विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे जिवाची बाजी लावणार्‍या मावळ्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेली हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षणार्थी युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

जळगाव – ४५० वर्षांपूर्वी पाच पातशाह्यांचा निःपात करून आणि मूठभर मावळ्यांना घेऊन आई तुळजाभवानी अन् संत यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य सत्यात उतरवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आज घेतले, तरी शत्रूच्या मनात धडकी भरते. हिंदवी स्वराज्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर १ सहस्र ६७२ किलोमीटर लांब अशा ७ राज्यांत स्थापन केले होते. त्यात गडकिल्ल्यांची महत्त्वाची भूमिका होती; पण आज त्याच गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली आहे आणि त्यावर अतिक्रमण झाले आहे. विशाळगडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे जिवाची बाजी लावणारे नरवीर बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशिद यांचे भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षणार्थी युवक-युवतींसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ व्याख्यानात बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नरवीर बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशिद यांच्या बलीदानदिनानिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणार्थी युवक-युवतींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात श्री. घनवट बोलत होते. या ऑनलाईन कार्यक्रमास महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव येथील ५३० हून अधिक प्रशिक्षणार्थी युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निखिल कदम यांनी केले.

श्री. सुनील घनवट

श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘मोगलांमध्ये धडकी भरावी, असे वातावरण छत्रपतींनी निर्माण केले होते. विशाळगड (कोल्हापूर), पारोळा (जळगाव) किल्ला आणि अन्य किल्ले यांचीही आज दुरवस्था झाली आहे. मावळ्यांची स्वामीनिष्ठा लक्षात घेता आज देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे’’.

प्रशिक्षणार्थींचे मनोगत

१. श्री. केतन आटोळ, पुणे – आज छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभु आणि पराक्रमी मावळेही नाहीत. त्यामुळे कुठेतरी छत्र हरपल्यासारखे वाटत होते; पण समितीच्या वतीने घेण्यात येणारे कार्यक्रम अन् बलोपासना वर्ग ऐकल्याने हरवलेले छत्र पुन्हा प्राप्त झाले, असे वाटते.

२. कु. स्वाती देशमुख, यवतमाळ – गड-किल्ल्यांची दुरवस्था ऐकून मनामध्ये अतिशय चीड निर्माण झाली. मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडून बलीदान दिले. आज त्या किल्ल्यांची दुरवस्था होणे संतापजनक आहे. आपला खरा इतिहास पुस्तकातून शिकवला जात नाही. तो आजच्या पिढीला शिकवणे पुष्कळ आवश्यक आहे.

३. श्री. गणेश भोसले, जळगाव – श्री. सुनील घनवट यांचे मार्गदर्शन ऐकून अंगावर शहारे आले. त्यांनी जो शौर्याचा इतिहास सांगितला, त्याप्रमाणे कार्य करण्यास आपण अल्प पडत आहोत. त्यासाठी प्रयत्न करीन.

क्षणचित्र

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा पोवाडा ऐकल्याने उत्साह निर्माण झाला’, असे अनेकांनी सांगितले.