कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्‍यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !

हिंदूंच्या संघटनांकडून निदर्शने !

तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्‍चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कोइम्बतूर (तमिळनाडू) – येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्‍यावर असलेली ७ मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला येथील नगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. विश्‍व हिंदु परिषदेनेही आंदोलन करून या कारवाईचा निषेध केला. पाडण्यात आलेल्या मंदिरांमध्ये एक मंदिर १०० वर्षे प्राचीन होते. नगरपालिकेने दावा केला आहे की, ही मंदिरे अतिक्रमण करून उभारण्यात आली होती. तसेच येथे स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी ही मंदिरे पाडण्यात आली आहेत. (स्मार्ट सिटीच्या नावाखाली चैतन्याची स्रोत असलेली मंदिरे पाडणारे हिंदुद्रोही प्रशासन ! स्मार्ट सिटी चकचकीत आणि सुशोभित असतील; मात्र चैतन्याचे स्रोत असलेली मंदिरेच तेथे नसतील, तर असली शहरे काय कामाची ? – संपादक)

हिंदू मुन्नानीचे प्रदेशाध्यक्ष कदेश्‍वर सुब्रह्मण्यम् म्हणाले, ‘‘जेव्हा पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी संसदेत एक अधिनियम संमत केला होता. त्याद्वारे ७५ वर्षांहून जुनी मंदिरे पाडण्यावर बंदी घातली होती; मात्र कोइम्बतूर नगरपालिकाने १०० वर्षे जुने मंदिर पाडले आहे. येथील तिरुपूर जिल्हाधिकारी कार्यालयासह काही सरकारी कार्यालये हिंदूंच्या मंदिरांच्या भूमीत बांधण्यात आली आहेत. (प्रशासनाने याचे उत्तर द्यावे ! – संपादक) त्यामुळे त्यांनाच आता हटवले पाहिजे.’’