सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यात अडचणी

सातारा, २९ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यात दळणवळण बंदी हटवल्यानंतर गर्दीचा महापूर आला आहे. शहरांतील काही बाजारपेठांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये पुन्हा पहिल्यासारखी गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांना पहिला डोस मिळेना आणि दुसर्‍या डोससाठी लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

दळणवळण बंदी उठवल्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. गर्दीमध्ये नागरिकांकडून कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. यामुळे कोरोना पुन्हा बळावतोय. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे; मात्र शहरी भागासह ग्रामीण भागातही नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोना अटोक्यात आला असला, तरी मृत्यूदर आटोक्यात येत नसल्यामुळे पुन्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. गत २४ घंट्यांमध्ये जिल्ह्यात ४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.