ज्ञानवापी मशिदीच्या लगतची भूमी श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या प्रशासनाला देण्याचा निर्णय !

या बदल्यात काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासन ज्ञानवापी मशिदीला १ सहस्र स्क्वेअर फूट भूमी देणार !

ज्ञानवापी मशिद व काशी विश्‍वनाथ मंदिर

वाराणसी – येथील ज्ञानव्यापी मशिदीचे एक पक्षकार असलेल्या ‘अंजुमन इंतेजामिया कमिटी’ने ज्ञानवापी मशिदीच्या लगतची १ सहस्र ७०० स्क्वेअर फूट भूमी श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला. या बदल्यात काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाने मुसलमान पक्षाला १ सहस्र स्क्वेअर फूट भूमी देण्याचा निर्णय घेतला आहे. श्री काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाला मिळालेल्या नव्या भूमीचा वापर ‘श्री काशी विश्‍वनाथ धाम कॉरिडॉर (महामार्ग)’ बनवण्यासाठी करण्यात येणार आहे. सध्या या भूमीवर जिल्हा प्रशासनाचा ‘नियंत्रण कक्ष’ कार्यरत आहे.

श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या परिसरात असलेली ही भूमी मंदिर आणि परिसर यांच्या विस्तारीकरणात अडसर ठरत होती. याविषयी श्री काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासन आणि ज्ञानवापी मशीद पक्ष यांच्यात अनेकदा चर्चा झाली होती. नुकत्याच झालेल्या चर्चेत एकमेकांकडे भूमींचे हस्तांतर करण्याविषयी एकमत झाले. त्यानुसार एकमेकांना भूमींचे हस्तांतरण झाले.

सध्या वाराणसी न्यायालयात श्री काशी विश्‍वनाथ मंदिरच्या वतीने ‘स्वयंभू भगवान विश्‍वेश्‍वर महादेव’च्या नावाने हिंदु पक्षकार, तर ज्ञानवापी मशिदीच्या वतीने ‘अंजुमन इंतेजामिया कमिटी’ आणि ‘सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड’ हे पक्षकार हा खटला लढवत आहेत.