गोव्यात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देणे आवश्यक ! – एदुआर्द फालेरो, काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री

प्राथमिक शिक्षणातील माध्यम प्रश्न !

काँग्रेसचे एदुआर्द फालेरो यांना वाटते, तसे किती ख्रिस्त्यांना वाटते ? एदुआर्द यांच्या या मताविषयी ‘फोर्स’ या इंग्रजी माध्यमासाठी हट्ट करणार्‍या संस्थेला काय म्हणायचे आहे ? प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेणारी मुले पुढे मोठी झाल्यावर चांगले इंग्रजी बोलू किंवा लिहू शकतात, हा इंग्रजीतून पाल्यांना शिकवणार्‍यांचा भ्रम आहे.

शिक्षणाचे माध्यम मातृभाषा

पणजी, १० जुलै (वार्ता.) – गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मराठी किंवा कोकणी यांपैकीच असायला पाहिजे. कोकणी ही येथील लोकांची मातृभाषा आहे, तर मराठी ही फार मोठ्या जनसमुदायाची साहित्यनिर्मितीची भाषा आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर या दोन भाषा वगळता इंग्रजीसारख्या भाषेतून प्राथमिक शिक्षण द्यायचे कारण नाही. ‘डायोसेसन’ सोसायटीने त्यांच्या अखत्यारितील सर्व विद्यालयांमधून मराठी-कोकणी हे अध्ययनाचे माध्यम असतील, याची निश्चिती करून इंग्रजी माध्यमातून शिकवणे बंद करावे, तसेच कोकणीही देवनागरी लिपीतून शिकवावी. यामुळे विद्यार्थ्यांना मराठी आणि राष्ट्रभाषा हिंदी यांचे आकलन होणे सोपे जाईल, असे आवाहन काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी दैनिक ‘गोमंतक’च्या १० जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखाद्वारे केले आहे. या लेखातील काही महत्त्वाचा भाग पुढे देत आहोत.

एदुआर्द फालेरो

१. या लेखात एदुआर्द फालेरो पुढे म्हणतात, ‘‘जगभरात राष्ट्रीय भाषांचे महत्त्व, तसेच सांस्कृतिक अस्मितेचा आग्रह वाढू लागला आहे. भारतात यशस्वी होण्यासाठी स्थानिक भाषा आणि हिंदी या किमान २ भारतीय भाषांमध्ये प्रावीण्य मिळवावे लागेल. पाल्यांची अध्ययनाची भाषा ठरवण्याचा अधिकार पालकांना आहे. घटनेच्या कलम २१ नुसार राज्य सरकार राज्यातील विद्यालयांचे माध्यम ठरवू शकते आणि या माध्यमातील विद्यालयांना विनामूल्य शिक्षणासाठी अनुदान देऊ शकते.

२. युरोप आणि आखाती देशांसह सर्वच राष्ट्रांनी निर्बंध कडक केले आहेत. हे देश केवळ त्यांच्याच नागरिकांना नोकर्‍या देत आहेत. यामुळे पुढील काळात राष्ट्रीय भाषा अवगत नसलेल्यांना नोकरी आणि अन्य संधी यांपासून वंचित रहावे लागणार आहे.

३. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर परिणाम होत असल्याचा समज चुकीचा आहे. गोवा पारतंत्र्यात असतांना काही विद्यार्थी मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घ्यायचे. हे विद्यार्थी पुढे पोर्तुगीज सरकारमध्ये मंत्री, ज्येष्ठ अधिवक्ता, न्यायाधीश, प्राध्यापक आदी पदांवर पोचले आहेत. दर्जेदार शिक्षण मिळणे, हा प्रत्येकाचा हक्क आहे. विद्यालयांमध्ये गुणवत्ताप्राप्त शिक्षकांचीच नियुक्ती व्हायला पाहिजे.

४. मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रवृत्त करणे, हेही सरकारचे काम आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत येणार्‍या पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्राच्या साहाय्याने राज्य सरकार आणि विद्यालये यांनी मुलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामुळे त्यांना राष्ट्रीय वारसा आणि संस्कृती यांचा परिचय होईल. (गोवा सरकारने हे लक्षात घेऊन कृती करावी, ही अपेक्षा ! – संपादक)

५. आपल्या मुक्तीलढ्याच्या स्मृती नित्य तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी लिहिलेल्या काही लेखांचा संग्रह ‘गोवाज फ्रीडम स्ट्रगल’ या नावाने १९६१ मध्ये प्रकाशित झाला. या पुस्तकाची प्रत आज मिळत नाही. या पुस्तकाची नवीन आवृत्ती काढावी आणि पुस्तकातील लेखांचा विद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करावा. (फालेरो यांना वाटते ते सरकारने कृतीत आणणे आवश्यक ! – संपादक)