समुदाय आरोग्य अधिकार्यांची मागणी
सातारा, १० जुलै (वार्ता.) – समुदाय आरोग्य अधिकार्याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकार्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. याविषयीचे निवेदन माण पोलिसांना देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजे आरोग्य उपकेंद्रात ६ जुलै या दिवशी नियमित लसीकरण चालू होते. त्यावेळी तिथे कार्यरत असणारे समुदाय आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य गणेश शेळके यांनी दुपारी १ वाजता लसीकरणाच्या ठिकाणीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे’, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या घटनेचा वरिष्ठ पोलीस यंत्रणेकडून सखोल तपास करण्यात यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करून शेळके यांना न्याय देण्यात यावा.