त्यांचे सर्व विश्वावर नियंत्रण रहाणार असून ते त्यांच्या पादुकांद्वारे साधकांसमवेत रहाणार असणे

‘परात्पर गुरु डॉक्टर विश्वरूपात (विश्वाशी एकरूप झालेले) असून त्यांची भव्यता सप्तलोकांच्या वर आहे. साधकांना त्यांची चरणपूजा करता यावी, यासाठी त्यांनी वैकुंठ लोकातून त्यांचे चरण धरतीवर ठेवले आहेत; परंतु ते भूमीवर टेकले नाहीत. त्यांच्या हातांतून येणारे आशीर्वादाचे चैतन्य किरण सोनेरी असून ते सप्तलोकांतून येऊन साधकांच्या भोवती प्रगट रूपात पसरले आहेत. परात्पर गुरु डॉक्टर विश्वरूपात असल्यामुळे त्यांचे सर्व विश्वावर नियंत्रण रहाणार आहे आणि ते त्यांच्या पादुकांद्वारे साधकांसमवेत रहाणार आहेत.

२. श्रीकृष्णासह अनेक देवताही गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यासाठी आल्या आहेत. त्यांनीही सूक्ष्मातून त्यांची अस्त्रे, शस्त्रे आणि फुले चैतन्य कणांच्या रूपात साधकांभोवती ठेवली असून ती साधकांना अडचणीच्या वेळी उपयोगी येतील.

 ३. आपत्काळात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांचे रक्षण आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पालन-पोषण करणार असणे

पुढे येणार्‍या आपत्काळात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांचे रक्षण आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांचे पालन-पोषण करणार आहेत. या दोन्ही देवी हिरवळीवर बसल्या आहेत, म्हणजेच सर्व ठिकाणी सदैव समृद्धी असेल. हे आशीर्वादाचे किरण सर्व साधकांभोवती रहाणार असून त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही.

४. दूरवर युद्धरथ उभा आहे, म्हणजे सूक्ष्मातून युद्ध झाले, तरी साधकांना त्याची झळही लागणार नाही. रथावरील हनुमंत साधकांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर आहे.

५. पुढील आपत्काळात नाम आणि चैतन्य यांच्या बळावर प्रयत्न करणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या आशीर्वादाच्या झोतात असणार्‍या साधकांनी हिरवे आणि पिवळे कपडे परिधान केले आहेत. (हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे, तर पिवळा रंग म्हणजे चैतन्य होय.) पुढील आपत्काळात नाम आणि चैतन्य यांच्या बळावर प्रयत्न करायचे आहेत.

‘देवाने मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या पाद्यपूजेची संधी दिली’, त्याविषयी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.७.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक