कुंकळ्ळी येथे १६ महानायकांच्या स्मारकावर जलाभिषेक

संग्रहित चित्र

कुंकळ्ळी, १७ जुलै (वार्ता.) – कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील प्रथम उठावाच्या ४३८ व्या जयंतीच्या निमित्ताने १६ महानायकांच्या स्मारकावर १५ जुलैला जलाभिषेक करण्यात आला. या वेळी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण, श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण, श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण, श्री मल्लिकार्जुन देवस्थान आणि कुंकळ्ळी येथील प्रसिद्ध ‘बारा बांध’ येथून तीर्थ कलश संबंधित देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी आणले आणि मान्यवरांच्या हस्ते स्मारकाला तीर्थाचा अभिषेक घालण्यात आला.

सोहळ्याच्या वेळी प्रसिद्ध वक्त्या श्रीमती शेफाली वैद्य यांनी त्यांचे विचार मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘व्हेरिसिमो कुतिन्हो यांनी केलेल्या अभ्यासामुळे १६ महानायकांचा इतिहास आमच्यासमोर आलेला आहे. या सोहळ्यात उपस्थित राहून मला मातृभूमीचे ऋण फेडण्याची संधी प्राप्त झाली.’’ श्रीमती शेफाली वैद्य यांनी या वेळी त्यांचे स्वातंत्र्यसैनिक असलेले वडील आणि वडिलांचे ‘आझाद गोमंतक दला’तील इतर साथीदार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाला प्रदेश संघचालक राजेंद्र भोबे, कुंकळ्ळी पालिकेचे नगरसेवक विशाल देसाई, ‘कुंकळ्ळी महानायक ट्रस्ट’चे ऑस्कर मार्टिन्स आदींची उपस्थिती होती.