पुण्यातील महिला डॉक्टरच्या स्नानगृहामध्ये छुपे कॅमेरे लावणार्‍या आधुनिक वैद्यांना अटक !

उच्चशिक्षित आधुनिक वैद्यांना न शोभणारी घटना ! असे आधुनिक वैद्य वैद्यकीय क्षेत्राला कलंकच आहेत. वासनेच्या आहारी गेलेल्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

पुणे, १५ जुलै – येथील प्रसिद्ध भारती हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या स्नानगृहामध्ये छुपे कॅमेरे लावण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. ६ जुलै या दिवशी छुपे कॅमेरे असल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी शहरातील नामांकित आधुनिक वैद्य सुजित जगताप यांना अटक केली आहे. त्यांनी स्वतः तरुणीच्या सदनिकेची बनावट चावी सिद्ध करून घरात प्रवेश करत छुपे कॅमेरे लावले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आधुनिक वैद्य एम्.डी. असून टिळक रस्त्यावर त्यांचे रुग्णालय आहे. भारती हॉस्पिटलमध्ये ते प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात होते. पोलिसांनी भारती विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले असता एके ठिकाणी आधुनिक वैद्य जगताप कैद झाले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.